वैनगंगा नदीच्या पुराने यावर्षीचे सर्व रेकॉर्ड तोडले

12

🔹जुनगाव, गंगापूर, टोक पुराने वेढले-गावात अनेक समस्यांचा पूर

✒️पोंभुर्णा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पोंभुर्णा(दि.30ऑगस्ट):-तालुक्‍यातील जुनगाव, गंगापूर आणि टोक ही गावे पुराने वेढले गेले असून या वर्षीचा सर्वात मोठा पूर वैनगंगा नदीला आला आहे. त्यामुळे या गावांना पूर परिस्थितीत अनेक अडचणीत भर पडलेली आहे. यापूर्वी तीन वेळा पूर आला होता.व या तीनही गावांचा संपर्क तुटला होता. हा चौथा आलेला पूर असून हा या वर्षीचा सर्वात मोठा पूर आहे.
गोसेखुर्द धरण हे या गावांच्या पथ्यावर पडत असून प्रकल्पाचे अधिकारी वैनगंगा नदीच्या वेढ्यातील गावांचा अजिबात विचार न करता पाण्याचा विसर्ग करीत असतात,मात्र त्यांच्या याच धोरणामुळे या गावांना कमालीचा वनवास भोगावा लागतो आहे. काठावरील अनेक गावातील शेतात पाणी घुसले आहे त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना याचे काही देणेघेणे नसल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून जाणवत आहे.गावात अनेक अडचणी वाढल्या असून कालपासून ही गावे बंदिस्त झाली आहेत.
जनावरांवर मोठ्या प्रमाणात लंपी नावाच्या आजाराने थैमान घातलेले असताना व नागरिकांनाही आजार असताना काही उपाययोजना करता येणे शक्य नाही. प्रशासनाने या अडचणीतून नागरिकांना बाहेर काढावे अशी मागणी शिवसेना तालुका उपप्रमुख तथा जुनगावचे माजी सरपंच जीवनदास गेडाम यांनी केली आहे.