माता रमाई आंबेडकर : बाबासाहेबांचा भक्कम आधार

81

(माता रमाई भीमराव आंबेडकर स्मृती दिवस)

रमाबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. बहुजनवर्ग त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. कारणही तसेच होते की, रमाईं या त्यागाच्या मूर्तिमंत रूप होत्या. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या तारुण्यासह जसे अनेक त्याग केले, तसेच बहुजन समाजासाठीही! त्यांचा जन्म दि.७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिकू धुत्रे – वलंगकर व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वणंदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ – शंकर होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. तिच्या जाण्याने कोवळ्या रमाईच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते.

काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे कळले. सुभेदारांना रमा पसंत पडली. त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स.१९०६ साली झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्नमंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. माता रमाईंना जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.

बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते. पण रमाईला एकटी घरामध्ये कसे ठेवायचे? म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. ते वराळे काका धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते की, दोन दिवस झाले, ही मुले कुठे गेली आहेत? खेळायला आवारात का आली नाही? त्यावेळी वराळे म्हणाले की, ती लहान मुले दोन दिवसांपासून उपाशी आहेत.

कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे, ते अजून मिळालेले नाही. ते मिळायला अजून तीन दिवस लागतील, तोवर ही मुले उपाशीच राहणार आहेत. वराळेंचा कंठ अगदी दाटून आला. त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीमध्ये गेल्या आणि रडतच कपाटातला सोने ठेवलेला डबा व आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळेंकडे आणून दिल्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी ते त्या बांगड्या व डबा घेवून गेले आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून आले. त्या लहान मुलांनी त्यावेळी पोटभरून जेवण करून खुप आनंदीत झाले.

हे पाहून रमाईंचा आनंदसुद्धा गगनात मावेनासा झाला. मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाईंना “रमाआई” म्हणून बोलावू लागले. त्या क्षणापासून रमाई ही माता रमाई झाली आणि ती सगळ्यांची आई झाली. ही घटना आठवून कवीमन गाऊ लागते.

“भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी | बांगड्या सोन्याच्या, रमानं दिल्या काढुनी. धन्य रमाई, धन्य रमाई ||”

रमाईचे शरीर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते, आजार बळावला होता. इ.स. १९३५च्या जानेवारी महिन्यापासून त्यांचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर तो खुपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. बाबासाहेब तर आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. त्या त्यांच्याकडे एकटक बघत बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्या थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीन-दुर्बलांना पोरका करणारा दिवस उजाडला. दि.२७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता त्यागमूर्ती रमाईंची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या-गांजल्याची माता रमाई त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची अंत्ययात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. नभी भेसूर उमटले,

“आम्हा दुरावली मायेची साऊली| निर्वाण पावली आमची रमाई माऊली||”

पहाडासारखे महामानव डॉ.बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळजवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाई मध्येच अचानक त्यांची सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या होत्या. बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले, तशीच आम्ही मुलेही आईविना पोरके!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे माता रमाईंना व त्यांच्या त्यागीवृत्तीला पावन स्मृती दिनी अनंतकोटी विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(हिंदी-मराठी साहित्यिक.)मु. पोटेगावरोड, पॉवरस्टेशनच्या मागे, गडचिरोली.जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.