वाशी येथील कुंभार यांनी शेतकऱ्याच्या रूपातील शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून जपले पर्यावरण

27

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.2सप्टेंबर):-वाशी (करवीर) येथे गणेश उत्सव थाटात करायचा आणि तोही पर्यावरणाचा समतोल राखत या हेतूने कृषिभूषण विलास कुंभार यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी कायमस्वरूपी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. शेतकऱ्याच्या रूपातील दोन फूट उंचीची ही मूर्ती खास बनवून प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाचे हेच रूप त्यांच्या घरी आत्ता विराजमान होणार आहे.

अत्यंत रेखीव, सुबक अशा मूर्तीचे काम हे स्थानिक कारागीरानेच केले आहे. सर्वसाधारणपणे सध्या बाजारपेठांमध्ये काही प्रमाणात फायबरच्या आणि अधिक तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या गणेश मुर्ती वापरण्याची पद्धत आहे; पण कुंभार यांनी शाडू पासून बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत नवीन आदर्श निर्माण केला आहे यासोबतच त्यांनी शाडूच्या छोट्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली असून, या मूर्तीचे विसर्जन परिसरामध्ये असणाऱ्या कृत्रिम जल कुंडामध्ये केले.

तसेच या शाडूचा वापर वृक्ष लागवडीसाठी केला गेला. गणेश उत्सवानिमित्त स्त्रियांना व शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी आकर्षक अशी पर्यावरणपूरक आरास बनवली होती. दोन महिन्यांहून अधिक काळ परिश्रम घेऊन त्यांनी ही आरास बनवली होती. यामध्ये त्यांच्या पत्नी, मुले, सुना व नातू यांचे सहकार्य लाभले.