शहाजीराजे भोसले : जाणता राजा शिवरायांचे जनक !

  142

  (शहाजीराजे भोसले जन्म दिवस)

  शहाजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी बुद्धिमंत उत्तम प्रशासक व स्वतंत्र राज्यकर्ते होते. अशी मूलभूत गुण-कौशल्ये असलेले त्यांचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते. मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई उर्फ उमाबाई हिच्या पोटी सिंदखेड येथे शहाजीराजे यांचा जन्म दि.१५ मार्च १५९४ रोजी झाला. नेहमीप्रमाणे त्यांच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमव्वा साठे यांची कन्या उमाबाई ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपाबाई याच शहाजी व शरीफजी यांच्या माता होत. राजस्थानमधील चित्तोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजेंचा जन्म झाला.

  त्यांच्या जन्माच्या वेळी मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाऊंशी शहाजीराजेंचा विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
  मालोजीराजे हे भाऊ विठोजीराजेंसह इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर मालोजीराजेंनी जाधव यांची नोकरी सोडून इ.स.१५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली. मुघलशाहने इ.स.१६२४साली लष्कर खानला १.२ लाख सैन्यासह निजामशाही संपवण्यासाठी दक्षिणेस पाठविले. त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला.

  शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील अर्धे अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन अर्धे सैन्य त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळ असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे त्यांचे बंदी झाले आणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत त्यांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गाव अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही या सर्व सत्ताधीशांकडे काम केले.

  त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे असे – आदिलशाही : इ.स.१६२५ ते इ.स.१६२८, निजामशाही : इ.स.१६२८ ते इ.स.१६२९, मुघलशाही : इ.स.१६३० ते इ.स.१६३३, निजामशाही : इ.स.१६३३ ते इ.स.१६३६, आदिलशाही : इ.स.१६३६ ते इ.स.१६६४, पुढे ते इ.स.१६६१-६२ दरम्यान महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. म्हणजेच दि.२३ जानेवारी १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असता त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला. त्यामुळे ते खाली कोसळले व त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
  !! शहाजीराजेंना त्यांच्या पावन जन्म दिनी पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन !!

  ✒️संकलन व लेखन:-श्री कृ. गो. निकोडे गुरुजी.
  मु. पिसेवडधा, ता. आरमोरी,जि. गडचिरोली, मोबा. ९४२३७१४८८३.