या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

112

माणसाचे जीवन हे क्षणभंगुर आहे. या क्षणभंगुरतेची अनेक वेळा प्रचिती येते. अचानक काहीतरी घडते. होत्याचे नव्हते होते. कधी स्वप्नातही विचार केला नाही असे काहीतरी घडून जाते. चालता बोलता माणसे निघून जातात. ही जीवनाची क्षणभंगुरता कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अधिक प्रकर्षाने जाणवली. जगापासून ते आपल्या घरापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संपूर्ण जगात या विषाणूने हाहाकार घातला आहे. मृत्यू तांडव चालू आहे. कोणत्या व्यक्तीला कधी प्रादुर्भाव होईल ? याचा काही नेम नाही. कोरोना झाल्यामुळे आलेली मृत्यू समीपता आणि त्यामुळे निर्माण झालेले भितीदायक वातावरण.

एका बाजूला या भीतीयुक्त वातावरणामध्ये प्रचंड आशावादाने मनुष्य आपले जीवन जगत आहे. दुसरीकडे उदास मानसिकतेने आणि आपल्या भावनेचा झालेला कोंडमारा यामुळे त्रस्त झालेली माणसे आपली जीवनयात्रा संपवत आहेत. एकीकडे मरणाच्या भितीने हजारो किलोमीटर प्रवास करून आपल्या गावाचा आणि आपल्या घराचा रस्ता धरणारी माणसे. प्रचंड यातना सहन करून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे संपूर्ण भौतिक सुखाने युक्त असणाऱ्या संपन्न जीवनशैलीत स्वर्गीय सुख अनुभवणारे लोक मात्र मरणाला जवळ करत आहेत.

काल-परवा घडलेल्या घटनेने मन सुन्न झाले. सुप्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आपल्या प्रशस्त अशा राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रत्येक जीव अनमोल असतो म्हणून यावर भाष्य करणे योग्य नाही. तरीदेखील सर्व प्रकारची भौतिक संपन्नता, प्रचंड मोठ्या प्रमाणामधली पद, प्रतिष्ठा, आर्थिक भरभराट, स्वर्गीय सुखाला लाजवेल अशी जीवनशैली, तरीदेखील जीवन यात्रा संपून टाकावी असे का वाटले असेल ? या प्रश्नाने मनात काहूर माजवले. मागील काही वर्षापासून माणूस आर्थिक चंगळवाद, भौतिक सुखासीनता, पाश्चिमात्य संस्कृतीचे अघोरी अंधानुकरण या सर्व मायाजाळात गुंतत चाललाय. आम्ही आमची सुखी, समृद्ध आणि संपन्न भारतीय संस्कृती विसरून जात आहोत.

आर्थिक सुबत्ता, भौतिक संपन्नता, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमवलेली स्थावर-जंगम मालमत्ता, प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा या सगळ्यांपेक्षा आनंद, सुख, समाधान या वेगळ्या संकल्पना आहेत. हे दिवसेंदिवस विसरत चाललो आहोत. मागच्या काही वर्षापासून माणूस निव्वळ भौतिक सोयी-सुविधा आणि भरमसाठ धनदौलत, संपत्ती कमावण्याच्या मागे लागला आहे. स्पर्धेच्या आजच्या युगात आम्ही विसरत चाललोय पैसा हे साध्य नसून; साधन आहे. माणसे, माणसामाणसातील प्रेम,आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, जीवाभावाचे नाते-गोते आणि माणुसकी हेच आयुष्यात सुख आणि आनंद निर्माण करु शकतात. शोकांतिका म्हणजे या सगळ्यांपासून माणूस भरकटत चालला आहे. माणसातील माणूसपण आजच्या घडीला जिवंत राहिलेले नाही.

