ब्रह्मपुरी परिसरातील पूर परिस्थितीची ना. वडेट्टीवार यांनी केली पहाणी

81

🔹पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू

🔸एनडीआरएफ पथक सोमवारला दाखल होणार

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.30ऑगस्ट):-गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल करण्यात येत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. पुरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पुर परिस्थितीची पहाणी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्याचे कार्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाद्वारे सुरू आहे. पुर परिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफचे पथक सोमवारी दाखल होणार आहे.

गोसीखुर्द धरणात पाण्याचा साठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी वैनगंगा नदीला पूर आला आहे. पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतची गावे पाण्याखाली गेली आहेत. लाडज गावातून 72 तर बेलगांव येथून जवळपास 250 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य बोटीद्वारे बचाव पथक सतत करीत आहे.

बचाव कार्य करण्यासाठी पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी हेलिकॉप्टर मागविले होते. उद्या देखील हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्यात येणार आहे.

सावली तालुक्यातील बेलगाव, निमगाव आदी गावांत पुराचा फटका बसला आहे. तसेच पोंभूर्णा, गोंडपिंपरी तालुक्यातील वैनगंगा नदी परिसरात असणारे गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.