प्रशासकीय वैद्यकीय अव्यवस्थेचा दुसरा बळी: उपजिल्हा रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने 8 महिन्याच्या गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू

    40

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.11मे):- वासी येथे राहणारी सौ रुपाली लहू पर्बत वय 20 वर्षे या 8 महिन्याच्या गरोदर विवाहित महिलेला पोटात दुःखत असल्या कारणाने अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आणले असता उपस्थित डॉक्टरांनी रुग्णालयांत सद्या कोविड रूग्ण असल्याने गायनिक वॉर्ड बंद असल्याचे सांगून खाजगी रुग्णालयांत जाण्यास सांगितले. या दरम्यान खाजगी रुग्णालयांत गेल्यानंतर त्यांना सेवाग्राम येथे जाण्याचा खाजगी डॉक्टरांनी सल्ला दिला. म्हणून पुन्हा रूपाली हिला उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले तेव्हा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांने अर्धा तास थांबायला सांगितले दरम्यान ती बेशुद्ध पडली.ताबडतोब वैदयकीय उपचार न मिळाल्याने सादर महिलेचा मृत्यू झाला. सदर विवाहित महिलेचे मागच्या वर्षी लग्न झाले होते.

    वासी या ठिकाणी आठव्या महिन्यांपर्यतचा तिचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र वासी येथे सुरू होता 9 महिना सुरू होणार आहे सोनोग्राफी करून घ्या या सूचनेनुसार हिंगणघाट येथे माहेरी पोहचवण्यात आले. घरी तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला दवाखान्यात आणले होते . वरील गरोदर महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे मात्र समजू शकले नाही. मात्र सोमवारला शवविच्छेदन केल्यावर महिलेचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. योग्य उपचार मिळाला असता तर तिचे व बाळाचे प्राण वाचविता आले असते.

    8 महिन्याच्या गरोदर महिलेचा याप्रकारे मृत्यू झाल्याने वाशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांनी वाशी येथे जाऊन सदर महिलेच्या सासरी भेट दिली असता तिच्या सासरच्यांनी सांगितले की ती हिंगणघाट ला तिच्या आईकडे सोनोग्राफी करिता गेली होती. वास्तविकता जाणून घेण्यासाठी अनिल जवादे आपल्या सहकाऱ्यांसोबत पुरपीडित कॉलनी शुक्रवार बाजार येथे पोहोचले परंतु मृतक मुलीची आई एकटीच घरी असल्याने व तब्येत बरोबर नसल्यामुळे ती नांदगाव येथील तिच्या बहिणीकडे होती. त्या ठिकाणी मृतक गरोदर महिलेच्या आईने सर्व आपबीती जवादे यांना सांगितली. मृत महिलेच्या आई जवळ पैसे नसल्याने मृत महिलेची मावशी ज्या मालकाकडे मोलकरीण म्हणून काम करत होती त्या मालकाला 5 हजार रुपये उसने मागून तिच्या बहीणलेकीचा इलाज करण्याचा प्रयत्न केला परंतु ती आपल्या बहिणी लेकीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा जीव वाचवू शकली नाही.

    हिंगणघाट शहरात गरिबांना योग्य इलाज मिळू शकत नाही कोरोना च्या नावाखाली अशा गरीब गरोदर महिलांचे प्राण वाचवू शकत नसेल तर जिल्हा रुग्णालय प्रशासन शेवटी फक्त धनदांडग्या लोकांकरिता आहे की गरिबांचाही विचार प्रशासन करणार आहे की नाही असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील डॉक्टर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की कोरोना मुळे दवाखाण्यातील इतर ओपीडी बंद करण्यात आलेल्या आहे त्यामुळे इतर आजराचे पेशंट घेणे बंद आहे. असा निर्णय कोणाच्या परवानगीने घेतला हे मात्र कळू शकले नाही. हा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घेतला की कोरोना महामारीमुळे सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. असा निर्णय घेताना इतर आजारी लोकांचा विचार का केल्या गेला नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या सर्व अव्यवस्थेचा हा दुसरा बळी आहे. याअगोदर सावंगी झाडे येथे तीन दिवस मरून राहलेल्या मायलेकी. आणि ही दुसरी घटना!