आज दिसणारे सूर्यग्रहण : कंकणाकृतीने आनंदाला उधाण

33

(आकाशातील गंमतीजंमती)

आजचे कंकणाकृती सूर्यग्रहण :-आकाशातील गंमतीजंमती बघता बघताच आज यंदाचे पहिलेवहिले सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण विश्वभरातील अनेक ठिकाणांहून बघता येणार आहे. यावेळी या सूर्यग्रहणाचा आनंददायी कंकणाकृती आविष्कार न्याहाळता येणार आहे. नुकताच दि.२६ मे रोजी वैशाखी पौर्णिमेला चंद्रग्रहण झाले होते. भारतात अगदी थोड्या भागांचा अपवाद वगळता ते दिसलेच नव्हते. भारतात चंद्रोदयाची वेळ होईस्तोवर चंद्र पृथ्वीच्या सावलीतून बाहेर पडला होता. त्यामुळे काही भागात फक्त उपछाया ग्रहण अनुभवता आले. आजच्या वैशाख अमावास्येला दि.१० जून २०२१ रोजी होणारे सूर्यग्रहण हे सन २०२१ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. भारतातील अरुणांचल प्रदेश व लडाखचा काही भाग वगळता हे सूर्यग्रहण दिसणार नाही. या वेळच्या सूर्यग्रहणावेळी कंकणाकृती ग्रहणाचा मजेदार आविष्कार जगातील वेगवेगळ्या ठिकाणी न्याहाळता येऊ शकतो.
नुकत्याच झालेल्या चंद्रग्रहणावेळी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने सूपरमूनही होता. तसेच रक्तवर्णी चंद्र म्हणजेच ब्लड मूनही काही ठिकाणी अनुभवता आला. यावेळचे सूर्यग्रहणही चमत्कारिक व वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. कारण कंकणाकृती सूर्यग्रहण या प्रकारात ते दिसणार आहे.

ग्रहणाची प्रक्रिया :-
सूर्य व पृथ्वी एका रेषेत आले असता त्यांच्या मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होतो. चंद्राचा आकार सूर्यापेक्षा खुपच लहान आहे, तरी सूर्य चंद्राच्या तुलनेत पृथ्वीपासून खुप लांब अंतरावर आहे. त्यामुळे पृथ्वीवरून ते आपणास सारख्या आकाराचे भासतात. चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकते तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाचा काही भाग झाकतो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाच्या मधोमध येऊन सभोवार सूर्यप्रकाशाची कडा दिसते, तेव्हा ती एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते. म्हणूनच त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांतील अंतर किती आहे? यावर व आपण पृथ्वीवर कोठे आहोत? यावर आपल्याला कोणत्या प्रकारचे ग्रहण दिसणार हे अवलंबून असते.

ग्रहणांचे प्रकार :-
वरील प्रमाणे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार पडतात – १) खग्रास सूर्यग्रहण, २) खंडग्रास सूर्यग्रहण व ३) कंकणाकृती सूर्यग्रहण. तर चंद्रग्रहणाचे १) खग्रास चंद्रग्रहण व २) खंडग्रास चंद्रग्रहण असे दोनच प्रकार पडतात. कंकणाकृती चंद्रग्रहण असा प्रकार कधीच उद्भवत नाही.

हे सूर्यग्रहण असे पहा :-
आज भारतीय स्थानिक वेळेनुसार ५.४९ वाजता ग्रहाची सुरूवात होणार आहे. कॅनडामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. ३ मिनिटे ५१ सेकंद एवढ्या थोड्या कालावधीसाठीच ही अवस्था बघता येणार आहे. ग्रीनलँडच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. उत्तर ध्रुव आणि सायबेरियातही ते दिसेल. हे सूर्यग्रहण स्पेशल आय गियर, वेल्डर ग्लास, पिनहोल कॅमेरा आदींच्या माध्यमातून पाहता येते.

आजचे ग्रहण दिसण्याची ठिकाणे :-
ग्रीनलँड, ईशान्य कॅनडा, उत्तर ध्रुव व रशियाचा काही भाग या ठिकाणाहून कंकणाकृती सूर्यग्रहण बघता येणार आहे. युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, आर्क्टिक आणि अटलांटिक क्षेत्रांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. भारतात अरुणांचल प्रदेश व लडाखचा काही भाग वगळता सूर्यग्रहण दिसणार नाही.जेथे दिसेल तेथील अवकाश प्रेमी बंधुभगिनींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, ही विनंती!

✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(अवकाश निरीक्षक व मराठी-हिंदी साहित्यिक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली. व्हा. नं. ७४१४९८३३३९.