पीक कर्जा संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडेंनी यांनी घेतली बँकांची झाडाझडती

    41

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

    अंबेजोगाई(दि.1सप्टेंबर):-पीककर्ज वाटपा संदर्भातील तक्रारींचा विचार करत आयोजित बँकर्सच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बँकांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी पीक कर्जाचे टार्गेट व वाटप करण्यास टाळाटाळ करत असणाऱ्या बँकांविरुद्ध थेट कारवाई करणार असून नोटीस पिरेड ठरवून त्या आत कर्जाचे प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास त्या बँकांमधील शासकीय डिपॉझिट काढून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्य शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व नव्याने कर्ज घेऊ इच्छिणारे शेतकरी या सर्वांनाच पीक कर्ज देणे क्रमप्राप्त असून, याबाबतच्या सर्वात जास्त तक्रारी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांसह काही बँकांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून ही उदासीनता संपवून कर्ज वाटपाचा वेग न वाढविल्यास तातडीने कारवाई करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना ना. मुंडेंनी दिले आहेत.

    या बैठकीस आ. प्रकाशदादा सोळंके, आ. संजय दौंड, जि.प. अध्यक्षा सौ. शिवकन्या शिरसाट, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यासह विविध बँकांचे प्रमुख अधिकारी/प्रतिनिधी उपस्थित होते.विविध बँकांमध्ये आतापर्यंत दाखल झालेले १३६०० अर्ज प्रलंबित असून, एकट्या डिसीसी बँकेकडे ठरवलेल्या टार्गेट पैकी २८२ कोटी रुपये रक्कम वाटप आणखी बाकी आहे.कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या ७४९३८ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपये नव्याने कर्जवाटप आतापर्यंत केले असून, ही संख्या वाढवणे बँकांकडून अपेक्षित आहे. कर्जमाफी मिळालेल्या नव्याने कर्ज अपेक्षित असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज देणे अनिवार्य आहे.