स्पर्धेच्या युगात

41

मित्रांनो अलिकडे स्पर्धा किती वाढल्याय ना!आणि त्यातच आईवडिलांच्या अपेक्षा सुद्धा किती वाढल्याय! आज सर्वांत जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कुठल्या क्षेत्रात होत आहे?, तर मेडिकल, इंजिनीअरींग ला जाणाऱ्याच मुलांच्या…याच उत्तर काय?तर आई-वडिलांना आहे माझ्या मुलाने इंजिनीअर व्हावं, आई-वडिलांना अपेक्षा आहे माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं,तो ‌‌‌मेडिकलला जातो आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करायला, इंजिनीरिंगला जातो आईवडिलांच्या,,,,अपेक्षा पूर्ण करायला!त्याला काय वाटतं हे आम्ही बघतच नाही आणि ज्यावेळी नावडत्या क्षेत्रामध्ये पाऊल पडतं त्यावेळी तिथलं त्याला काहीच जमत नाही, किंवा त्याला जमवायचंच नसतं.

नाईलाजाने त्याला नकाे ते मार्ग पत्करावे लागतात आणि आता अशाच अपेक्षेपोटी एक आई आपल्या मुलाला कसे यमसदनी पाठवते हे मी तुमच्यासमोर माझ्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो,एका स्त्रीला लग्नानंतर आठ वर्षांनी बाळ होतं; म्हणून घरात आनंदाला पारावार नसतो. तिला खूप हर्ष होतो. म्हणूनच त्या बाळाचं नाव ती हर्ष ठेवते. त्याचा पहिला वाढदिवस पण ती खूप थाटामाटात साजरा करते. त्याचे बोबडे बोल तिच्या मनाला मोहीत करायचे. हर्षला संपूर्ण घरभर दुडूदुडू धावतांना बघून कुठेतरी ठेच लागून पडेल या विचाराने धस्स व्हायचंय हो तिच्या मनात !कारण आईचं मन! हर्ष आजारी पडला ना कि रात्रभर डोळा लागायचा नाही तिचा. ती हर्षच्या आवडी-निवडी फार मन लावून जपायची.

खूप स्वप्न रंगवली आहेत हो तिने तिच्या हर्षसाठी. हर्षने विश्वनाथन आनंदसारखेच चेसमध्ये खूप नाव करावे अशी तिची मनापासून इच्छा. कारण चेस हा तिच्या अतिशय आवडीचा खेळ. तसेच तो शिक्षणातही समोरच असावा असा तिचा अट्टाहास.ती तर म्हणते,”आमची आधारकाठी आहे हर्ष. आमच्या वंशाचा दिवा आहे तो. माझा जीव की प्राण आहे माझा हर्ष. तेव्हा त्याला चांगल्या शाळेत टाकायला नको?” बघता बघता हर्ष तीन वर्षाचा होतो. तेव्हा ती हर्षच्या वडिलांना म्हणते.

