तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देणे अशक्य होईल – उमेश चव्हाण

    35

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.23मे):-ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत, म्हणून रुग्ण हक्क परिषदेने महाराष्ट्र दिन १ मे पासून धानोरी येथे सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये सर्वानुमते ९ मे पासून मोफत उपचार सेवा सुरू केली. कोणतीही देणगी, वर्गणी अथवा शासकीय निधीची तरतूद नसताना कोणत्याही संस्थांनी – व्यक्तींनी केलेली मदत अत्यंत तुटपुंजी ठरली आहे, छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचा रोजचा खर्च एक लाख रुपयांहुन अधिक आहे, आणि दररोज ऐंशी हजार रुपयांना सदर हॉस्पिटल तोट्यात सुरू आहे.

    यामुळे मोफत उपचार सेवेचा प्रयत्न यशस्वी होत नसून मोफत उपचार सेवा पुढील काळात बंद करावी लागेल, असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचे संस्थापक उमेश चव्हाण म्हणाले.
    लोकांच्या रुग्ण हक्क परिषदेकडून अनेक अपेक्षा असतात, संकटाकाळात वैद्यकीय मदत मिळावी म्हणून दररोज भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बेड उपलब्ध व्हावेत म्हणून महानगरपालिका- राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचे प्रयत्न उमेश चव्हाण यांनी केले.

    जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, निवेदन सादर करूनही बेड आणि उपचार उपलब्ध होत नाहीत म्हणून जवळच्या मित्रांच्या साथीने आणि घरातील दागिने गहाण ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटल त्यांनी धानोरी येथे सुरू केले. अनेक रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभही घेत आहेत, मात्र यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
    व्यापार – व्यवसाय, दळणवळण बंद असल्याने निधी संकलन करण्यावर मर्यादा येत आहेत. पुढाकार घेऊन निधी देणगी देणारे लोक एक टक्काही नाहीत. अश्यावेळी मोफत उपचार कसे द्यावेत? हा मोठा प्रश्न असल्याचे रुग्णालयाचे सर्व संचालक सांगतात.

    छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करणारे, व्याख्याने देणारे, शिव इतिहास संशोधन करणारे, शिवाजी महाराजांचे चरित्र लेखक, महागड्या गाड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि भगवा झेंडा फडकविणारे कुणीही या हॉस्पिटलची दखल घेतली नाही. प्रशासन- सरकारकडून तर मदतीची अपेक्षा नाहीच मात्र रूग्ण हक्क परिषदेचे प्रशंसक आणि प्रसार माध्यमांनी या हॉस्पिटलला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले.

    बारामती, दौंड, शिरूर तालुक्यासह साताऱ्यातील लोकांनी येथे उपचार घेऊन बरे झाले तर ऑस्ट्रेलियाहून तोरणे यांनी पाठविलेली ७५ हजार रुपयांची देणगी ही सर्वात मोठी असल्याचे उमेश चव्हाण यांनी सांगितले तर लोकांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेने केले.