30 ऑगस्ट रोजी जिल्हयातील दुर्गम भागातील 777 कोटी रूपये किंमतीच्या पूल व रस्ते कामांचे उद्घाटन व भूमिपुजन

27

🔹केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार उद्घाटन

🔸केंद्र व राज्य शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग

✒️संतोष संगीडवार(आल्लपली)विशेष प्रतिनिधी-गडचिरोली -मो:-7972265275

गडचिरोली(दि.29ऑगस्ट):-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या, दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा. व्हीडीओ कॉन्फरन्सद्व  जिल्हयातील दुर्गम भागातील 777 कोटी रूपये किंमतीच्या पूल व रस्ते कामांचे उद्घाटन व भूमिपुजन संपन्न होत आहे. प्राणहिता नदीवरील सिरोंचा जवळील, इंद्रावती नदीवरील पातागुडम येथील पूल, बेजरपल्ली अहेरी रस्त्यावरील लंकाचेन येथील पूल व बेजूरपल्ली देवलमारी अहेरी रस्ता, गरंजी पुस्तोला रस्ता दुरूस्ती अशा झालेल्या कामांचे उद्घाटन होत आहे. तसेच पेरीमिली नदीवरील नारायणपूर-भामरागड-आलापल्ली, बांडीया नदीवरील, पर्लकोटा नदीवरील व वैनगंगा नदीवरील कोरपाना – आष्टी अशा चार नवीन आवश्यक पुलांच्या कामाचे भूमिपूजन उद्या व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला उद्या 11.30 वा. सुरूवात होत आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, अशोक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, डॉ.रामदास अंबटकर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, केंद्र शासनाचे सचिव, अतिरीक्त सचिव तसेच जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपिस्थित राहणार आहेत.

जिल्हयातील दुर्गम भागात विकास कामांना गती मिळत आहे. राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनाकडूनही विविध विकास कामांना भरीव मदत दिली जात आहे. यासाठी गडचिरोली जिल्हयात झालेल्या कामांमुळे लोकांच्या जीवनात होत असलेला बदल त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारा आहे असे म्हणता येईल. नवीन झालेल्या व होत असलेल्या पूलांमूळे जिल्हयात पावसाळा असो की उन्हाळा आता दुर्गम, आदीवासी व नक्षल प्रभावीत भागात दळणवळण सोपे झाले आहे.

*यात झालेल्या कामांचे उद्घाटन*
1. प्राणहिता नदीवरील निजामाबाद सिरोंचा असरअल्ली जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग 63 वरील पूल कामाची किंमत 168 कोटी
2. इंद्रावती नदीवरील पातागुडम जवळील 248 कोटींचा पूल
3. लंकाचेन येथील बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी यांना जोडणारा 7.71 कोटींचा पूल
4. बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी या राज्य महामार्गाची दुरूस्ती 25.81 कोटी
5. गारंजी पुस्तोला रस्त्याची 35.62 कोटी रूपयांची दुरूस्ती

*तर भूमिपुजन*
1. पेरीमिली नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 43.23 कोटी
2. बांडीया नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 72.59 कोटी
3. पर्लकोटा नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 77.98 कोटी
4. वैनगंगा नदिवरील तेलंगणा सीमा ते कोरपना, गडचांदूर, राजूरा, बाम्नी, आष्टी जोडणारा पूल 98.83 कोटी
अशा 777 कोटी रूपये किंमतीची कामे मार्गी लागत आहेत.

