हवामान आधारीत कृषी सल्ला

37

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.17डिसेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यात दि. २० डिसेंबर २०२० पर्यंत आंशिक ढगाळ ते अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी कृषी पीकांची निगा राखण्यासाठी कृषी विभागामार्फत पुढीलप्रमाणे सल्ला देण्यात आला आहे.हरभरा -वाढीची अवस्था घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावे. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती ५० मि.ली. किंवा एच.ए.एन.पि.व्ही.(१X१०९) पिओबी/मिली) ५०० एल.ई/हे. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

कापूस- बोंडे भरणे अवस्था
१. कपाशीचे फुटलेले बोंडे त्वरीत कापसाची वेचणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिवळसर, किडका, कवडीयुक्त तसेच पावसात भिजलेला कापूस वेगळा वेचून अलग साठवावा. वेचणी करतांना कापसाला पालापाचोळा चिकटणारा नाही याची काळजी घ्यावी.
२.गुलाबी बोंडअळी व पांढ-या माशीच्या एकत्रित नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस ५० टक्के प्रवाही + सायपरमेथ्रीन ५ टक्के इसी २० मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्के ट्रायझोफोस ३५ टक्के इसी १६.६ मि.ली. इडोझाकार्ब १४.५ टक्के असीटामिप्रीड ७.५ टक्के एससी ८ प्रती १० लिटर पाण्यातून फक्त एकदाच फवारावे.
उन्हाळी धान – पूर्वमशागत नर्सरी आणि बीजप्रक्रिया
उन्हाळी धान पिक रोपवाटीकेसाठी जमीन नांगरून व वखरून तयार करावे १०० सें.मी. रूंद व १० ते १५ से.मी. उंच, योग्य त्या लोबीचे गादीवाफे तयार करून धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुंठयास तीन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत, १ किलो युरिया व ३ किलो एस.एस.पी. मिसळून दयावे. संशोधत धान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीकरिता ३५ ते ४० किलो आणि मध्यम व ठोकळ जातीकरीता ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, त्यासाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ (३टक्के) या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे, द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे व तळाखालील निरोगी बियाणे २ ते ३ वेळा स्वच्छपाण्याने धुवून सावलीत २४ तास वाळवावे, पेरणीपूर्वी बियाण्यास (३ ग्रॅम/किलो) बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
तूर – फुले व शेंगा अवस्था
शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी पिक ५० टक्के फुलावर आल्याबरोबर पहिली फवारणी क्विनॉलफॉस २५ टक्के इसी १६ मि.ली. त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
गहु-पेरणी-
१.वेळेवर पेरणी केलेल्या बागायती गहू पिकाला पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी नत्र खताची दुसरी मात्रा (५० ते ६० किलो प्रती हेक्टरी) पहिल्या पाणी देतांना दयावी.
२.अरुंद पानाच्या तनाच्या व्यवस्थापनासाठी २-४-D (सोडीयम साल्ट) या तन नाशकाची प्रति हेक्टरी १ किलो क्रियाशील मुलद्रव्य ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५ ते ३० दिवसानी फवारणी करावी.
३.गहू पिकाखालील रुंद पानाच्या तनाच्या व्यवस्थापनासाठी अनग्रीप (मेटासल्प्युरोन मेथाइल) या तन नाशकाची प्रति हेक्टरी ४ ग्रॅम क्रियाशील घटक किंवा २० ग्रॅम औषधाची ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५ ते ३० दिवसानी फवारणी करावी.करडई –वाढीची अवस्था
करडई पिकाच्या पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करुन दोन रोपात २० ते ३० सें.मी. अंतर ठेवावे आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी व डवरणी करावी.
मावा किडीचा प्रादुर्भाव (३० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) आढळताच डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १३ मि. ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा, असे आवाहन कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत करण्यात आले आहे.