सगळं जीवनच कालबाह्य होत चालले आहे. जणूकाही मानवी संवेदनांना एखाद्या विषाणूने ग्रासले आहे. संवेदनाच संपत चालल्या आहेत. कशाचेच सुख वाटत नाही, कशाचे दुःख वाटत नाही. सगळे काही मिळत असले; तरी आनंद वाटत नाही. अफाट धनदौलत, पद, प्रतिष्ठा, मानसन्मान असूनही समाधान नाही. अजून काहीतरी मिळवायचे. अजून काहीतरी पाहिजेच आहे. हे मिळाले की सुखी होऊ. ते मिळाले की समाधानी होऊ. हे चालूच आहे. वस्तू मिळेपर्यंत वस्तूंची किंमत, त्यापासून मिळणाऱ्या सुखाची किंमत फक्त मिळेपर्यंत. एकदा ते मिळाले; की त्याची किंमत मात्र कवडीमोल. एवढ्या प्रचंड हव्यासापाठीमागे लागलाय माणूस की त्याचा शेवट कुठे आणि कसा होईल? याचा अंदाजही लागू शकत नाही.

प्रशस्त, देखणे, टुमदार, सर्व सोयीसुविधांनी युक्त घर आहे ; पण त्या घराला घरपणच उरलेले नाही. सोन्यासारखी माणसे आहेत. आई, बाबा, भाऊ, बहीण पत्नी, मूलंबाळ सगळी-सगळी नाती आहेत. पण त्या नात्यात ओलावाच उरला नाही. प्रत्येक नात्यात ओलावा असावा, तो तसाच टिकून राहावा यासाठी कुणी प्रयत्नही करत नाही. प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार मला काय गरज आहे? माझ्याकडे सगळं काही आहे मला कोणाचीही गरज नाही. पण लक्षात घ्या हा भ्रम आहे.. निव्वळ भ्रम… हे वेळोवेळी सिद्ध झालंय…. कसला पैसा…?… कुणाची धनदौलत…? कुठला मानसन्मान…? कुठली पद, प्रतिष्ठा‌….? कसली स्थावर-जंगम मालमत्ता…? कशाची प्रसिद्धी…? कुठला बढेजावपणा…? एवढे सगळे मिळाले म्हणजे आयुष्य सुखी आणि समृद्ध झाले असे नाही. किती आणि कुठंपर्यंत या सर्वांचा उपयोग…? या सर्वांपेक्षाही आयुष्यात आणखीन काही महत्त्वाचे असते….? भौतिक सुखाने सुख मिळाल्याचा केवळ आभास निर्माण होतो. प्रत्यक्ष समाधान मिळत नाही.

सुख, समाधान, आनंदासाठी आपल्या माणसांचे प्रेम, माया, ममता, आपुलकी, वात्सल्य आणि त्यांचा आनंददायी सहवासच आवश्यक असतो. पैसा, धनदौलत, प्रतिष्ठा मानसन्मान तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू शकत नाही. तुम्हाला कुरवाळू शकत नाही. तुम्हाला कुशीत घेऊ शकत नाही. तुमचे दुःख समजून घेऊ शकत नाही. तुमच्या वेदना त्यांना कळत नाहीत. त्यासाठी आपली माणसेच लागतात.

अभिमान वाटावा असं एक तरी नातं हवं…. ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं की अक्षरशः बांध फुटावा…. कुणाजवळ तरी हंबरडा फोडून रडता यावं… कुणाला तरी सगळं सुख-दुःख सांगता यावं….आयुष्यात कोणीतरी हवं त्याचं सगळं ऐकून घ्यावं आणि ज्याला आपलं सगळं काही सांगावं… कोणीतरी हवं ज्याला आपलं असणं हवंहवंस वाटावं. ज्याला आपलं रुसणं नकोसं वाटावं. आपण आनंदातच राहावं. आपल्या आयुष्यात दुःख येऊच नये आणि आलेल्या दुःखाला सामोरे जाण्याचे धैर्य त्यांनी आपल्याला द्यावं. आपल्या असण्याचा ज्याच्यावर फरक पडावा. आपल्या नसण्याने ज्याला विरह वाटावा. अशी हक्काची जिवाभावाची माणसं आपलं दुःख समजू शकतात. आपल्याला समजू शकतात. या सगळ्या समजून घेण्यामुळेच आपण सुखी,समाधानी, आनंदी राहू शकतो.

