डॉ. महेश शाह यांना ६८७०० रुपये रुग्णाच्या नातेवाईकास परत करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

34

🔸सौ.मीरा प्रभुदास शिरभाते कोवीड रुग्ण उपचार संदर्भात कारवाई

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.25नोव्हेंबर):- शहरातील शासन मान्य खाजगी कोवीड उपचार केंद्र असलेल्या शाह हॉस्पिटल मधील रुग्ण सौ.मीरा प्रभुदास शिरभाते यांच्या उपचारा पोटी डॉ महेश शाह यांनी भरमसाठ बिल वसुल केले.ही रक्कम अतिरिक्त असून नियमानुसार नाही त्यामुळे त्यांनी शिरभाते यांच्या नातेवाईका कडून घेतलेली रक्कम परत करावी अशी तक्रार मृताची मुलगी युगंधरा प्रभुदास शिरभाते हिने जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी केली होती.

या तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिनांक २० नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली.या सुनावणीचे वेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी तसेच शाह हॉस्पिटलचे संचालक डॉ.महेश शाह आणि मृतक सौ.मीरा प्रभुदास शिरभाते यांचे पती प्रभुदास शिरभाते हे उपस्थित होते.

या सुनावणीत आपत्ति व्यवस्थापन अधिनियम, २००५ कलम २५ व २६ भारतीय साथ रोग नियंत्रण १८१७ नुसार डॉ महेश शाह यांना Dedicated COVID हॉस्पिटल अटी व शर्ती च्या आधीन राहून मान्यता देण्यात आली होती. या हॉस्पिटल मधे सौ. मीरा प्रभुदास शिरभाते यांना कोवीड १९ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या नातेवाईकांकडून नियमबाह्य रित्या लाखो रुपये वसूल करण्यात आले होते.या बाबत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.या समितीने आपला अहवाल सादर करणे आवश्यक असून कोणताही अहवाल कार्यालयाला लेखी स्वरुपात सादर केला नाही.

समितीने दिनांक २० नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान सादर केलेल्या चौकशी अहवालात डॉ.महेश शाह यांनी रुग्णाच्या नातेवाईकां कडून कोवीड उपचारार्थ अतिरिक्त ज्यादा रक्कम घेतल्याचे कुठेही नमूद नाही परंतु केंद्र शासन व राज्य शासन यांनी कोरोना विषाणू उपचारा करिता रुग्णाकडून घ्यावयाच्या निश्चित केलेल्या दराची पडताळणी केली असता तसेच आरोग्य विभागातील गाठीत समिती अधिकारी यांनी फेर विचारणा केली असता त्यांनी डॉ.महेश शाह यांनी दिलेले रुपये ९७५०० रुपयाचे बिल उपलब्ध आहे.परंतु डॉ शाह यांचे रिपोर्ट नुसार ८०% बेड उपलब्ध होते असे निदर्शनास येते.

त्यामुळे त्यांनी २०% प्राइवेटचे लावलेले शुल्क अतिरिक्त असल्यामुळे दिनांक ३१ ऑगस्ट २०२० च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोटिफिकेशन मधील Annexure C प्रमाणे रुग्ण अति गंभीर असल्याने पॅकेज प्रमाणे आयसीयु,व्हेटिंलेटर विलगीकरण यांचे दर याप्रमाणे दिनांक १३ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० तीन दिवसाचे प्रतिदिन ९००० रु. प्रमाणे रुपये २७००० रु.पीपीई किटचे ६०० रु.प्रमाणे ३ दिवसाचे रुपये १८०० रु. असे एकूण रुपये २८८०० रु. होतात. या प्रमाणे रुपये ६८७०० रु.एवढी रक्कम अतिरिक्त असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना डॉ महेश शाह यांनी परत करावी तसेच ६८७०० रुपये अतिरिक्त रक्कम ज्यादा वसूल केल्याचे सिद्ध होते.

चौकशी समितीने शिफारस केलेल्या बाबींच्या अधीन राहून तक्रार कर्त्या युगंधरा प्रभुदास शिरभाते यांना ६८७०० रु. इतकी रक्कम पुढील ५ दिवसाचे आत डॉ महेश शाह यांनी अदा करावी असा आदेश एम. देवेंद्र सिंह जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिला आहे.उल्लेखनीय आहे की डॉ शाह यांनी अशाच प्रकारे आणखीही काही रुग्णां कडून अवाजवी रक्कम वसूल केल्याची तक्रार गोपाळ पाटील यांनी केली आहे.एकूणच डॉ शाह यांच्या रुग्णालयात कोवीड १९ उपचाराकरिता दाखल असणार्‍या रुग्णांच्या वसूल केलेल्या संशयास्पद बिलांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी युगंधरा शिरभाते यांनी केली आहे.