हिंदूंचेच कर्दनकाळ हिंदुत्ववादी सरकार

20

आजच्या घडीला देशात हिंदू हिंदू म्हणून हिंदुत्ववादी सरकारकडून हिंदूंचेच जे नुकसान सुरू आहे, हिंदूंचे जे हाल सुरू आहेत, हिंदूंना जो नाहक त्रास सुरू आहे, तितका या देशाच्या इतिहासात कधीच नव्हता. कायम ’आम्ही हिंदूंचे पालनहार’ असा टेम्भा मिळविणार्‍या सरकारकडूनच हिंदूंची ही अवस्था करण्यात आली आहे यापेक्षा दुर्दैव ते काय? आज खलबत्त्यात कांडल्या प्रमाणे चारही बाजूने हिंदू कांडला जातोय. आर्थिक, सामाजिक, शारीरिक, धार्मिक दृष्ट्या हिंदूंच अध:पतन होतय. तरीही मेलेल्या हिंदूंच्या टाळूवरच लोणी खाणं मात्र थांबत नाही.
स्वातंत्र्यानंतर देशाची इतकी वाईट अवस्था कधीच नव्हती आणि हिंदूंची तर नव्हतीच नव्हती. मुघलांनी 600 वर्षे तर इंग्रजांच्या 150 वर्ष या देशावर राज्य केल्यानंतर या देशातील हिंदूधर्म कधीच संकटात सापडला नाही. या अगोदर मुस्लिम राष्ट्रपती आणि शीख पंतप्रधान असूनसुद्धा या देशातील हिंदू सुरक्षित आणि संपन्न होता. परंतु गेल्या 6-7 वर्षात कट्टर हिंदुत्ववादी सरकारने हिंदू धर्म संकटात आहे सांगून- सांगून सर्वार्थाने संपन्न असलेला हिंदू भिकेला लावलाय.

ब्रिटिश काळात ब्रिटिशांच्या विरुद्ध कार्य करणार्‍यांविरुद्धच ते कारवाई करत, त्यांना त्रास देत. परंतु आजच्या घडीला या सरकारच्या विरुद्ध आवाज उठविणारे आणि सरकारच्या समर्थनात आवाज उठवणारे या दोघांचीही सारखीच गत झाली आहे. आजच्या घडीला भारतात 1390470000 (एकशे एकोणचाळीस कोटी 4 लाख 70 हजार) या एकूण लोकसंख्येपैकी 1109595060 म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 79.80% म्हणजेच जवळपास 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. मुस्लिम (14.23%), इतर (5.78%) आहेत. म्हणजे देशातील एकूण लोकसंख्येच्या 80% हिंदू तर उरलेल्या 20% त इतर सर्व धर्म आले. या 80% हिंदूंना 14.23% मुस्लिमांच्या नावाने भडकवले जाते. त्या 14.23% मुस्लिमांच प्रचंड नुकसान करून टाकू अशी स्वप्ने दाखवून या हिंदुत्ववादी सरकारने देशातील त्या 100% लोकसंख्येचच प्रचंड नुकसान करून टाकलं ज्यापैकी 80% लोकसंख्या ही हिंदू धर्मीय आहे.

शेकडोंनी बेवारस कुत्र्यांसारखी हिंदू साधू-संतांची प्रेते गंगा नदीतून वाहत येताहेत. त्यांना हिंदू धर्माच्या संहितेप्रमाणे जाळण्या ऐवजी नदी काठी पुरले जातेय आणि ती पुरलेली प्रेते कुत्रे उकरून त्याचे लचके तोडताहेत अश्या क्लेशदायक प्रसंगाची तर मुघल काळातल्या इतिहासातही नोंद नाही. हीच शेकडो प्रेते जर काँग्रेस किंवा इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात घडला असता तर इतक्या मुद्द्यावर हिंदूंना प्रचंड भडकवून त्या राज्यातील सरकार भाजपने पाडून टाकले असते. महाराष्ट्रात गैरसमजातून दोन साधूंचा मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर भाजपने हिंदू धर्माच्या नावाने माजवलेलं रान आठवलं की अशी हिंदू साधूंची शेकडो प्रेते जर महाराष्ट्रातून वाहत गेली असती, ती न जाळता जर पुरली असती आणि ती पुरलेली प्रेते जर कुत्र्यांनी उकरून खाल्ली असती तर भाजपने संपूर्ण देशात धर्माच्या नावाने काय भीषण तांडव घडवून आणला असता याची कल्पनाही करवत नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आपण सर्व भारतीय त्यांचे विरोधक व गुलाम असूनसुद्धा प्लेग ची साथ आल्यानंतर शासकीय यंत्रणा लावून घराघरात जाऊन बाया-माणसांची तपासणी करून त्यांचा इलाज केला जेणेकरून लोक मरायला नकोत. वास्तविक पाहता ब्रिटिशांना कुणी म्हणणार नव्हतं की तुम्ही का भारतीयांचा इलाज करत नाही आहात? भारतीयांना का मरू देत आहात? पण तरीसुद्धा त्यांनी जीवतोड मेहनत घेऊन प्लेग च्या साथीतून भारतीयांना(त्यातही बहुतांश हिंदूच) बाहेर काढलं.पोलिओ च्या विरोधातील लढ्याचे तर आपण सर्वच साक्षीदार आहोत. प्रचंड प्रमाणात पोलिओ डोजचा प्रचार, प्रत्येक शहरात शेकडो ठिकाणी पोलिओ डोज मोफत देण्याची व्यवस्था, डोज घ्यायला लोक गेले नसतील म्हणून प्रत्येक घर फिरून तिथे विचारपूस करून घरातील बाळाला घरपोच लस देतांना तुम्हाला तत्कालीन पंतप्रधान किंवा तत्कालीन सरकारी पक्षाच नाव कुठे दिसलं? कुठे ऑनलाइन नोंदणी करावी लागली? कुठे रात्री 12 वाजतापासून रांगेत लागून रांगेतच सतरंजी घेऊन झोपावं लागलं?