आई:-अहो,आपल्या हर्षला कॉन्व्हेंटमध्ये टाकायचे म्हणते मी.
वडिल:-अगं ते ठिक आहे. पण मी म्हणतो सरकारी शाळा तरी काय वाईट आहे. असे कितीतरी उदाहरण आहेत की मोठ-मोठ्या व्यक्ती जसे अब्दुल कलाम सरकारी शाळेतूनच समोर गेलेत ना!मग कॉन्व्हेंटमध्ये का?
आई:-अहो,पण मी म्हणते आपल्याकडे काय कमी आहे?मी पण जॉब करतेच ना!ते काही नाही. मला माझ्या हर्षला कॉन्व्हेंटमध्येच टाकायचे आहे.
वडिल:-बरं बाई ठिक आहे.
आई:-झाली एकदाची माझ्या बाळाची ॲडमिशन.
(ती हर्षला शाळेसाठी तयार करत असते. तेव्हा हर्ष म्हणतो. )
हर्ष:-आई, आपण कुठे चाललो?
आई:-हर्ष मी तुझं नाव शाळेत घातलबाळ आजपासून तू शाळेत जायचं. खूप अभ्यास करायचा. तुला शिकून मोठ्ठं व्हायचं आहे. ठिक आहे?तेव्हा हट्टीपणा करायचा नाही. मी घरी आले की मला अभ्यास करतांना दिसला पाहिजे. कळलं की नाही?
हर्ष:-हो आई.
आई:-शहाणं माझं बाळ.
(हर्ष वार्षिक परिक्षेमध्ये पहिल्या नंबरने पास होतो. घरी येऊन तो आई-बाबांना सांगतो. )
हर्ष:-आई-बाबा माझा 1st नंबर आला.
आई:-अरे वा!छान. हे बघ हर्ष मी तुझा चेसचा क्लास लावलाय. उद्यापासून शाळेतून आला की तुला क्लासला जायचे आहे.
हर्ष:-मग मी खेळायला‌ कधी जाऊ?
(तेव्हा बाबा म्हणतात….)
वडिल:-आतापासून काय गं क्लास!खेळू दे बिचाऱ्याला. खेळायचं वय आहे त्याचं.
आई:-ते काही नाही. एकतर तुम्हाला त्याच्यासाठी वेळ नसतो,शिवाय मी पण जॉब करते. तसेही खेळात काय दिवे लावणार आहे? क्लासमध्ये गुंतला तरी राहिल. स्पर्धेचं युग आहे,हे कळत कसं नाही तुम्हाला…..
वडिल :-कळतंय गं मला पण.
आई:-पण बीन काही नाही. हर्ष उद्यापासून मुकाट्याने क्लासला जायचं.
हर्ष:-अगं आई,पण मला बॅट-बॉल खेळायला आवडतं ना!
आई:-ते काही नाही,मी सांगते तेच करायचं. मी तुझ्या भल्यासाठीच करते ना?
(मित्रांनो हर्षला चेसमध्ये इंट्रेस नव्हता,तरी पण तो आईच्या सांगण्यावरून क्लासला जायचा, शाळेत जायचा. आई रागावेल या भितीपोटी तो अभ्यास करुन पहिलाच नंबर मिळवायचा. चेसमध्ये पण त्याचा पहिलाच नंबर यायचा. एक दिवस क्लास टिचर हर्षच्या घरी येतात व त्याच्या आईला म्हणतात)
टिचर:-तुमचा हर्ष खूप हुशार आहे हो. शाळेत पण आणि चेसमध्ये पण त्याचा पहिलाच नंबर येतो.
(हर्षच्या आईची छाती अभिमानाने फुलून येते व ती म्हणते…)
आई:-मग,मी त्याला बजावूनच ठेवलंय की,आपल्याला पहिलाच नंबर पाहिजे म्हणून.
(बघता बघता हर्ष दहावीला जातो आणि त्यातच हर्षचा चेससाठी नॅशनल लेवलवर नंबर लागतो. अशातच पैशांची थोडी तफावत असल्यामुळे त्याचे वडिल बॅंकेतून कर्ज काढून त्याला खेळायला पाठवतात. त्यावेळी आई त्याला बजावून सांगते…..)
आई:-हे बघ हर्ष,तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी कर्ज काढलंय;तेव्हा तुला पहिल्याच नंबरनी जिंकून यायचं आहे.
(हर्ष नॅशनल लेवलवर खेळून येतो,पण काय होतय ना मित्रांनो,यावेळी हर्षच्या वाट्याला अपयश येतं)
(तो घरी येतो आणि आईला सांगतो. )
हर्ष:-आई,मी हरलो. मला माफ कर.
(मित्रांनो आपला हर्ष अपयशी ठरला हे तिला सहनच होत नव्हतं. अपयश कसं पचवायचं हे तिला ठाऊकच नव्हतं.रागाच्या भरात ती म्हणते..)
आई:-छान. असेच काम करायचे. आता बाबांनी घेतलेलं कर्ज, त्याचं काय? आता दहावीत तरी नंबर सुटायला नको म्हणजे झालं. काय दिवे लावणार आहे हा मुलगा,कुणास ठाऊक! आई-वडिल दोघेही त्याच्यावर नाराज होतात. त्यांचा त्याच्या मनावर फार मोठा परिणाम होतो. दहावीची परिक्षा जवळ येते. हर्षचे अभ्यासात मन लागतंच नाही. तो सतत विचारात मग्न असतो. एकलकोंडा बनतो. दहावीच्या परिक्षेत अर्थातच तो काठावर पास होतो. हर्ष रिझल्ट बघायला जातो. त्याला धक्काच बसतो.
हर्ष:-मी काठावर पास झालो. या काठावर पास होण्याला काय अर्थ आहे. आता आई-बाबा दोघेही मला रागावणार. आता मी माझ्या आईला तोंड नाही दाखवू शकणार. आता माझ्या जगण्याला काय अर्थ?आता मला या जगाचा निरोप घ्यावाच लागेल ,घ्यावाच लागेल. आई हरलो,आई हरलो मी. मला माफ कर. तुझ्या हर्षला माफ कर.
