गावपुढारी पुन्हा निवडणुकीसाठी बाशिंग बांधून सज्ज

93

🔹६४ ग्रामपंचायती
🔸निवडणूक आयोगाच्या आदेशाने लागले वेध
🔹प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.4नोव्हेंबर):-प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता द्यावी तसेच अंतिम प्रभाग रचना २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे बिलोली तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम होणार आहे.

तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण करून कोरोनामुळे स्थगिती दिलेल्या १० असे तालुक्यातील एकूण ६४ ग्रामपंचायतीचा आगामी काळात निवडणुकीचा बिगुल पुन्हा वाजणार असल्याने गाव पुढाऱ्यांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

कोरोनामुळे निवडणूक आयोगाने १७ मार्च रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते. बिलोली तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला स्थगिती दिली होती.तर त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या.आता मात्र निवडणुकीची प्रक्रिया आणि पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरू होणार असल्याने गाव पातळीवर निवडणुकीचा धुराळा उठणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पुढचे वर्ष उजाडणार असल्यामुळे आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.एकदंरीत निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

तालुक्यात ७३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका यापूर्वी पार पडल्या आहेत. १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण झाली. पण कोरोनाने निवडणूक घेता आली.त्यास निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.

त्याचबरोबर मुदत संपणा-या ५४ ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. आगामी काळात तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान यांनी दिली.