✒️वर्धा प्रतिनिधी(पियुष रेवतकर)
वर्धा(दि.29जून):-स्थानिक कस्तुरबा रुग्णालयात चालत असलेला गैरप्रकार व कामगारांवरती होत असलेल्या अन्यायाबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी तसेच फईम उद्दीन नझीर काझी(सुरक्षा रक्षक)यांची बेकायदेशीरपणे केलेली बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी समता सैनिक दलाच्या वतीने अप्पर आयुक्त नागपूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कस्तुरबा रुग्णालयात सिक्युरिटिमध्ये चालत असलेल्या गैरप्रकारांबाबत व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यासंदर्भात तसेच न्याय मिळण्याकरीता व होत असलेल्या अन्यायाला आळा बसण्याकरीता निवेदन दिले असता प्राईम गार्ड सिक्युरिटी सर्विसेस व कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सुरक्षा अधिकारी यांनी दिनांक १/६/२०२२ पासुन कुठलेही कारण नसतांना किंवा कुठलिही नोटीस अथवा पुर्व सुचना न देता फईम नझीर काझी यांची जाणून बुजून ड्युटी लावण्यात आली नाही व दिनांक ६/६/२०२२ ला ताबडतोब बेकायदेशीरपणे त्यांची बदली चंद्रपूर पाँवर प्लान्ट येथे करण्यात आली. सदर बदली ही हेतुपुरस्सर करण्यात आली आहे असे निदर्शनास येते.
कस्तुरबा हेल्थ सोसायटी येथील सुरक्षा एजन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्य व भोंगळ कारभार सुरु आहे तो खालील प्रमाणे:
१)सुरक्षा रक्षकांकडून सव्वीस ड्युटी करून घेतल्या जातात व २५ ड्युटीचा पगार दिल्या जातो.ओव्हर टाईम केलेल्या ड्युटीचा पैसा हा सुरक्षा इंचार्ज व सुपरवायझर यांच्या खात्यात जमा होतो. यातील अर्धा पैसा सुपरवायझर स्वतःकडे ठेवून घेतो व उर्वरीत पैसे हे गार्डकडे जमा होतात.
२)काही गार्ड २० दिवस ड्युटी करुन सुद्धा त्यांच्या खात्यात ३० दिवसाचा पगार जमा केल्या जातो.
३)पगाराची पावती सुद्धा दिल्या जात नाही.
४) पी.एफ.कापल्या जातो पण भरल्या जात नाही. त्यातही मोठा घोळ झालेला आहे.
५)दारुच्या आणि मटनाच्या पार्ट्या घेऊन नवीन गार्डला ड्युटी दिल्या जाते.
६)सुरक्षा अधिकारी यांच्याकडे चर्चा करीता गेले असता ते उदधटपणे वागणूक देऊन मारण्याच्या व पोलीस स्टेशनच्या धमक्या देतात.
७)व्यवस्थापनासमोर बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यांचे मतही ऐकून घेतले जात नाही.
वरील सर्व बाबींचा गंभीरतेने विचार करून आपण योग्य ती कारवाई करावी व कार्यालयातील एजंसी व सुरक्षा अधिकारी यांच्याशी चर्चा घडवून आणावी.
यापुर्वी आपल्या कार्यालयातील कामगार अधिकारी मा.धुर्वे साहेब यांच्या कालखंडात जी व्यक्ती सोसायटीमध्ये कार्यरत असेल त्यांची बदली करता येणार नाही असे दिनांक २२/०४/२०१६ रोजी कस्तुरबा हेल्थ सोसायटी येथील पदाधिकारी व कंत्राटदार व सर्व सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते सहिनीशी सकारात्मक निर्णय घेऊन एकमताने मान्य करण्यात आला. कंत्राटदार जरी बदलले तरी ज्या कामगारांना त्या कामावर ५ वर्ष झाले असेल त्याच कामगारांना कंत्राटदार कामावर ठेवेल असाही निर्णय त्या सभेमध्ये पारीत करण्यात आला होता.मात्र सभेमध्ये घेतलेले सर्व निर्णय डावलून हुकूमशाही पद्धतीने फईम नझीर काझी (सुरक्षा रक्षक) यांची बदली करण्यात आली. ही बेकायदेशीरपणे केलेली बदली रद्द करण्यात यावी व त्यांना पुर्वीच्या ठिकाणी कामावर रुजू करण्यात यावे अशी आपणास या निवेदनाद्वारे मागणी करण्यात येत आहे.अन्यथा समता सैनिक दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे,समता सैनिक दल वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, मार्शल फईम उद्दीन नझीर काझी, मार्शल आरीफ शेख आदी उपस्थित होते.