नाशिक मध्ये लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

    58

    ?जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

    नाशिक(दि.19मार्च):- जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आज संयुक्त आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोविड आढावा बैठकीत केले आहे.

    याबैठकीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सुरज मांढरे महापालिका आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्टा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

    जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून मार्गदर्शन करतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, गतवर्षी सुरू झालेल्या कोरोना काळात सर्वच यंत्रणांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे. मध्यल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता. परंतू सद्यपरिस्थितीत पुन्हा कोरोना रुग्णांची वाढती संख्या काळजी करण्यासारखी आहे. यापरिस्थितीवर मात करण्यासाठी आणि लॉकडाउन टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोनाबाबतनियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी विलगीकरणाचे नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पोलीस व मनपा पथकामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिस यंत्रणा व महानगरपालिका यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

    कोरोनाचा विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाने सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांच्या मदतीने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या धोक्याबाबत जनजागृती करावी. या विषाणूपासून स्वत: सोबत इतरांचे रक्षण करण्यासाठी नियमांचे पालन करून नागरिकांनी महत्वाची भूमिका पार पाडावी, असे देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

    यावेळी मार्गदर्शन करतांना कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जिल्ह्यात वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येते १५ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. या कालावधीत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कृषीमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

    विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत दहापट अधिक तपासणीचे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे, गृहविलगीकरणाचे प्रमाण कमी करून बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात यावे, तसेच हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करून तेथे कोरोनाचे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी असे विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी सांगितले. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी खाजगी रुग्णालयांची मदत घेण्याकरिता जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांचा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनास सादर करावा असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

    गर्दीवर प्रभावी नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तसेच ग्रामीण भागातील कार्यवाहीबाबत श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली.

    बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील परिस्थितीची एकंदरीत माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्यात सध्या १० हजार ८५१ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी ८० टक्के रुग्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रात असून १८ टक्के रुग्ण ग्रामीण भागात आहेत तर मालेगावमध्ये ७१६ रुग्ण आहेत. यातील साधारण ९० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात असून या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, या शहरांच्या खालोखाल सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात ॲक्टिव रूग्ण आहेत असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा मृत्यूदर सद्यस्थितीत अत्यंत कमी झाला असून तो सध्या 1 टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, रेमडिसिव्हर, व्हेंटीलेशन बेड आदी पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयात 20 किलोलिटर ऑक्सिजन टँक रविवारपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच ट्रेसिंग वाढविण्यात आले असून त्यासाठी ३०५० वरून ८०००पेक्षा अधिक तपासण्या करण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व लॅब मिळून साधारण २१०००नमुने तपासणीची क्षमता तयार करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी बैठकीत सादर केली.

    शहरातील रुग्णसंख्या व गृहविलगीकरणाचे प्रमाण लक्षात घेता कॉन्टक ट्रेसिंग, आणि टेस्टिंग करण्यासाठी महानगरपालिका पातळीवर 30 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या मदतीने गृहविलगीकरणातील रुग्णांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणे, रुग्णांच्या नियमित संपर्कात राहून त्यांना गृहविलगीकरण्याच्या नियमांची माहिती देण्यात येत आहे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

    ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाची माहिती देतांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या, ग्रामीण भागात १ हजार ८६४ रुग्ण असून त्यापैकी ४२ रुग्ण कोविड केअर सेंटस मध्ये उपचार घेत आहेत. तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांशी व्हिडीओ कॉलींगद्वारे संपर्क करून रुग्णांवर निगराणी ठेवण्याचे काम करण्यात येत आहेत. तसेच दैनंदिन तपासणीची संख्या देखील वाढविण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.