गोंडपिपरी येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यक्रमात भूभरी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

42

🔹कवी अरूण झगडकरांच्या भूभरी काव्यसंग्रहात स्वनिष्ठ जाणिवांचे प्रभावीपणे लेखन — बंडोपंत बोढेकर

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.6जानेवारी):-झाडीबोली साहित्य मंडळ ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित कार्यक्रमात कवी अरूण झगडकर यांच्या भूभरी ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार विज्ञान महाविद्यालयात आयोजित ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी उध्दव नारनवरे होते . उदघाटन गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष सौ. सपनाताई साखलवार होत्या . प्रमुख भाष्यकार म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आणि प्रा. डाॕ. धनराज खानोरकर लाभले होते . ठाणेदार संदीप धोबे , मोरेश्वर सुरकर , गडचिरोली झाडीबोलीचे जिल्हा प्रमुख डाॕ. चंद्रकांत लेनगुरे , प्राचार्य प्रदीप बामनकर आदींची याप्रसंगी उपस्थिती होती .प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक बळीराज निकोडे यांनी केले.

कवी अरूण झगडकर यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मिती बाबतच्या प्रेरणा आणि शाखेचा कार्य अहवाल याबाबत प्रकाश टाकला. प्रमुख भाष्यकार बंडोपंत बोढेकर याप्रसंगी म्हणाले , कवी अरूण झगडकर यांच्या भूभरी ह्या काव्यसंग्रहातून झाडीपट्टीतील समाजमनाचे अस्सल दर्शन घडते.झाडीबोली शब्दांमुळे भूभरीचे आंतरिक सौंदर्य वाढले असून त्यात आधुनिक आशयाचे विविध पदर दिसून येतात .यात त्यांनी स्वनिष्ठ जाणिवांचे प्रभावीपणे लेखन केले असल्याचे ते म्हणाले . दुसरे भाष्यकार डाॕ. प्रा. धनराज खानोरकर यांनी वेगवेगळ्या बोली शब्दांवर प्रकाश टाकत म्हणाले , बोलीभाषा जीवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा समृद्ध होत जाणार आहे.त्यासाठी नवोदित साहित्यिकांनी आपल्या बोलीचा वापर नवीन साहित्य निर्मितीत करावा , असे आवाहन केले.

नगराध्यक्ष सौ. साखलवार , ठाणेदार संदीप धोबे, मोरेश्वर सुरकर , उध्दवराव नारनवरे यांनी समयोचित विचार व्यक्त करून झगडकर यांच्या लेखन कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात गेल्या सत्रात घेतल्या गेलेल्या झाडीबोली साहित्य मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय आॕनलाईन काव्यलेखन स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या रा.जं. बोढेकर स्मृती ग्रामसाहित्य पुरस्काराने सौ. शशीकला गावतुरे (मुल ) , रामकृष्ण चनकापुरे( गोंडपिपरी ) , डाॕ. विठ्ठल चौथाले( चामोर्शी ), सौ. मालती सेमले (गडचिरोली ) यांना सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सत्रात झालेल्या निमंत्रित कवी संमेलनात दिलीप पाटील, प्रशांत भंडारे, दत्ता पेंदोर, सविता झाडे पिसे, संतोष मेश्राम, सुनील बावणे, अरुण घोरपडे, नेतराम इंगळकर, सुनील पोटे, संगीता बांबळे, संतोष कुमार उईके, अरुणा जांभुळकर, नितेश चूनारकर, सुरज दहागावकर, अक्षय उराडे तसेच स्थानिक साहित्य प्रेमींनी आपल्या काव्यरचनांचे उत्स्फुर्त सादरीकरण केले. सूत्रसंचालन प्रा. रमेश हुलके यांनी केले तर आभार डॉ. अशोक कुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील फलके, गुरुदेव बाबनवाडे, अनिल चोखारे, रवी कुडमेथे, गणेश पिंपळशेंडे, शंकर पाल, बळीराज निकोडे, अशोक कुळे, यांनी अथक परिश्रम घेतले. कोरोना नियमांचे पालन करून छोटेखानी स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना आजारापासून घ्यावयाची काळजी या संदर्भात जनजागृतीपर कवितांचे वाचन काहींनी केले.