लॉकडाऊन काळात भाजीपाला विक्रीस परवानगी देण्याची मागणी

27

🔹काढणीयोग्य भाजीपाला शेतातच नासणार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.26मार्च):-आज पासून ३१ मार्च पर्यंतचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा विक्रिस तयार असलेला भाजीपाला आता शेतातच नासून जाणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ते होवू नये म्हणून विशिष्ट वेळेत शेतकऱ्यांना भाजी विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

परभणी जिल्ह्यात आजपासून सात दिवस लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवांसह हॉटेल पार्सल सेवा, न्यायालयीन कामकाजासाठी वकील आणि शेतीविषयक कामकाजासाठी शेतकऱ्यांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. असे असले तरी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला काढता येणार नाही. सध्या कोबी, टोमॅटो, वांगी, कोथींबीर सह ईतर पालेभाज्या काढण्यास आलेल्या आहेत. या भाज्या तीन ते चार दिवस न काढल्यास त्या खाण्यायोग्य न राहता शेतातच नासून जाणार आहेत.

सूट देण्यात आलेल्या बाबींमध्ये शेतकऱ्यांचा समावेश करावा. त्यांना भाजपाला विक्री करण्यासाठी विशिष्ट वेळेत सूट द्यावी. कोरोनासंदर्भातली बंधने लावून ही सूट दिल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार असून नागरिकांचीही सोय होईल. या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी गोविंद यादव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक, आ. सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर यांचेकडे केली आहे.