फुले दांपत्यांच्या जीवन कार्यातून जगण्याची प्रेरणा घ्या !- लक्ष्मण पाटील सर

25

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.11मार्च):- श्री.संत सावता माळी युवक संघ धरणगाव व सावित्रीमाई फुले चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन, ग्रंथ भेट व वैचारीक प्रबोधनातून माईंना अभिवादन करण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला बहुजन समाजातील शेतकरी महिला, माता -भगिनी यांच्या हस्ते विद्येची खरी देवता – स्फूर्तीनायिका – आद्य कवयित्री – शिक्षणतज्ञ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व क्रांतिसूर्य, शिक्षणक्रांतीचे जनक – सत्यशोधक -राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते लक्ष्मण पाटील सरांनी माईंसाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे स्त्री जातीच्या मुक्तीसाठी… आणि पहिली माझी ओवी… या गीतांमधून सावित्रीमाईंचे कार्य विशद केले. आज ज्या सर्व महिला सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या याचे श्रेय केवळ सावित्रीमाई फुले यांनाच जाते. माईंच्या जीवनातील बऱ्याच प्रसंगांमधून क्रांतीज्योती सावित्रीमाईंचे शैक्षणिक – सामाजिक कार्य विस्तृतपणे सांगितले. खूप मोठे व्हा, प्रगती करा, नाव कमवा परंतु फुले दाम्पत्यांचे उपकार कधीही विसरू नका असे भावनिक आवाहन लक्ष्मण पाटील यांनी केले.

या दिवसाचे औचित्य साधून उपस्थित माता- भगिनींना श्री. संत सावता माळी युवक संघाच्या वतीने सावित्रीमाई फुले यांचे जीवन चरित्रपर ग्रंथ भेट स्वरूप देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते लक्ष्मण पाटील यांना संत सावता महाराज यांच्या जीवन कार्याचा ग्रंथ भेट देण्यात आला. मनोज माळी यांना चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माळी समाजाचे अध्यक्ष विठोबादादा महाजन यांच्या हस्ते अनमोल ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबादादा महाजन , उपाध्यक्ष निंबाजी महाजन, सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष – व्ही.टी.माळी, सहसचिव – डिंगबर महाजन, व्याख्याते लक्ष्मण पाटील सर, महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, श्री.संत सावता माळी युवक संघटनेचे जिल्हा सल्लागार विनायक महाजन, तालुकाध्यक्ष निलेश माळी, आदर्श शिक्षक कैलास वाघ सर, गजानन महाजन, श्रीकांत महाजन, योगेश महाजन, विक्की महाजन, आप्पी माळी, मनोज अशोक महाजन, घनश्याम पाटील, गजानन महाजन,नितेश महाजन, नितीन महाजन तसेच सावित्रीमाई फुले चौकातील सर्व सन्माननीय समाजबांधव व महिला भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमात कोविड – 19 च्या शासन नियमांचे पालन करण्यात आले. फिजिकल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींची दक्षता घेण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संत सावता माळी युवक संघ धरणगाव व सावित्रीमाई फुले चौक यांच्या सर्व पदाधिकारी व युवक मित्रांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संत सावता माळी युवक संघाचे जिल्हा सल्लागार विनायक महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सरांनी केले.