चंद्रपूरातील बचतगटांची उत्पादने आता ॲमेझानवर

  52

  ?ना.वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले वेबसाईटवर प्रदर्शित

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(दि.29ऑगस्ट):- गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध नाविण्यपुर्ण उत्पादने निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समुहांना जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने जिल्हयाने आणखी एक महत्वाचे पाउल टाकले आहे. जिल्हातील उमेद समुहांची उत्पादने आता ॲमेझान या ई कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध झाली आहेत. दिनांक 29 ऑगस्ट रोजी नियोजन भवनात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या या उत्पादनांना वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले.

  राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेद) अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. सदयस्थितीत जिल्हयात सुमारे 7200 समुह आहे. या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर 860 ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे, तर 34 प्रभागसंघ तयार झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 80 हजार कुटूंबे आपल्या विविध आर्थिक गरजा भागवत आहेत. जिल्हयात विविध समुह अनेक उत्पादने तयार करीत आहेत. यात कलाकुसरीच्या वस्तू , खादय उत्पादने, काष्ठ शिल्प, वनऔषधी आदीचा समावेश आहे. सध्या या वस्तू जिल्हा व राज्य पातळीवरील प्रदर्शने तसेच स्थानिक स्तरावर विकल्या जात आहेत. आता या उत्पादनांना जागतिक दर्जाच्या ई कॉमर्स वेबसाईट ॲमेझान वर स्थान मिळाले आहे.

  आज नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या सह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, विसापूर येथील सुरभी, झाशी राणी व जागृती या स्वयंसहायता समुहातील महिलांना ॲमेझान उत्पादनाचे पत्र देण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. वडेटटीवार यांनी महिलांचे कौतुक करीत सदर वस्तू आता भारतभरातील ग्राहक खरेदी करतील आणि या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास व्यक्ती केला. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीही यावेळी महिलांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले यांनी लवकरच ॲमेझानवरील उत्पादनांची संख्या वाढून 16 होईल, असे सांगितले. तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समुहांचे उत्पादने जिल्हा तसेच जिल्हास्तरावरील विक्री केंद्रातून उपलब्ध होतील, असे सांगितले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक संदीप घोंगे, तालुका अभियान व्यवस्थापक उमप, सुकेशीनी गणवीर, श्री. माउलीकर, सुहास वाडगुरे यांनी सहकार्य केले.