बाप हा बाप असतो

    143

    फादर्स डे, मदर्स डे हे पाश्चिमात्य संस्कृतीतील दिखावे गिरी आहे. थोतांड आहे. मातृदेवो भव:l पितृदेवो भव:l ही भारतीय संस्कृती आहे.

    माय-बापा मुळेच आपण आहोत. यांच्यासाठी एका दिवसाने काय होणार आहे. संपूर्ण आयुष्य कमी आहे. म्हणून एकच नाही; सगळेच दिवस बापाचेच असतात. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही वडिलांना यानिमित्ताने शुभेच्छा देऊ नका. त्यांचे स्टेटस व्हाट्सअपला ठेवू नका. त्यांच्याबद्दल फेसबुकला पोस्ट टाकू नका. हे सगळे कराच. त्याचबरोबर या महान व्यक्तीचे हृदयात आढळ स्थान निर्माण करा.

    बापाने जे आपल्यासाठी केलंय त्याला मोल नाही. ते व्यक्त करण्या एवढे शब्दसामर्थ्य कुणाकडेच नाही. प्रत्येक बापाच्या हृदयाच्या तळापर्यंत एकच गोष्ट असते. ती म्हणजे आपली लेकरं….. आणि त्यांचं सुख…. याच साठी बाप आयुष्यभर राबतो. दिवस-रात्र कष्ट करतो. जमेल ते कोणतेही काम करण्याची त्याची तयारी असते. रक्ताचं पाणी करतो. हाडाची काडं करतो. स्वतः प्रत्येक दुःख सहन करतो. आपल्या लेकरांना सुखी ठेवण्यासाठी… कोणताच बाप गरीब किंवा श्रीमंत नसतो. तो महानच असतो. आपल्या लेकरांसाठी आणि घरासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी असते. याचसाठी आयुष्यात कधी या महात्म्यास दुखवू नका. त्यांनी कोणते काम करावे…? आणि कोणता करू नये ? हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला पटत नसेल ; तरीसुद्धा तो जे काही काम करतो ते फक्त तुमच्यासाठीच. बापाची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे चुकूनही असे म्हणू नका , की मला तसा बाप पाहिजे होता. जसा आहे तसा, शेवटी बाप म्हणजे बाप असतो.

    बाप फणसासारखा असतो. वरून कठीण कवच आतून मात्र गोड गऱ्यासारखा… आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी, आपल्या घरासाठी कुठल्याच गोष्टीची तमा न बाळगता कोणतेही काम करतो. वेळप्रसंगी कोणासमोरही हात जोडतो, विनवणी करतो. कुणाच्या पायाही पडतो पण आपल्या लेकरांची सगळे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. स्वतः ऐन सणात जुने कपडे घालतो. लेकरांना मात्र त्यांच्या आवडीचे नवीन कपडे आणतो. दाढीची क्रीम संपली, तर साबण लावून दाढी करतो; पण आपल्या लेकरांची सगळी हौस मौज करतो. आपल्या स्वतःच्या बनियानला कितीही छिद्रे पडली तरी चालतील पण लेकरांच्या शर्टाला डाग पडलेला त्याला चालत नाही.

    स्वतःला पाहिजे तसे शिक्षण घेता नाही आलं ; त्याची खंत नाही वाटत. लेकरांना पाहिजे त्या कॉलेजला प्रवेश घेता नाही आला ; तर मात्र स्वतःलाच दोष देतो. लेकरांना कधी चांगल्या सवयी साठी रागवावं लागलं ; तर रात्र रात्र कुणालाच न कळू देता रडत बसतो. आयुष्यात कितीही दुःख आलं ; तरी साध मनापासून रडताही येत नाही. कारण बाप खचला ; तर सगळं घर कोलमडून पडण्याची भीती असते. म्हणून त्याला रडताही येत नाही आणि खचूनही जाता येत नाही. दुःखाचा डोंगर कोसळला; तरी खंबीरपणे सामोरे जावे लागते.

    ज्या काही महाभागांना असे वाटते बाप ‘पाषाणहृदयी’ आहे. बापाला काळीज नसतं. आई सारख्या भावना नसतात. त्यांनी एखाद्या लग्नातील मुलीची ‘पाठवणी’ पहावी. मुलीच्या लग्नाच्या दिवशी कोणताच बाप कधीच मुलीच्या डोळ्यात पाहू शकत नाही. तिची नजर चुकूनच तो तिच्याकडे बघत राहतो. ज्यावेळेस सगळ्यांच्या पाया पडून मुलगी बापाकडे येते. फक्त बाबा म्हणायला उशीर….. एखाद्या धरणाचे दारे उघडावीत.. तसे अश्रुचे पाट वाहू लागतात.. घळघळा डोळ्यातून पाणी वाहते… जीव तीळतीळ तुटतो…. आयुष्यभर साठवलेले अश्रू वेगाने वाहू लागतात.. बाप केविलवाण्या नजरेने मुलीकडे आणि सभोवती पाहतो… डबडबलेल्या डोळ्यांनी सगळे जग धुसर दिसायला लागते..

    हंबरडा फोडी बाप

    बाप-लेकीचे हे नातं

    दाटे भावना मनात

    चालली सासरी ही लेक….

