कोरोना लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही

    57

    ?नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

    नाशिक(दि.20डिसेंबर):- जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जरी आटोक्यात आली असली तरी सर्वांना कायमस्वरूपी सुरक्षाकवच मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग एकजुटीने लसीकरणाचे शिवधनुष्य पेलणार आहेत आणि या लसीकरणापासून जिल्ह्यातील कुणीही वंचित राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

    आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लसीकरण टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापुरकर आदी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, पालकमंत्री, कृषिमंत्री, जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे आणि सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यास यश मिळाले आहे. आता गुरुनाथ चे युद्ध अंतिम टप्प्यात असून लसीकरणाचे कवच प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्यासाठी शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संघटना, आरोग्य यंत्रणा, वाहतूक विभाग यासोबत लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी कलाकार, नाट्यप्रेमी यांची मदत घेतली जाणार आहे.

    जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ नांदापूरकर यांनी लसीकरणाचे दृष्टीने सखोल सादरीकरण करून यामध्ये जिल्हास्तरावर कोणकोणत्या बाबींची तयारी करावी लागेल याबद्दल बैठकीमध्ये माहिती दिली. त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकार्यां चा आढावा घेतला असता पहिल्या टप्प्यात होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 25 हजारांहून अधिक आरोग्य कर्मींचा लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभाग होणार असल्याने हा टप्पा आपण यशस्वीरित्या पार पाडू याबद्दल खात्री असल्याचे प्रतिपादन श्री मांढरे यांनी केले.

    तथापि केवळ या टप्प्यावर न थांबता संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरणाचे दृष्टीनेदेखील आत्ताच तयारी सुरू करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी संबंधितांचे निदर्शनास आणून दिले व याबाबत दर आठवड्याला विभागनिहाय आढावा घेण्यात येईल अशी देखील सूचना दिली. या संपूर्ण कार्यक्रमात प्रसारमाध्यमांची भूमिका देखील महत्त्वाची असल्याने उद्या प्रसारमाध्यमांसाठी सुद्धा या कार्यक्रमाचे संक्षिप्त सादरीकरण डॉ नांदापूरकर यांनी करावे अशी सूचना देखील श्री मांढरे यांनी दिली.