जॅक मा यांच्या गायब होण्यामागचे गूढ

27

चीनमधील सर्वाधिक श्रीमंत तसेच जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक अशी ज्याची ओळख आहे असे अलिबाबा या जागतिक ई कॉमर्स कंपनीचे प्रमुख जॅक मा हे गेल्या तीन महिन्यांपासून गायब आहेत. त्यांच्या गायब होण्यामागचे गूढ काही केल्या उलगडत नसल्याने जगभर त्यासंदर्भात चर्चा होऊ लागली आहे. १० ऑक्टोबर रोजी जॅक मा यांनी चीनधील कम्युनिस्ट सरकारच्या कार्यशैलीवर टीका करणारे भाषण केले होते या भाषणात त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर टिका करताना म्हटले होते की चीनमध्ये संशोधकांना वाव मिळत नाही. चीनच्या बँका म्हाताऱ्या कोताऱ्यांचा क्लब बनल्या आहेत. देशातील अर्थव्यवस्था बदलली पाहिजे. चीनचे धोरण नव्या पिढीसाठी घातक आहे. जॅक मा यांनी केलेल्या या भाषणानंतर ते अचानक गायब झाले आहेत. शी जिनपिंग यांच्यावर टीका केल्यानेच त्यांना चीनने नजरकैदेत ठेवले असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारविरुद्ध टीका करणारे व्यक्ती अचानक गायब होण्याची ही चीनमधील पहिली वेळ नाही ज्या ज्या लोकांनी शी जिनपिंग यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर टीका केली त्या व्यक्ती काही दिवसातच गायब झाल्या आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतःला अध्यक्ष घोषित केल्यापासून सरकारवर टीका करणारे असंख्य मानवी हक्क कार्यकर्ते, पत्रकार, लेखक, संशोधक गायब झाले आहेत. चिनी सरकारवर टीका करणारे मानवी हक्क कार्यकर्ते रेन शिगीयंग असेच अचानक गायब झाले. नंतर बातमी आली की त्यांना १८ वर्षाची शिक्षा झाली. कोरोनाचा इशारा देणारा चीनमधील डॉक्टर असाच गायब झाला पुढे त्याचा मृतदेहच लोकांना आढळून आला. कोरोना साथ रोखण्यासाठी चीनने योग्य व्यवस्थापन केले नाही अशी टीका करणाऱ्या पत्रकार झयंग यान या ही अशाच गायब झाल्या त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांच्यावर जाहीर टीका करणारे जॅक मा यांचे गायब होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सरकारवर टीका करणे हा चीनमध्ये मोठा गुन्हा मानला जातो. सरकारवर टीका करणारे एक तर तुरुंगात खितपत पडतात किंवा सरळ ढगात जातात कारण तिथे लोकशाही नाही तर शी जिनपिंग यांची हुकूमशाही आहे. चीनमध्ये जे घडते ते बाहेरच्या जगाला कधीही समजत नाही कारण तिथे मीडिया आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आहे. चीनच्या वुहान येथील लॅब मधून कोरोनाचा विषाणू जगभर पसरला असल्याने वुहान येथील लॅब मध्ये जाऊन तपासणी करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांना शी जिनपिंग यांनी सतत खो घातला आहे. शी जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला विरोध करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असे जरी असले तरी जॅक मा सारखे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते सरकार विरोधात बोलतच राहणार आहे. जॅक मा यांच्या सारख्या व्यक्तींमुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकून आहे.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे(मो:-९२२५४६२९५)