कशासाठी जगतो आहोत आम्ही ? आणि कुणासाठी जगतो आहोत आम्ही ? या दोन प्रश्नांची उत्तरे अगदी मध्यरात्री जरी कोणी विचारली तरी ती सांगता यावीत.. या प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत ; तर मात्र माणूस नाईलाजाने आत्महत्येकडे वळतो. आजच्या धावपळीच्या एकविसाव्या शतकात माणसाचे जीवन कसे झाले आहे. यावरील एक सुंदर कविता आठवते. कुणाची आहे माहित नाही पण छान आहे.

 

आऊटडेटेड झाले आयुष्य सारं

स्वप्नही डाऊनलोड होत नाही

संवेदनांना व्हायरस लागलाय

दुःख सेंड करता येत नाही

 

जुने पावसाळे उडून गेलेत

डिलीट झालेल्या फाईल्स सारखे

आणि घर आता शांत असतं

रेंज नसलेल्या मोबाईल सारखे

 

हँग झालेल्या पीसी सारखी

मातीची स्थिती वाईट

जाती माती जोडणारी

कुठेच नाही वेबसाईट

 

एकविसाव्या शतकातील

पीढी भलतीच क्युट

कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली

संवाद झाले म्युट

 

कम्प्युटर च्या चीप सारखा

माणूस मनानं खुजा झालाय

अन मदर नावाचा बोर्ड त्याच्या

आयुष्यातून वजा झालाय

 

फ्लॉपी डिस्क ड्राइव्ह मध्ये

आता संस्कारांनाच जागा नाही

फाटली मने सांधणारा

इंटरनेटवर धागा नाही

 

विज्ञानाच्या युगातील

केवढी मोठी चूक

रक्ताच्या नात्यांनाही लागते

व्हाट्सअप आणि फेसबुक

एका घरात राहत आहोत पण संवाद विसरत चाललो आहोत. हे केवढे दुर्भाग्य आहे. कुटुंबातील माणसे आहेत ; पण कोणत्या न कोणत्या कारणामुळे एकमेकापासून दुरावलेली आहेत. नातेवाईक भरपूर आहेत तरीदेखील अभिमान वाटावा असे एकही नाते नाही. प्रत्येक जण आपापल्या तोऱ्यात, गर्वात, अहंकारात मीपणात काठोकाठ बुडाला आहे. ढीगभर मित्र आहेत पण मन मोकळे करावे असा एकही नाही. अंतकरण मोकळे करावे. हृदयात साठलेल्या सगळ्या वेदना दाखवाव्यात. काळजाला टोचणाऱ्या गोष्टी सांगाव्यात. मनाच्या वेदनादायी जखमांवर फुंकर घालावी. खदखदून हसावे. रडून एकदाच मोकळे व्हावे. असा एकही कुटुंबातील सदस्य, एकही नातेवाईक आणि एकही मित्र नसणे. म्हणजे आपल्या जीवनाचं सर्वात मोठे अपयश आहे.

 

सांगु कशी कुणाला

कळ आतल्या जीवाची

चिरदाह वेदनेचा

मज शाप हाच आहे

 

प्रत्यक्ष जीवनापेक्षा आभासी जीवनामध्ये रममान होण्याचे थांबवा. एकाच छताखाली राहतो, वर्षानुवर्ष, दिवसेंदिवस सोबत आहोत, खूप काळाचा सहवास आहे तरी एकमेकांविषयी एकमेकांना काहीच माहिती नाही. एकमेकांच्या आवडी-निवडी, राग-लोभ, रुसवे-फुगवे, सुख-दुःख, सद्गुन-अवगुन, स्ट्रॉंग पॉईंट-विकपॉईंट काही काहीच माहित नाही. माहीत करून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामध्ये कुणाला रसही वाटत नाही. जो तो आपल्या आपल्या आभासी विश्वामध्ये रमलेला. प्रत्यक्ष समोरासमोर भेटून कोणत्याही गोष्टीच्या शुभेच्छा, अभिनंदन केले नाही तरी चालेल. पण मात्र व्हाट्सअप, फेसबुकवर मात्र शुभेच्छांचा वर्षाव झाला पाहिजे. आपल्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्याची प्रार्थना करणारे, आपल्याला प्रेमाने कुरवाळणारे, मायेने जवळ घेणारे, आपल्याला ओवाळणारे आई-बाबा, पत्नी यांच्यापेक्षा वाढदिवसासाठी आपले स्टेटस ठेवणारे, फेसबुक वर पोस्ट करणारे, आभासी दुनिया तील लोक आम्हाला जास्त जवळचे वाटतात. त्यांच्या शुभेच्छांना त्यांच्या कमेंटला आमच्या जीवनात अधिक महत्त्व आहे. ही शोकांतिका नाही का…?