गेली अनेक दशके सरकारी दवाखान्यांमध्ये पोलिओसह अनेक प्रकारच्या मोफत लसी देत असतांना आम्ही तुम्हाला मोफत लस देतोय हा आविर्भाव कुठे दिसला? आणि आज?
एक लस घेण्यासाठी हींदूंनाच जीवाचा कीती आटापिटा करावा लागतोय हे आपण सर्व अनुभवतोय. फुकट सोडा पण विकतसुध्दा लस मिळत नाही कारण काय? तर आज आपल्या देशातील हिंदू मरत असतांना पाकिस्तानच्या मुस्लिमांना प्राधान्य दिलं गेलं. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ने तयार केलेले 4.5 कोटी लसीचे डोज भारतातील हिंदूंचे लसीकरण बाकी असतांना पाकिस्तानला पुरविले गेले. 4.5 कोटी डोज गुणीला 250 रुपये आपण धरले तरी 11,250,000,000 (अकराशे पंचवीस कोटी) रुपये होतात. भारतीयांचे लसीकरण बाकी असताना भारतीयांना प्राधान्य देण्याचे सोडून पाकिस्तानला जर इतर कुठल्या पक्षाने प्राधान्य दिले असते तर भाजप ने किती रान माजवले असते याची आपण कल्पना करू शकतो.

ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी विचारलेला पाकिस्तानच्या हीश्याचे 55 कोटी पाकिस्तानला दिले म्हणून गांधींची हत्या केली जाते, मग भारतीयांच्या हीश्याचे 11,250,000,000 रुपये (4.5 कोटी लस) पाकिस्तानला देणार्‍यांच आता काय करायचं? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका देऊन जातो. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती पाहून, आपल्या देशातील नागरिकांना प्राधान्य देऊन, त्यांचे लसीकरण पूर्ण करून मग इतरांना मदत करावी. कायम पाकिस्तानी मुस्लिम आणि बांग्लादेशी रोहिग्यांच्या नावाने हिंदूंना भडकवायचे आणि भारतातील हिंदूंचे लसीकरण बाकी असतांना पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, मालदीव, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, बहरीन, ब्राझील, मॉरिशस, मोरक्को, ओमान, सेशेल्स आणि श्रीलंका, या 14 देशांना कोरोना लस पुरवायच्या आणि लाखो भारतीयांना लसीअभावी मरू द्यायचे हे यांचे हिंदुत्व. कोरोनाने लाखो हिंदू मरत आहेत. त्यांचा इलाज करण्यासाठी पुरेश्या आरोग्य यंत्रणा नाहीत. जगण्यासाठी, इलाज करवून घेण्यासाठी हॉस्पिटल समोर हिंदूंच्या रांगा लागल्यात तर प्रेते जाळण्यासाठी स्मशानाबाहेरसुद्धा हिंदूंच्याच रांगा लागल्यात.

दवाखान्यांमध्ये इलाजच्या नावाखाली लाखो रुपयांनी हिंदू लुटला जातोय तर स्मशानात सुद्धा 25 ते 75 हजार रुपये प्रेताचे क्रियाकर्म करण्यासाठी घेतले जात आहेत.या हिंदुत्ववादी सरकारने अचानक नोटबंदी केली. त्यामुळे देशातील 80% हिंदूंचेच सर्वाधिक हाल झालेत. एटीएम च्या बाहेर शेकडोंच्या रांगा लागल्या होत्या आणि या रांगांमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत ज्यापैकी बहुतांश हिंदू होते. पंतप्रधानांनी देशातील एक एक करून अनेक सरकारी संस्था खाजगीकरणाच्या नावाखाली विक्रीला काढल्यात आणि त्यात काम करणारे लाखो हिंदू टप्प्या-टप्प्याने बेरोजगार झाले. यांनी बेरोजगारी इतकी वाढवली की शेवटी सरकारला बेरोजगारीचा आकडाच देणे बंद करावे लागले. देशाच्या इतिहासात सर्वात जास्त हिंदू युवक आज बेरोजगार झालेत.
’बहोत हुई मेहंगाई की मार, असे म्हणत सत्तेत आलेल्या या सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला. या महागाईचा फटका कुणाला बसतोय? या देशातील 20% इतर धर्मियांना की 80% हिंदूंना? कच्च्या तेलाचे भाव सध्या गेल्या अनेक दशकांतील भावापेक्षा खूप जास्त उतरलेले आहेत परंतु देशातील हिंदूंना त्याचा फायदा पोहोचू दिल्या जात नाहीये.

