अंधश्रद्धेच्या नाकावर टिच्चून लिंबू !

    44

    [राष्ट्रीय विज्ञान दिवस]

    भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ जगविख्यात भौतिकशास्त्रातील संशोधक सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. दि.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रामन परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. आता आपण विज्ञानावर खुपच अवलंबून आहोत. मोबाईल सर्वांच्या हाती आल्याने आपण तात्काळ बातमी पाठवितो व ख्यालीखुशाली समोरासमोर पाहून जाणतो. आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ ही सर्व विज्ञानाच्या प्रगतीचे नेत्रदीपक उदाहरणे आहेत. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा यंत्रांमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो व त्याचा फायदा सर्वांना होतो.

    सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर सन १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे ही होय. डॉ.वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ.सी.व्ही.रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला व ज्याला पुढे सन १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला अशी ती तारीख २८ फेब्रुवारी निवडली गेली.
    यंदा तर डॉ.एपीजे. अब्दुल कलाम इन्टरनॅशनल फाउण्डेशन, स्पेस झोन ऑफ इंडिया व मार्टिन गृप यांच्या संयुक्त प्रयत्नाने ‘१०० पेलोड क्युब सॅटेलाइट चॅलेंज २०२१’ विशेष प्रेरणादायी उपक्रम घेतला गेला. त्यात देशभरातील १००० विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतलेले उपग्रह होते. त्यांच्या उपस्थितीत रामेश्वरम तामिळनाडू येथून दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी हेलियम बलूनच्या मदतीने एकाच वेळी प्रक्षेपित केले आहे.

    या उपक्रमाने ग्रिनीज, असिस्ट, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यासर्वांवर सुवर्णाक्षरात नाव कोरले आहे. त्यात आपल्या महाराष्ट्र राज्यातील डॉ.एपीजे अब्दुल कलाम इन्टरनॅशनल फाउण्डेशनच्या वतीने जनरल सेक्रेटरी मिलींद चौधरी, राज्य समन्वयक मनिषाताई चौधरी, प्रशिक्षक मोहित चौधरी, राज्य कोअर कमिटी मेम्बर शाहू भारती, दामोदर डहाळे, श्रीरंग औचरमल आदींच्या चमूचे अथक परिश्रम कामी आले, हे विशेष! काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम केले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला होता. एकवीसावे शतक हे विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते, ते सत्यातही उतरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत.

    आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत. हे एक प्रगतीचे लक्षण मानले जाते. लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणार्थ विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे, सर्व विषयांवर चर्चा करणे, विज्ञानक्षेत्राच्या विकासास नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे, देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे, लोकांना प्रोत्साहित करणे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणे, अशा बहुआयामी हेतुंच्या पुर्ततेसाठी हे साजरे केले जाते.
    !! राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्व सूज्ञ भारतीय बंधुभगिनींना प्रकाशमय विज्ञाननिष्ठ हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

    ✒️संकलन व लेखन:-श्री कृ. गो. निकोडे प्राथमिक शिक्षक.(मराठी-हिंदी साहित्यिक तथा जि.प्रति.राज्य शैक्षणिक दै.रयतेचा वाली.)मु. पिसेवडधा, पो.देलनवाडी,ता.आरमोरी,जि.गडचिरोली७४१४९८३३३९.
    email – Krishnadas.nirankari@gmail.com