    आयुष्यातल्या सगळ्यात अमूल्य ठेव्याची पाठवण करायची असते.. पाठवण कसली कुणीतरी काळजाचा तुकडा हिरावून नेत असतो.. स्वतःच्या घरट्यात वाढलेली चिमणी आकाशात झेप घेत असते… मुलीचं कितीही कल्याण झालं ! तरी त्याच्या रक्ता-मासाचा गोळा त्याच्यापासून दुरावणार असतो. ज्या नाजूक पावलांनी संपूर्ण घराचा ताबा घेतलेला असतो, ती पावलं परक्याच्या घराकडे वळू लागतात…. ज्या मायेने, ममतेने, वात्सल्याने एकमेकांना जीव लावलेला असतो. तोच जीव आपल्या हक्काच्या घरात परका होतो… जगातला कुठलाच बाप मुलीची पाठवणी करताना रडला नाही असं होऊच शकत नाही.. स्वतः रडतो. पण मुलीचे मात्र डोळे पुसतो. सद्गदित कंठाने सांगतो…

    रडू नको माझी पोरं

    सुखी कर गं संसार…..

    एक मात्र नक्कीच आहे. ज्याप्रमाणे मुलीची पाठवणी करताना बापाच्या हृदयाची झालेली घालमेल फार व्याकुळ करते. तसेच ज्यावेळी मुलगा आजारी असतो, त्याला बरे नसते. दुर्भाग्याने एखादी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. त्यावेळी बाप फार आगतिक होतो. मुलासाठी त्याचे हृदय तडफडत असते. जीव तीळ-तीळ तुटत असतो. पोटात कासावीस होते. वाटेल ते करून बाप मुलाचा दवाखाना करतो. त्याच्या उपचाराचे पैसे जमा करतो. त्यासाठी वनवन हिंडतो. कुणाच्याही पाया पडतो. कुणासमोरही हात जोडतो.

    जमेल त्या मार्गाने लेकराच्या उपचाराचे पैसे भरतो. तरी आजची ही मुले मोठी झाल्यावर म्हणतात, तुम्ही काय केलं आमच्यासाठी ? असे विचार असणाऱ्यांनी आपल्या मुलासाठी दवाखान्यात तळमळणारा एखादा बाप आवश्य पाहावा. मगच सांगावे बापाचे हृदय कसे असते….? त्यानंतरच बाप पणाचा अंदाज घ्यावा. खरंच आपल्या जीवनातील अनोखे रसायन असतो बाप.

    बाप आपल्या लेकरांवर आणि घरावर प्रेम करत असतो. त्याचप्रमाणे ही लेकरंही बापावर मनापासून प्रेम करतात.. याला अपवाद असणाऱ्या काही नराधम अवलादी असतीलही ; पण बोटावर मोजण्याइतक्याच. बाकीच्यांचे मात्र अफाट प्रेम असतं. फक्त कधी बोलत नाहीत… आयुष्यात काही महान करता नाही आले, तरी चालेल… फक्त मनापासून कधीतरी आपल्या आई-बाबांना बोला ‌.. आपल्या भावना व्यक्त करा… उतारवयात तर त्यांना फक्त तुम्ही जेवलात का? एवढे विचारल्यानेही पोट भरण्याएवढा आनंद मिळतो. आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे.. एवढे ऐकल्याने आयुष्य सार्थकी लागले. असे वाटते…

    बापाचा ‘बापपणा’ कळायला खूप वेळ लागतो. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस कळतो त्यावेळेस मनापासून बापासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते… ज्याला आयुष्यभर बाप कळत नाही; त्याचे दुर्भाग्य दुसरे काहीच नाही. बापाच्या भावना वास्तवपणे चित्रित करणारी, बापाचे बापपण यथार्थपणे सांगणारी एक कविता आठवते.. या कवितेनेच या लेखाचा शेवट करावा वाटतो. कुणाची आहे माहित नाही; पण खूप अप्रतिम आहे..

    बाप स्वाभिमानी बाळा

    त्याचा कणखर कणा

    त्याच्या हृदयात सुद्धा

    लाजाळूची संवेदना…..

    त्याची पहाडाची छाती

    त्याचं हृदय गुलाब.

    त्याच्या घामाच्या धारांना

    सोन्या रुप्याचा रुबाब…

    बाप तलवार ढालं

    बाप पेटती मशालं

    बाप जागतो म्हणून

    घर झोपतं खुशाल…..

     

    बाप घराचा तो पाया

    आई कळस त्यावर

    जेव्हा खचतो ना पाया

    तेव्हा कोसळते घर….

     

    उलाढाली करतो हा

    बाप फक्त घरासाठी

    शिव्याशाप या जगाच्या

    घेतो आपल्याच माथी…

     

    घर बायको आणि मुलं

    यांना जगवण्यासाठी

    बाप होतो वेडा पिसा

    एक-एक पैशांसाठी….

     

    बाप वागवी मुलींना

    तळहात पाकळ्यात

    अशा बापांसाठी यावे

    थोडे आसवे डोळ्यात…..

     

    बाप साठवितो अश्रू

    फक्त एका क्षणासाठी

    जन्मभराचे रडतो

    लेक जाताना सासरी….

     

    बाप थकल्या वरती

    त्याचा बनावा आधार

    काय उपयोग पुन्हा

    किती घातले पितर….

    ✒️लेखक:-श्री. मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-767733560,7972344128