सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता

83

काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते, राज्यसभा सदस्य खासदार राजीव सातव यांचे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. राजीव सातव यांच्या निधनाने देशाने सामाजिक प्रश्नांची जाण असणारे उदयोन्मुख नेतृत्व गमावले. २१ सप्टेंबर १९७४ रोजी जन्मलेले राजीव सातव हे काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील धुरंधर नेते म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध होते. राजीव सातव हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये होते. राहुल गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू साथीदार होते. राहुल गांधी यांनी त्यांच्यावर गुजरात आणि पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली तेंव्हा त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांनी पक्षाला गुजरात मध्ये चांगले यश मिळवून दिले.

पंजाबमध्ये तर त्यांनी पक्षाला सत्ता मिळवून दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही हिंगोली मतदार संघातून ते चांगल्या मतांनी निवडून आले. त्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता. संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. खासदार होण्याआधी ते आमदार होते. २००९ साली ते कळमनुरी मतदार संघातून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि खासदार होणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

राजीव सातव यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमक पणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्वाचे नेते मानले जात. ते संसदेत भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत असले तरी भाजपसह सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य होते तिथेही त्यांनी आपल्या कार्याने वेगळी छाप सोडली. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद असो की गुजरात विधानसभेच्या निवडणुका असो की पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडवकावणे असो काँग्रेस पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या. राजीव सातव यांच्या निधनाने फक्त काँग्रेस पक्षाचेच नाही तर महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, उदयोन्मुख नेतृत्व गमावले आहे. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५