कोरोनामुळे गेवराई आगाराला दहा कोटींचा फटका तोट्यात धावतेय लालपरी

14

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.1सप्टेंबर):-कोरोनामुळे गेवराई आगाराला जवळपास दहा कोटी रुपयांचा फटका बसला असून, सहा महिन्यांपासून एकाच जागेवर उभ्या असलेली लालपरी गेल्या आठवडयापासून रस्त्यावर धावू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, बसेस सुरू झाल्या असल्यातरी कोरोना महामारीने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असल्याने, प्रवाशांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे आगारातील कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊन काळात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सहा महिन्यापासून एकाच जागेवर उभ्या होत्या. आगार परीसरात शुकशुकाट होता. गेवराई आगारात जवळपास सत्तर बसेस प्रवाशांना सेवा देतात.

आगाराचे एकुण 230 कर्मचारी सेवेत आहेत. येथील आगाराला प्रवाशी उत्पन्नातून महिन्याला दीड ते दोन कोटी रुपये मिळतात. सहा महिने बससेवा पूर्णपणे लॉकडाऊन आहे. आगारात बस उभ्या राहिल्या होत्या. आगारात चालक आणि वाहक बसून होते. विशेष म्हणजे, या आगारात 40 टक्के कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करून कुटुंबाची उपजिविका भागवितात. दोन महिन्यापासून पगार नाही. बंदच्या काळात पगारात कपात करून पेमेंट दिल्याची माहिती आहे.

निव्वळ पगारावर असलेल्या कर्मचार्‍यांनी अंग मेहनत करून उदरनिर्वाह केल्याचे समजले आहे. गेल्या आठवडयात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. एका आसन व्यवस्थेवर एकच प्रवाशी बसवला जात आहे.बस निघायच्या आधी, बसला सॅनिटाईज केले जाते. प्रवाशांना मास्कचे बंधन असून, नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रवाशांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारची लालपरी रस्त्यावर धावू लागल्याचे चित्र आहे.