मुलांच्या संगतीकडे लक्ष असूद्या

31

आपण दिलेल्या संस्कारांची शिदोरी तर आपल्या पाल्यांसोबत बालपणापासूनच असते,पण त्याचबरोबर काही अनुभव मुले समाजातून/मित्र वर्गातूनहि आत्मसात करत असतात,वाढी दरम्यान सवंगडी/मित्र मैत्रिणी महत्वाची भूमिका पार पाडतात,संगत उत्तम असेल तर उत्कर्ष होतो,पण तीच संगत अधम असेल तर अधोगतीला कारणीभूत ठरते.
आणि त्याचमुळे मुलांच्या एकंदरीत विकासामध्ये संगत अत्यंत महत्वाची भूमिका बजावते.

या संदर्भात मी ऐकलेली एक कथा आठवते,एका वृक्षावर एक हंस आणि एक कावळा राहत होते,एकदा ग्रीष्म ऋतूत उन्हाच्या झळामुळे त्रस्त झालेला एक पांतस्थ आपला धनुष्य बाण बाजूला ठेऊन त्या वृक्षाखाली विसावला,आणि त्याचा डोळा लागला.

काही काळाने सूर्य पश्चिमेला कलला तशी वृक्षाची सावली त्याच्या शरीरावरुन बाजूला झुकू लागली,म्हणून झाडावरील हंसाने सद्भावनेने आपले दोन्ही पंख पसरून त्या वाटसरूचे उन्हापासून रक्षण केले,कावळा हे सर्व पाहून कुचेस्टेने हंसावर हसू लागला.

काही वेळ गेल्यावर पांतस्थ झोपेतून जागा झाला,आणि तो आळस देतोय तोवर कावळ्याने झाडावरील घाण आपल्या पायाने खाली त्याच्या अंगावर झटकली,आणि कावळा उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसला,पांतस्थाने झाडावर पहिले,त्याला वाटले हे काम हंसाचे आहे,त्याने क्रोधाने आपल्या जवळचा बाण धनुष्याला चढवला आणि हंसाचा तत्क्षणी वध केला.
अशा प्रकारे कावळ्याच्या केवळ सहवासाने/संगतीने हंसाचा घात झाला.

मोरोपंतांच्या केकावलीत खालील पदाचा उल्लेख आहे.

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ||
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो ||

अर्थात मला निरंतर सत्संग लाभो सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो.

माणसाच्या एकंदरीत जडणघडणीवर समाजाचा प्रभाव कळत नकळत पडत असतो,जोवर योग्य व अयोग्य यांची पारख करण्यास मुले समर्थ होत नाहीत, तोवर त्यांच्यावर खेळी मेळीच्या पद्धतीने लक्ष ठेवणे आवश्यक होते.
अर्थात हे सर्व करताना आई बाबा आपल्यावर अनावश्यक निर्बंध लादत आहेत अशी मुलांची धारणा व्हायला नको,म्हणुन मी खेळी-मेळीने असा उल्लेख आवर्जून केला आहे.

चांगले संस्कार असणारी मुले कमी असू शकतात,आणि वाईट सवयी असलेल्या मुलांसोबत राहिल्यावर ती त्यांची कुचेष्टा करायला लागतात.
वाईट सवय असलेली छोटी मुले,चांगल्या मुलांवर आपले श्रेष्ठत्व गाजवू शकतात,त्यामुळे आपल्यात काहीतरी कमतरता आहे अशी भावना निर्माण होते,आणि त्या नसलेल्या कमतरतेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मग मुले वाईट मार्गाचा अवलंब करतात,व्यसनाधीन होतात.

त्यामुळे वाढी दरम्यान सुरुवातीच्या काही वर्षात,मुले कुठे जातात,एकमेकांशी कशा संदर्भात बोलतात/चर्चा करतात, कोणत्या प्रकारचे खेळ खेळतात याचे दुरूनच का होईना पण निरीक्षण करावे,एखादी गोष्ट, प्रसंग आक्षेपार्ह वाटल्यास,खेळून घरी आल्यावर मुलांसोबत योग्य वेळ पाहून मग चर्चा करावी.

चंदनाच्या सहवासात वाढणाऱ्या बाभळीला सुद्धा चंदनाचा सुगंध नकळतपणे जडतो,परीस स्पर्शाने लोह सुद्धा सुवर्णस्वरूप होते,याउलट गोड आंब्यांनी भरलेल्या टोपलीतील एक आंबा जरी नासका निघाला तरी सर्व आंबे नासवतो.

अशाप्रकारे,सुसंवाद,सुसंगत,आत्मविश्वास,सकारात्मकताधाडस,आणी मेहनत यांच्या जोरावार,एक चांगली सुसंस्कृत पिढी घडवण्याचा पाया आपण रोवूया.संस्काराची ही शिदोरी सोबत घेऊन मी ही निघालेय,माझ्या पाल्ल्याच्या संगोपनाची धुरा संभाळायला.

तुम्ही ही चला, एका सुसंस्कृत पीढीच्या घडवणूकीच्या प्रवासाला….

                                           ✒️लेखिका:-रेणुका व्यास
                                                                 पुणे
                                                     मो:-8378995535

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620