(हर्ष घरातंच फासाला लटकतो. आई घाई-घाईतच जॉबवरुन घरी परत येत असते. तेव्हा स्वत:शीच गुनगुनते…)
आई:-आज माझ्या हर्षचा रिझल्ट आहे. मी घरी त्याच्या आवडीची डिश तयार करुन ठेवली आहे. तेव्हा मी आता घरी जाते. सोबत पेढे पण घेऊन जाते.
(आई दार उघडते. हर्षला फासाला लटकलेले पाहून…)
आई:-(मोठ्याने) हर्ष…नाही नाही माझं बाळ. हर्ष,हर्ष हे काय केलंस बाळा. उठ,उठ ना रे माझ्या राज्या. अहो उठवाना तुम्ही त्याला. बघा ना कसा शांत झोपलाय तो. (त्याच्या हातातला रिझल्ट बघून) तुला कमी मार्क पडले म्हणून असा शांत झोपलाय. मला चालेल रे माझ्या सोन्या. मला काही नको. मला तू हवा आहेस. उठ ना रे नको रे असा नाराज होऊ तुझ्या या आईवर. अहो कुणीतरी सांगा ना याला. उठ ना म्हणावं. माझं बाळ. हे काय अहो,अहो कुठे घेऊन चालले तुम्ही त्याला. थांबा,थांबा माझ्या बाळानी सकाळपासून काही खाल्लं नाही हो. त्याच्या आवडीचा खाऊ बनवलाय हो. बाळा कसा घास भरवू रे तुला. सांग ना रे सोन्या. नाही, नाही मी नाही घेवुन जाऊ देणार माझ्या बाळाला. नका नेऊ हो त्याला. हर्ष,हर्ष माझं बाळ…….
(नंतर हर्ष आत्मा बनून येतो व म्हणतो… …)
हर्ष:-आई….आई…..आई…..
आई:-माझा हर्ष.
हर्ष:-हो तुझाच हर्ष- तू मला न पेलणाऱ्या लादलेल्या ओझ्यामुळे तुला कायमचा दूर सोडून गेलेला तुझा हर्ष. आई हा निर्णय घ्यायला तुम्ही मला भाग पाडलं. या स्पर्धेच्या युगात माझा तू बळी घेतला. आई मला तुझी साथ हवी होती गं!तू माझ्यावर संस्कार करायला हवे होते. शिक्षण म्हणजे ओझं करुन ठेवलंय होतं तू माझ्यावर. तू माझा विचार कधी केलाच नाही. तू मला कधी निसर्गाशी समरस व्हायला शिकवलंच नाही. मला सायंकाळी देवाजवळ शुभंकरोती म्हणायला,थोर-पुरुषांच्या गोष्टी सांगायला तू घरी कुठे असायची?घरी आल्यावरही तुला वेळ कुठे असायचा माझ्यासाठी?मला सारखं वाटायचं तुझ्याजवळ आपलं मन मोकळं करावं. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून तुझ्या मायेच्या पदराची उब मला मिळावी. तुझ्याशी खेळावं-बोलावं खूप वाटायचं गं!पण नाही ,वेळ कुठे होता तुझ्याजवळ? जिजामाता,श्यामची आई तुला कळलीच नाही. तुला माझी हार मान्यच नव्हती. आज तू मला यशासोबत अपयश कसं पचवायचं हे जर तू मला शिकवलं असतं ना,माझं अपयश पोटात घालुन समोर धैर्याने कसं चालायचं हे जर तू मला शिकवलं असतं, माझी हार मान्य केली असती तर तुझा हर्ष तुला सोडून गेलाच नसता. माफ कर आई मला. जातो मी.
आई:- हो….हो…. मान्य आहे मला मी चुकले. तुला न पेलणाऱ्या स्वप्नांच्या दुनियेत रंगले. फार जिवापाड प्रेम करायचे रे तुझ्यावर. हो..हो…मान्य आहे मला. मी डोळे लावून तुझ्यावर प्रेम केले. अपेक्षांचं ओझं तुझ्यावर लादलं ,मान्य आहे मला. मी डोळे उघडे ठेवुन तुझ्यावर प्रेम करायला हवं होतं. चुकले मी. पण बाळा तू असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होतास. आयुष्य हे एकदाच मिळतं. तू चार दिवस कुठे बाहेरगावी जाऊन आम्हांला पत्रातून कदाचित तुला काय वाटतं किंवा आमची चूक तू आम्हांला दाखवून दिली असती बाळा,तर आमचे डोळे उघडले असते. आम्ही तुला छातीशी धरलं असतं. आपण नव्याने जगलो असतो. आपल्या आयुष्याचा शेवट गोड झाला असता रे माझ्या सोन्या बाळा. थोडा तरी आमचा विचार करायला हवा होतास‌‌ तू.
मित्रांनो मला पालकांना सांगायचे आहे- आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रेम, शिस्त आणि संस्काराने घडवा. आणि हो विद्यार्थी‌ मित्रांनो, आयुष्य जगणे ही एक कला आहे. त्या कलेत पारंगत व्हायला शिका. तेव्हा अशा आई-वडिलांच्या रागावण्यावरून टोकाचा निर्णय घेऊ नका. त्यांना तुम्ही हवे आहात याचे भान ठेवा.
____ धन्यवाद!___

✒️लेखिका:-दिपाली राजेश चावरे
ळवेशपूरा, अचलपूर सिटी
जि:-अमरावती
मो:-9552806260

▪️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620