घरातल्या माणसांना, रोज भेटणार्‍या मित्रांना, आपल्या सोबत असणाऱ्या माणसांना बोलण्यापेक्षा, त्यांच्यासोबत व्यक्त होण्यापेक्षा, आम्ही तासन्तास आभासी दुनियेत रमत आहोत. माणसं जोडा, माणसं जपा, माणसांसोबत रहा. त्यांच्यासोबत बोला एकमेकांचे सुख-दुःख सांगा, ऐका. दुसऱ्याचं मनापासून ऐकून घ्या. मनमोकळेपणानं आपलं त्याला सांगा. आधी दुसऱ्याला समजून घ्या. मग आपल्याला समजून घेण्याची अपेक्षा ठेवा. आभासी दुनियेतून बाहेर पडा. साधं-साधं, सोपं-सोपं, सरळ-सरळ, मोकळं-मोकळं छान जगा. खदखदून हसा, भरभरून बोला,रडून मोकळे व्हा. दुसऱ्याचे दोष सांगताना, त्याला नावे ठेवताना अनेकांना वाचा फुटते पण दुसऱ्याचा गुणगौरव करायला आमच्याकडे शब्द नसतात.चुका तर नेहमीच शोधतो. निंदा आणि टिकाही नेहमीच करतो. कधीतरी निखळ भावनेने मनापासून दुसऱ्याचे कौतुक करा. स्वार्थी सगळेच असतात पण त्याला मर्यादा ठेवा. अभिमानही सगळ्यांनाच असतो पण तो स्वाभिमानापुरताच मर्यादित ठेवा. त्याचा दुराभिमान होऊ देऊ नका. ‘जग हे सारे सुंदर आहे. आपण सुंदर होऊ या.’ असा विचार ठेवा. कुणाला वाईट बोलू नका. कुणाचं वाईट ऐकू नका. कुणाचेही वाईट चिंतू नका. कुणाचेही वाईट करू नका.

मृत्यु हा सगळ्या गोष्टींचा शेवट आहे. मृत्युपश्चात एकमेकांचे वैर विसरण्यापेक्षा आज एकमेकांना शिव्या द्या; पण बोला. नंतर गोडवे गाण्यापेक्षा आज एकमेकांना दोष द्या. पण संवाद चालू ठेवा. नंतर दुर्गुण सुद्धा कसे चांगले होते ? हे सांगण्यापेक्षा आज असणाऱ्या सद्गुना कडे लक्ष द्या. विसरा ती शुल्लक कारणे ज्यामुळे आपसात बेबनाव आहे. अहंकार, गर्व, मीपणा बाजूला ठेवा. कोणीतरी कमीपणा घ्यायलाच पाहिजे त्याची सुरुवात आपल्यापासून करा. हे सगळं आज आत्तापासून करा. कारण सांगता येत नाही कोणता प्रसंग, कोणती घटना, कोणती वेळ, कोणती भेट कोणासाठी शेवटची असेल. म्हणून सगळं विसरा आणि एक व्हा. कशाचाच गर्व ठेवू नका. माणसे आहोत आपण माणसासारखं वागा. माणूस आणि माणुसकी यापेक्षा जगात काहीच मोठे नाही. हे समजून घ्या.

 

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…..

हे फक्त गाऊ नका, ऐकू नका. तर खरंच या जन्मावर आणि या जगण्यावर मनापासून प्रेम करा..

✒️लेखक:-श्री. मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-767733560,7972344128