आलापल्ली- हेमलकसा- भामरागड -लाहेरी ते छत्तीसगड राज्य सीमेपर्यन्त जानेवारी २०१७ मध्ये केंद्र सरकार ने राष्टीय महामार्ग १३० डी म्हणून घोषित केला आहे. हा राष्टीय महामार्ग अतिसंवेदनशील, आदिवासी दुर्गम क्षेत्रातून जात असून गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय या रस्त्याने छत्तीसगड राज्य सीमेशी जोडले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी तालुके यात अहेरी, भामरागड आणि लाहेरी हे या राष्टीय महामार्गावर येत असून या तिन्ही तालुक्यांना जोडणारे सद्धस्थितीत पेरमिली , बांडिया व भामरागड स्थित पर्लकोटा नदीवर कमी उंचीचे व रुंदीचे पूल असून पावसाळ्या मध्ये दहा ते बारा वेळा पूर येऊन हा राष्टीय महामार्ग बंद होत असतो. त्यामुळे या क्षेत्रातील जनतेचे तालुका व जिल्ह्यासोबत संपर्क तुटून जीवीत हानी होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच यावेळेस वित्त हानी व दैनंदिन गरजा पूर्ण करणेही फार कठीण काम असते. सदर रस्त्यावरून तेलंगाना/ छत्तीसगड राज्यातून आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक (बांबू, साग,व इतर वनउपज इत्यादीची ) मोठया प्रमाणात सुरु असते. या तिन्ही अरुंद व कमी उंचीच्या पुला मुळे दरवर्षी पेरमिली हेमलकसा बाजूने आलापल्ली पर्यंत व भामरागड बाजूने लाहेरी – बिनागुंडा पर्यंत संपर्क तुटला जात असल्यामुळे भामरागड स्थित शाळा,महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थे मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते,आदिवासी भागात शासना तर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा उदा.पेट्रोल, मातीचे तेल, गॅस, अन्नधान्य तसेच व्यापारी वाहतूक इत्यादी सुविधांना फार मोठा अडथळा निर्माण होतो. पावसाळ्यामध्ये या मार्गावरील तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधांशी फार मोठा सामना करावा लागतो. सदर या तिन्ही पुलामुळे व चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पुलामुळे या अतिदुर्गम भागातील जनतेचा थेट संपर्क आंतरजिल्ह्याशी व आंतरराज्याशी जोडल्यामुळे या भागातील जनतेच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन होणार आहे. तसेच वेळेवर आरोग्य सुविधा, व्यापारी वाहतूक, शाळा महाविद्यालये यांचे कायमचे प्रश्न सुटण्यात मैलाचा दगड ठरणार आहेत. रोजगार निर्मितीसाठी सुद्धा चालना मिळेल.

*आर.आर.पी.-1 (MoRTH)*
महाराष्ट्र राज्यामधील गडचिरोली जिल्हा हा नक्षलीदृष्ट्या अतिसंवेदनशिल असुन भौगोलिक दृष्ट्या अतिदुर्गम भाग आहे. या भागाच्या विकासाकरीता रस्ते परिवहन व राज्य मार्ग, भारत सरकार तर्फे डावी कडवी विचारसरणी (LWE) अंतर्गत राबविलेल्या योजनेसाठी रु.७९२.८६ कोटी खर्चासह २३ पैकेज मधील ३८ कामे ३७०.१० किमी लांबीचे रस्ते व ३२ पुलांची कामे २०२० मध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे.
*आर.आर.पी.-2 टप्पा-१ (MoRD)*
ग्राम विकास विभाग, भारत सरकार सर्फ महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात डावी कडवी विचारसरणी (RCPLWEA) अंतर्गत १० रस्ते व ३३ पुलांची कामे मंजुर आलेली असुन रु. २२९.७१ कोटी खर्च अपेक्षित आहे. या मधील २ रस्ते व ४ पुलांची कामे एकुण ६ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत कामे मार्च २०२१ पर्यत पुर्ण करण्याचे नियोजन आहे.
*आर.आर.पी.-2 टप्पा-२(MoRD)*
ग्राम विकास विभाग, भारत सरकार तर्फे महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली व चंद्रपुर जिल्हयाकरीता डावी कडवी विचारसरणी (RCPLWEA) टप्पा-२ अंतर्गत ३६ रस्ते व ७५ पुलांची कामे एकुण १११ कामे मंजुर झालेली असून रु. ५६०.०१ कोटी खर्च अपेक्षीत आहे. हि सर्व कामे निविदा प्रक्रियेत असून डिसेंबर २०११ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

उद्घाटन कार्यक्रम या लिंकवर सर्व नागरिक पाहू शकतात-
Link to View Inauguration

https://propixels.webex.com/propixels/j.php?MTID=mc53f8e1b073eb3998857c54f98944012

Inauguration of Gadchiroli Projects by Video Conference
11:30 am
Sun, 30 Aug 2020