संविधान…….कोणाचे ?

  40

  संविधान हे कोणा विशीष्ट समुदायाची मक्तेदारी नाही.तर ते संपूर्ण देशाचा आत्मा आहे.हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो. संविधानिक मुल्यांवर आपल्या देशाची जगात ओळख आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. म्हणून आज आपण मनमोकळेपणाने वावरु शकतो, व्यक्त होऊ शकतो.शाश्वत असे जीवन जगण्याचा मार्ग संविधानाच्या अंमलबजावणीतून जातो.

  स्वातंत्र्यानंतर आपण प्रजासत्ताक राज्याचा स्विकार केला आणि संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.देश जसाजसा पुढे जाईल तसातसा प्रगल्भ होण्याऐवजी पुराणमतवादी प्रतिगामी,रुढीवादी होत आहे की काय अशी शंका येत आहे. मुळातच संविधानाकडे आपण जातीधर्माच्या वर उठून पाहिले पाहिजे. पण संविधानावर आक्षेप घेणाऱ्याच्या दृष्टिकोनातून धर्म,जात,आरक्षण,आणि विशीष्ट समुदायांना दिले जाणारे संरक्षण हेच कळीचे मुद्दे आहेत.संविधानातच सर्वांना आपले धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार दिला आहे. तो जपताना इतर धर्मियांची कुचंबणा होऊ नये असे स्पष्ट केले आहे. तरीही आज आम्ही धर्माला उच्च स्थान देण्याच्या मानसिकतेतून संविधानाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहोत.मी काही संविधानात काय आहे आणि काय नाही यावर बोलणार नाही. पण संविधानाच्या मान्यतेवरुन जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यावर बोलणार आहे.

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला घटना दिली आहे. त्यामध्ये त्यांचे समितीतील इतल साथीदार पण होते. तत्कालीन सरकारने मान्यता दिल्यास आपण या घटनेचा स्विकार केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीली म्हणून दलित बांधवास त्या बद्दल प्रचंड आस्था आहे. तशी आस्था असणे साहजिकच आहे.कारण दलीतांच्या मानवी हक्कासाठी ते आयुष्यभर लढत राहिले आहेत. पण इतर जातधर्मियांकडून संविधानास धोका आहे, संविधान बदलले जाऊ शकते अशी शंका त्यांना अस्वस्थ करते.म्हणून ते आम्ही संविधानाचे रक्षणकर्ते,’संविधान आमच्या बापाचं ‘ अशा घोषणा देत सुटले आहेत. त्यामागचे कारण फक्त असुरक्षितता आणि राजकीय सत्तेवरचा अविश्वास आहे. त्यात सत्यता असू शकते काही प्रमाणात अतितायीतीपणा पण असु शकतो.पण संविधान कोणा विशिष्ट समुदायाचे नाही अथवा कोणाच्या बापाचे नाही ते देशाचे आहे. ही मंडळी सांशक असण्यास त्याला कारणही तसेच आहे. सध्याचे सत्तेत असणारे पक्ष हे संविधान मुल्यांवर शंका उपस्थित करणारे असून त्यांच्या वर्तनातून अनेकदा निदर्शनास आले आहे. कधी संविधानावर बोट ठेवणे, कधी मनुवादाचा छुप्या पद्धतीने अजंडा राबवणे.संविधानावर छुप्या पद्धतीने हल्ले करण्याचे काम सध्याचे सरकार आणि त्यांच्याशी संबंधित संघटना करत आहेत. हे प्रकार हल्ली जास्त प्रमाणात घडवून आणले जात आहे. हीच मंडळी संविधान हे दलित समाजातील व्यक्तीने लिहिले आहे आणि त्यांचेच हितसंबंध जोपासणारे आहे,संविधानच भारतीयांमधे भेद करत आहे, अल्पसंख्याक, दलित, शोषित यांना झुकतं माप दिलं आहे असा खोडसाळ प्रचार चालू केला आहे.तो शंभर टक्के चुकिचा आहे. त्याला आपली जनता बळी पडत आहे. त्यातून घटनेला विरोधाच्या घटना वारंवार घडत आहेत.त्यामागे जाति ,धर्माच्या उच्चनीच असलेल्या मानसिक विचार सरणीचा दर्प आहे.फक्त दलित समुदायातील व्यक्तीने हे संविधान लिहिले आहे म्हणून हा विरोध आहे.

  घटनेचा हेतुच असा आहे सर्वांना सारखा न्याय मिळावा.जे मागास होते, संख्येने कमी होते, इतर समुदायाकडून अन्याय सहन केला आहे त्यांना सर्वांच्या बरोबरीने आणण्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत. ते इतरांवर अन्याय करण्यासाठी नाही.आजही देशात जातीवर ,धर्मावर आधारित भेद केला जातो.शोषण केले जाते.तो दुर करुन समता स्थापित करण्यासाठी संविधानात तरतुदी केल्या आहेत. उचनीचतेच्या मानसिकतेतून दोन्ही समुदायांना वर आणण्यासाठी संविधानच मार्ग दाखवू शकते.

  आज देशात संविधान नाकारण्याच्या किंवा विरोध करण्याच्या अनेक घटना दिसून येत आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीत संविधानाच्या प्रती जाळणे, पिडीपी च्या नेत्याने विधीमंडळात संविधानाची प्रत फाडणे,किंवा आता परवाच प्रविण तरडे यांनी गणपती बसवताना त्याच्या खाली संविधानाची प्रत ठेवणे(त्यांनी असे कोणत्या मानसिकतेतून केले हे त्यांनाच माहीत,पण ते ज्या संघटनेशी संबंधित आहेत ती संघटनाच मुळात संविधानाला न मानणारी आहे, त्यामुळे आपसूकच त्यांच्या त्या कृतीवर संशय बळावतो.) अशा घटना वारंवार घडून येत आहेत. मुळातच या घटना संविधान नाकारण्याच्या मानसिकतेतून घडवून आणल्या जात आहेत.अशा घटनांना जबाबदार कोणाचा धाक नसणे हा असू शकतो.पण एकप्रकारे अशा विकृतींना सरकार पाठिशी घालत असल्यानेच असे प्रकार होत आहेत. त्याच बरोबर बहुजन,दलित, अल्पसंख्याक ,शोषित यांचा हक्क, अस्तित्व नाकारण्याच्या मानसिकतेत आहे. म्हणून अशा विकृत घटनांना त्याच मानसिकतेचे लोक पाठिंबा देत आहेत.संविधान हे कोणा विशिष्ट समुदायाचे नसून ते देशाचे आहे हे सर्वांनीच मान्य करायला हवं.

  संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिके यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. कुठं होत नसेल तर अशा लोकांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जात धर्माचा अहंभाव दुर ठेऊन राष्ट्र सर्वोपरी ही भुमिका असायला हवी.तरच हा देश एक देश म्हणून घडेल अन्यथा छोट्या छोट्या समूहात विभागूनच राहील.

                                          ✒️लेखक:-सतिश यानभुरे
                                                        शिक्षक,खेड,पुणे
                                                      मो:-८६०५४५२२७२

  ▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620