आज पेट्रोल 100 रुपये लिटर झालं ते काय फक्त मुस्लिमांसाठी? की ख्रिश्चनांसाठी? धान्य-फळे, भाजीपाला, खते, बियाणे, औषधे, इंधन, गॅस सिलेंडर प्रचंड महाग झालेत ते काय फक्त मुस्लिमांसाठी? अहो 80% हिंदू यात मरतोय.
कोरोना, महागाई, आर्थिक मंदी या सर्व संकटात सुद्धा संधी शोधत पंतप्रधानांनी पी.एम. केअर्स नावाने खाजगी फंड स्थापन करून तो सरकारी आहे असे सांगुन त्यात जनतेने पैसे गोळा करण्याचे आवाहन केले. यामध्ये करोडो हिंदूंनी सढळ हाताने रक्कम दान केली. पण हा हिंदूंचाच पैसा हिंदूंच्याच कामी आला नाही त्यामुळे आजही लाखो हिंदूंना अपुर्‍या वैद्यकिय सुविधांअभावी कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. याच जिवंत उदाहरण म्हणजे अमदाबाद चे विजय रमेशभाई पारीख यांनी ट्विटर वर आपण पीएम केअर्स फंडात दिलेल्या 2.51 लाखाच्या चेक च फोटो टाकत सांगितले की, “माझ्या आईला बेड न मिळाल्यामुळे ती वारली. अडीच लाखाच दान माझ्या आईला एक बेड देऊ शकत नाही तर आता तुम्हीच मला सल्ला द्या की तिसर्‍या लाटेत बेड मिळविण्यासाठी मला किती दान द्यावं लागेल जेणेकरून मी माझ्या आप्तांना गमावणार नाही.”

देशाच्या इतिहासात सर्वात जास्त सैनिक या मागील 7 वर्षात सीमेवर मारले गेलेत व मारले जात आहेत. त्यांपैकी बहुतांश सैनिक हे हिंदू च आहेत. ह्या केंद्र सरकारने तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे आणले ह्या कायद्यामुळे सर्वात जास्त नुकसान जर कुणाला होईल तर ते हिंदूंनाच. कारण देशात सर्वात जास्त शेतकरी हे हिंदूच आहेत. आणि ह्या हिंदूंनाच होणार्‍या त्रासाविरुद्ध कुण्या हिंदूने आवाज उठवला तर त्या हिंदूंनाच या हिंदूत्ववादी सरकारव्दारे देशद्रोही, पाकीस्तानी, खलिस्थानी, नक्षलवादी ठरवले जाते, असं या अगोदर कधीही होत नव्हत. या कोरोनाच्या संकटात लाखो हिंदू मरत असतानां व अपुर्‍या आरोग्य सुविधा असतांना या सरकारला नवीन संसद भवन उभारायचं आहे. इतकी भयंकर कोरोनाची साथ असतांना व मोठ्या संख्येने कुंभमेळ्यात हिंदू साधू-संत आले तर त्यांना कोरोनाची लागण होऊन हजारो हिंदू साधू-संत मरतील हे माहिती असतांनासुद्धा कुंभ मेळ्याची परवानगी या सरकारने दिली आणि हजारो हिंदूंचा हकनाक बळी गेला. आसाम -बंगालसह 5 राज्यांमध्ये निवडणुकीकरिता लाखोंच्या रॅली-मोर्चे काढले आणि हजारो लोक कोरोनाबाधित झाले त्यात बहुतांश हिंदूच.

ब्रिजगोपाल हरकिसन लोया या सीबीआयच्या स्पेशल कोर्टाच्या न्यायाधीशांची एका अतिशय महत्वाच्या पदावरील हिंदू न्यायाधीशांची हत्या होते. त्याचा तपास लागत नाही. आतासुद्धा ममता बॅनर्जी ज्या हिंदूच आहेत त्यांना स्त्री असून अगदी खालच्या थराला जाऊन बदनाम केलं गेलं, शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून त्रास दिला गेला. महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेंसारख्या हिंदू नेत्याला अशा संकटकाळात मदत करण्याच सोडून शक्य होईल तिथून त्रास दिला जातोय. देशातील हिंदू अपुर्‍या आरोग्य सुविधा, महागाई, बेरोजगारी, उपासमार, अस्मानी-सुलतानी संकटं याने मरतोय, त्याचे जगण्याचे वांदे झालेत त्यामुळे हे हिंदुत्ववादी सरकार म्हणजे हिंदूंचा कर्दनकाळ आहे यात आता तिळमात्रही शंका राहीली नाही.

✒️लेखक:-चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-9822992666

▪️संकलन:-नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभाग प्रतिनिधी)मो:-8080942185