१७ नोव्हेंबरपासून विधानसभा मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम

36

🔹नवीन मतदार नोंदणी, छायाचित्र व नाव अद्यावत करण्यासाठी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.13नोव्हेंबर):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 70- राजुरा, 71-चंद्रपूर,72-बल्लारपूर, 73-ब्रह्मपुरी,74- चिमूर व 75-वरोरा या सहा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त विशेष पुनरिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. याअंतर्गत
मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020 प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल व त्यासंबंधात दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 पर्यंत राहील.

या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार या दिवशी विशेष मोहिमांचा कालावधी निश्चित करण्यात येईल. दावे व हरकती निकालात काढण्यासाठी 5 जानेवारी 2021 ही अंतिम तिथि राहील. गुरुवार दि.14 जानेवारी 2021 रोजी अद्यावत पुरवणी मतदार यादींची छपाई तर दि. 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

उपरोक्त कार्यक्रमानुसार दि. 17 नोव्हेंबर 2020 ला संबंधित मतदान केंद्रावर छायाचित्र मतदार याद्या प्रारूपरित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी ज्या पात्र व्यक्तींना दि. 1 जानेवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत परंतु मतदार यादीत ज्यांचे नाव नाहीत अशा पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020 ते मंगळवार दि.15 डिसेंबर 2020 ह्या कालावधीत नजीकच्या मतदान केंद्रावर किंवा संबंधित तहसील कार्यालयात नमुना सहा मधील अर्ज पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्रासह भरून देता येईल. त्याच बरोबर ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत अशा मतदारांकडून रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो प्राप्त करून मतदार यादीत अपलोड करण्यात येणार आहे.

प्रारूप छायाचित्र मतदार यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांची तपशिलात दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली असल्यास, नजीकच्या मतदान केंद्रावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किंवा सहा. मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन सुद्धा विहित नमुन्यात अर्ज भरून देता येईल. विहित नमुन्यातील अर्ज मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्यांच्याकडून विनामूल्य प्राप्त करून घ्यावे.

सदर मोहीम दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत राबविण्यात येत असून या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा. तसेच प्रारूप छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मृत व स्थानांतरित व दुबार मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तरी मतदारांनी छायाचित्र मतदार यादी अद्यावत होण्याच्या दृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.