आद्य कवयित्री – सावित्रीमाई फुले स्मृतिदिन विशेष….

36

आजच्या महिला डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, पोलीस झाल्या, पायलट झाल्या विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या एवढेच नव्हे तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या हे केवळ आणि केवळ आपल्या आईसाहेब क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच !….. म्हणुन विद्येची महानायिका – स्फूर्ती नायिका व विद्येची खरी देवता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेच आहेत.

भारतातील थोर समाजसेविका, स्त्री शिक्षणाच्या जनक – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव मधील खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी झाला. आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. खंडोजी व लक्ष्मीबाई यांना चार अपत्ये होती. सर्वात थोरल्या सावित्रीमाई तर त्यांच्या पाठीवर सिदूजी, सखाराम आणि श्रीपती ही तीन मुलं. शिवशाही पासून नेवसे घराणे मानमरातब असलेले घराणे. शौर्याच्या इतिहासामुळे घराण्यात पाटीलकी आलेली होती. सावित्रीमाई लहानपणापासून अतिशय धाडसी व कुठलेही काम अतिशय चोखपणे, निडरपणे काम करत असे. खोटं बोलणे त्यांना कधीच आवडलं नाही. प्रत्येक कामात सावित्रीमाई या पुढे राहत असे.

सन १८४० मध्ये सावित्रीमाईंचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला. विवाहाच्या वेळी जोतीरावांचे वय तेरा वर्षे होते तर सावित्रीमाईंचे वय दहा वर्ष. लग्नानंतर ज्योतिराव फुले यांनी सावित्रीमाईला शिक्षण दिले. सावित्रीमाईंनी स्वतः शिक्षण घेतलं आणि पुढे स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षण देण्याचं काम केलं. सावित्रीमाई फुले या भारतातील प्रथम मुख्याध्यापिका – शिक्षिका झाल्या. सावित्रीमाई ह्याच विद्येची स्फूर्तीनायिका, विद्येची खरी देवता ठरतात.भारतातील थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाचं महत्त्व सावित्रीमाईंनी जाणलं आणि या फुले दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ ला पुणे येथील भिडेच्या वाड्यात आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षणाची क्रांती घडवून आणली. पण आज दुर्देवाने भिडे वाड्यातील शाळा मोडकळीस आलेली आहे . २० सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रातील सर्व फुले प्रेमींनी महामशाल मोर्चाचे आयोजन केलं. महात्मा फुले वाडा ते भिडेवाडा अशी महारॅली काढण्यात आली. आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे अशा घोषणांनी पुणे शहर दणाणले. पण आजचे शासनकर्ते यांना माईंच्या कार्याचा विसर पडला असं वाटतंय !….

सावित्रीमाई मुलींना शाळेत शिकवायला जात असतांना त्या काळच्या सनातन्यांनी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर सावित्रीमाईंच्या अंगावर शेण, चिखल, दगड, यांचा मारा केला पण सावित्रीमाई डगमगल्या नाहीत, प्रसंगी गुंडांशीही सामना करावा लागला पण त्यांनी शिक्षणाचे कार्य अविरत सुरू ठेवलं आणि सर्वच समाजातील मुला-मुलींना शिक्षण दिले.     ब न। या शैक्षणिक चळवळीमध्ये सावित्रीमाईं सोबत सगुनाबाई व मुस्लीम समाजातील प्रथम महिला शिक्षीका फातिमाबी शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्रातील फुले प्रेमींनी १ वर्षानंतर ३ सप्टेंबर २०२० रोजी “आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा राष्ट्रीय स्मारक घोषित करा ! ” यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये – तालुक्यांमध्ये सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आली. पण आजून प्रशासनाला जाग आली नाही.

सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी पुण्यामध्ये २० शाळा सुरू केल्या. यामध्ये प्रौढ शिक्षण, रात्रीची शाळा, असे विविध प्रयोग चालवत असताना या दांपत्याला अनेक त्रास सहन करावे लागले. पण ह्या दांपत्यानी हार मानली नाही. या दाम्पत्याची शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई यांचा भव्य समारंभ घेऊन गौरव केला. सावित्रीमाई शाळेतील मुलींवर आईसारखे प्रेम करायचे म्हणून शाळेतील सर्व मुली सावित्रीबाईला सावित्रीमाई म्हणायचे. सावित्रीमाई ह्या ज्योतिरावांनी सुरू केलेल्या सर्व शाळांच्या प्रमुख होत्या. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा, शालेय शिस्त, बुद्धिमत्ता, नीतिमत्ता आणि विद्वत्ता या सर्व बाबतीत त्या अग्रेसर होत्या. सावित्रीमाईंचे वाचन, मनन, आणि चिंतन हे खूप सखोल होते ते आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करत. माईंचा आत्मविश्वास खूप होता, त्यांची निर्णयशक्ती उच्च दर्जाची होती. पालकांच्या भेटी घेणे, हुशार विद्यार्थ्यांना पारितोषिक देणे, असे उपक्रम सावित्रीमाई सातत्याने राबवायचे. कुळवाडीभूषण- बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याबद्दल सावित्रीमाईंना खूप आकर्षण होते.

