जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या सेवा आता संकेतस्थळावर

25

🔸महास्वयंम संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.22सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा आता संकेतस्थळाच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहे. हे संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी समजण्यास अतिशय सुलभ असून पुरविण्यात आलेल्या सर्व सुविधा गरजू उद्योजकांसाठी निश्चितच उपयुक्त आहेत. त्याकरीता उद्योजकांना www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या उद्योजकांनी संकेतस्थळावर नोंदणी केलेली नाही त्यांनी त्वरित नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा:-

उद्योजक म्हणून नोंदणी करणे. नवीन प्लॉन्ट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे. प्रोफाईल अद्यावत करणे जसे- पत्ता, संपर्क अधिकारी, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, यामध्ये दुरुस्ती करणे,पासवर्ड रिसेट करणे. वेळोवेळी निर्माण होणारी रिक्तपदे अधिसूचित करणे यामध्ये, नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे तसेच विनामुल्य पदांची प्रसिध्दी देणे. सदर यादी पीडीएफ किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करणे. मुलाखती आयोजित करणे. प्राथमिक रित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य संदेश पाठविण्यांची सुविधा. मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट नोंदविणे.

सीएनव्ही ऍक्ट 1959 अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्र (ईआर-1) ऑनलाईन सादर करणे. तसेच या कायद्याच्या कलम क्र.4 नुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये निर्माण झालेली रिक्तपदे प्रत्यक्षात भरण्यापूर्वी कमीत कमी 15 दिवस अगोदर स्थानिक जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे रितसर अधिसूचित करणे आवश्यक आहे.विविध रोजगार मेळाव्यांची सर्वकष माहिती मिळविणे,त्यासाठी रिक्तपदे अधिसूचित करुन थेट सहभाग नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेमध्ये सहभाग घेणे,प्रशिक्षणार्थीची निवड करणे त्यांना योजनेमध्ये समाविष्ट होण्यास अनुमती देणे,उमेदवारांची मासिक उपस्थिती नोंदविणे,विद्यावेतन प्रतिपूर्ती मागणी सादर करणे, ही सर्व कामे ऑनलाईन पध्दतीने करता येतात. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच केंद्र शासनामार्फत जिल्हा कार्यालयाव्दारे राबविण्यात येत असलेले विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व त्यामध्ये सहभाग घेणे.

उद्योजकांसाठी विविध शैक्षणिक पात्रता व कौशल्य प्राप्त नोंदणीकृत होतकरू उमेदवारांची नोंदणी झाली तर उमेदवारांसाठी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत उद्योग, उपक्रमातील नोंदणीकृत सक्षम उद्योजकांचा नोंदणीपट उपलब्ध आहे. नोंदणी करण्यासंदर्भात काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या chandrapurrojgar@gmail.com व asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in या ई-मेल द्वारे कळवावे किंवा 07172-252295 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.