अठराशे रुपये

38

✒️लेखक : राहुल बोर्डे,पुणे
मो : 982296652

 ▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

साधारणतः २ वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय असलेला “गुलाबजाम” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एका अपघातानंतर सोनाली कुलकर्णी यांना अवगत असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो असे दाखवले आहे. या अपघातानंतर त्यांना अंक गणित, बेरीज, वजाबाकी तसेच पैशाचा व्यवहार कसा करायचा या सर्वच गोष्टीचे ज्ञान हरवताना दाखवले आहे. पैशाचा व्यवहार करताना नेमके किती पैसे द्यायचे किंवा परत घ्यायचे याचा त्यांना अंदाज येत नसतो. त्यामुळे अनेक ठिकाणी व्यवहारात त्यांची फसवणूक झाल्याची कबुली त्या स्वतःहून त्यांच्या मित्रा कडे देतात.

या चित्रपटाची आत्ता अचानक आठवण येण्याचे कारण म्हणजे दोनच दिवसापूर्वी सोशल मीडिया वर १८०० रुपयावरून काही युवकांशी वाद घालणाऱ्या एका महिलेचा व्हायरल झालेला व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रथम दर्शनी असा निष्कर्ष निघतो की सदर महिला निरक्षर आहे आणि तिला अंक गणिताचे तसेच बेरीज, वजाबाकी चे ज्ञान नाहीये. हे ज्ञान नसल्यामुळे व्हिडिओ तील युवकांकडून तिला कामाचे १८०० रुपये प्राप्त झालेले असताना देखील तिला व्यवस्थित हिशोब करता येत नाहीये किंवा त्या युवकांनी हिशोब समजावून सांगितला तरीही तो हिशोब तिच्या लक्षात येत नाहीये. सुरुवातीला हा व्हिडीओ खूप मनोरंजक वाटत असला तरीही नंतर शांतपणे विचार केल्यावर १८०० रुपये म्हणजे त्या महिलेच्या दृष्टीने किती मोठी रक्कम आहे हे लक्षात येते. कदाचित त्या १८०० रुपयात तिला संपूर्ण कुटुंबाचा पूर्ण महिन्याचा खर्च भागवावा लागत असेल म्हणून ती एवढ्या पोटतिडकीने वाद घालताना दिसत असेल. तो व्हिडिओ मनोरंजनाचा भाग बाजूला ठेवून बघितला तर भारतात कमी शिकलेल्या, निरक्षर असणाऱ्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या असंख्य स्त्री-पुरुषांचे प्रतिनिधित्व करतो. १८०० रुपयांचा झालेला घोळ असंख्य निरक्षर स्त्री, पुरुष कदाचित रोजच त्यांच्या दैनंदिन जीवनात काम करताना अनुभवत असतील.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये साक्षरतेचे प्रमाण हे साधारणतः ७४% टक्के होते. यामध्ये पुरुष साक्षरता ८२% तर महिला साक्षरतेचे प्रमाण ६५% टक्के होते. पुढील जनगणनेत साक्षरतेचे प्रमाण किती बदलले आहे हे आपल्याला कळेलच. निरक्षर लोकांना पैशांचा व्यवहार करताना काही ठराविक ठोकताळे बांधूनच व्यवहार करावा लागतो. जसे की ते नोटांच्या रंगावरून अंक लक्षात ठेवतात किंवा एका ठराविक पद्धतीनेच व्यवहार करण्याला प्राधान्य देतात. व्यवहारातील आकडे बदलले की मग त्यांचा घोळ होऊ लागतो. आपण केलेल्या कामाचे नेमके किती पैसे घ्यायचे किंवा आपल्याला समोरून जास्त पैसे आले असेल तर नेमके किती पैसे परत द्यायचे हे लगेच त्यांच्या लक्षात येईलच असे नाही. त्यांच्या संपर्कात येणारा आणि यांच्याकडून काम करून घेणारा व्यक्ती जर धूर्त असेल तर अशा स्त्री-पुरुषांची बरेच वेळेस फसवणूक देखील होते.

निरक्षर आणि गरीब कुटुंबातील स्त्री-पुरुष बरेच वेळेस पोटा पाण्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांकडे काम करताना दिसतात. हा कंत्राटदार त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार करत असेल तर ठीक नाहीतर अनेकदा असे होते की रजिस्टरवर कामगारांकडून अंगठा घेताना लिहिलेली रक्कम वेगळी असते आणि हातामध्ये मिळणारा पैसा कमी असतो. ही तफावत त्या कामगारांच्या लक्षात येतेच असे नाही. आपल्याशी होणाऱ्या व्यवहारात तफावत निर्माण होत आहे असे जर त्यांना वाटलेच तर ते अठराशेच नव्हे तर कदाचित शंभर – दोनशे रुपयासाठी देखील समोरच्या व्यक्ती सोबत वाद घालू शकतात. इतरांसाठी शंभर – दोनशे रुपये ही रक्कम छोटी असली तरीही त्यांच्या दैनंदिन जीवनमानाच्या दृष्टीने ती बरीच मोठी रक्कम असू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत वाद घालताना थोडी संवेदनशीलता ठेवणे जरुरी असते. काही वेळेस व्यवहार समजून सांगताना त्यांची चूक असेल तरीही ती चूक त्यांना लक्षात येईल अशा सोप्या पद्धतीने समजावून सांगावी लागते. अशा वेळी हातात घेतलेले कॅल्क्युलेटर फारसे मदतीला येईलच असे नाही.

समोरची व्यक्ती कमी शिकलेली असल्याने आणि एक एक रुपया त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा असल्याने ती व्यक्ती भाबडेपणातून वाद घालत आहे किंवा जास्त पैसे मिळवण्यासाठी धूर्तपणा करण्याचा प्रयत्न करत आहे हे ओळखण्याचे कसब आपल्या अंगी असावे लागते. ज्यांच्यामध्ये हे ओळखण्याचे कसब असते ते सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओ कडे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघायचे की संवेदनशीलतेने बघायचे याचा नक्कीच योग्य निर्णय घेऊ शकतात.