महाराणी ताराराणी यांच्याबद्दल त्यांना तेवढाच आदर होता. सावित्री माईंच्या प्रत्येक शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम होत असे. फुले दांपत्यांनी बालविवाह, केशवपन, भ्रूणहत्या, सतीची चाल या सर्वच वाईट प्रथांबद्दल सावित्रीमाईंना फार चीड होती आणि या सर्व प्रथा त्यांनी पुढे चालून बंद पाडल्या. चूल आणि मूल ही संकल्पना मोडीत काढून महिलांना खऱ्या अर्थाने शिक्षित करण्याचं काम या दाम्पत्याने केलेले आहे.राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण तरुण विधवेला झालेला मुल दत्तक घेतलं. त्याला नाव दिले यशवंत. आणि या यशवंतला पुढे शिक्षण देऊन डॉक्टर बनवलं. यशवंताच्या हातुन जनतेची सेवा केली. आणि याच यशवंत चा विवाह ४ फेब्रुवारी, १८८९ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी हडपसर येथील ग्यानबा कृष्णराव ससाने यांची मुलगी राधाबाईंशी सत्यशोधक पद्धतीने लावला. सन १८७६ -७७ हा दुष्काळ पडला होता तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लोकांना दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा आवाहन केलं. मिळेल तेथून अन्न गोळा केले सावित्रीमाईंनी दोन हजार अन्नछत्र सुरू केले. अन्नछत्राच्या ठिकाणी जाऊन सावित्रीमाई स्वतः स्वयंपाक करत असत.

सावित्रीमाई फुले या आद्य कवयित्री होत्या. साहित्य क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी होती. १८५४ ला काव्यफुले आणि १८९१ मध्ये ‘ बावन्नकशी ‘, ‘ सुबोध रत्नाकर ‘ हे दोन काव्यसंग्रह लिहिले.महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि समाजाला जागृत करण्याचे काम केले. २८ नोव्हेंबर १८९० ला ज्योतिराव फुले यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कार्याची जबाबदारी सावित्रीमाईंवर येऊन पडली. मोठ्या धैर्याने आणि तेवढ्याच शांतपणे त्यांनी जबाबदारी पुढे चालवली. या सामाजिक – शैक्षणिक क्रांतिकार्यात कुठेही पोकळी निर्माण होऊ दिली नाही. या क्रांतिकार्याची ज्योत अखंड तेवत ठेवली. १८९६ च्या दुष्काळातून लोक मुक्त होतात न होतात तोच १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. प्लेग ने हाहाःकार माजवला. लोक मृत्युमुखी पडत होते. कित्येकांचे कुटुंबं नामशेष होत होते. सावित्रीमाई या सर्व दुःखी मनाने व डबडबल्या डोळ्यांनी पाहत होत्या. या काळात सावित्रीमाईंनी आपला मुलगा डॉ.यशवंतला गावी बोलवून घेतले व सर्व प्लेगग्रस्तांची सेवा करण्यास सांगितली व स्वतःही लोकांची सेवा करू लागल्या. प्लेगग्रस्तांची सेवा करता – करता माईंना देखील प्लेगची लागण झाली आणि दुर्दैवाने १० मार्च १८९७ रोजी रात्री ९ वाजता क्रांतिज्योती सावित्रीमाईंचे निधन झालं. स्त्री, शूद्रातिशूद्र, बहुजन समाजाला प्रकाश देत आयुष्यभर तेवत असलेली जोतीरावांची ज्योत कायमची मालवली.

माईंच्या स्मृतीदिनानिमित्त माझ्या सर्व माता – भगिनी यांच्या कडून एक नम्र अपेक्षा कि पोथी – पारायण वाचत बसण्यापेक्षा आपण जर माईंचे विचार आचरणात आणले व महामातांच्या विचारांवर चालले तर हीच खऱ्या अर्थाने माईंना आदरांजली ठरेल…..
अशा या महान मातेला स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी त्रिवार वंदन !…..

✒️पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल धरणगाव)मो:-९४०३७४६७५२