डॉक्टर आपल्या दारी अंतर्गत मेडीकल कॅम्प

    40

    ?मांदुर्णे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

    ▪️पी.डी.पाटील सर

    ✒️मांदुर्णे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मांदुर्णे(दि.21मे):- ता. चाळीसगांव दि. २१ मे, २०२१ शुक्रवार रोजी मांदुर्णे गावात मेडिकल कॅम्प घेण्यात आला. सध्या पसरत असलेल्या कोरोना साथीला प्रतिबंध करण्यासाठी मांदुर्णे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती, मास्क, सॅनिटायझर वाटप, दारूबंदी प्रयत्न,आठवडे बाजार बंदी, दुकाने विहित वेळेत बंद अशा स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जात आहेत.आज रोजी ग्रामपंचायतच्या वतीने नवेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव यांचे डॉक्टर, नर्स, गावातील स्थानिक डॉक्टर,आरोग्य सेविका व गावातील आशा वर्कर यांच्या मदतीने गावात मेडिकल कॅम्प घेण्यात आला. यासाठी PHC शिरसगाव येथून विशेष पथक आले होते.

    सदर मेडिकल कॅम्प मध्ये आशा वर्कर संगीता महाजन,कल्पना महाजन व सुरेखा गायकवाड यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची ताप व ऑक्सिजन तपासणी केली. या कॅम्प साठी स्थानिक पातळीवर मदत व गावाशी बांधीलकी म्हणून डॉ.बबन नांदगावकर, डॉ.संजय पाटील व डॉ.गणेश पाटील अनमोल सहकार्य केले. नमूद डॉक्टर यांनी ‘ दवाखाना आपल्या दारी ‘ ही संकल्पना गल्लीतच रुग्ण तपासणी केली.
    शिरसगाव येथून आलेल्या पथकात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सैनी , आरोग्य सेवक संदिप चौधरी ( मांदुर्णे उपकेंद्र ) , हेमंत शिरसाठ ( उपकेंद्र शिरसगांव ) , आरोग्य सेविका सुरेखा शेडगे ( उपकेंद्र मांदुर्णे ) यांनी प्राथमिक शाळा,मांदुर्णे येथे संशयित रुग्णांची तपासणी केली.

    यावेळी ताप ,खोकला असणाऱ्या 25 ग्रामस्थांची विश्वसनीय अशी मानली जाणारी RTPCR ही कोरोना चाचणी करण्यात आली.सदर कॅम्प मध्ये खोकला व ताप असणाऱ्या ग्रामस्थांना मोफत औषधे वाटण्यात आली.यावेळी सरपंच दगडू गणपत पाटील यांनी ग्रामस्थांना मनात कुठलीही भीती न बाळगता तपासणीसाठी ग्रामस्थांनी पुढे या असे आवाहन केले त्याला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला.यावेळी ग्रा.पं.सदस्य राजेंद्र बापू पाटील यांनी ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या.अनावश्यक बाहेर पडू नका अशी विंनती उपस्थित ग्रा.पं.सदस्य आनंदा पाटील,अन्वर मन्सूरी व लक्ष्मण पाटील यांनी ग्रामस्थांना केली.

    गावाच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत पूर्णपणे कटिबद्ध असून शक्य तेवढे उपाययोजना करून कोरोनाला हरवू असा विश्वास ग्रामसेवक श्री.अहिरे भाऊसाहेब यांनी व्यक्त केला. सदर कॅम्प यशस्वीतेसाठी शिक्षक प्रमोद धर्मराज पाटील,दगडू उत्तम पाटील, राजेंद्र पाटील व ग्रा.पं. कर्मचारी दीपक महाजन उपस्थित होते. सदर कॅम्प आयोजनासाठी आपल्या गावचे डॉ.दीपक नगराज पाटील यांनी विशेष प्रयत्न केले व वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.कॅम्प समारोप वेळी शिरसगाव येथील पथक व स्थानिक डॉक्टर यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. सदर कॅम्पच्या माध्यमातून नवेगावातील सर्व कुटुंबाची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या ग्रामस्थांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना स्वतंत्र ठेवून उपचार करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.