नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघातून “लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर” लढविणार निवडणूक

21

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)

नांदेड(दि.13जुलै):- दौऱ्यावर आलेल्या सुरेखा पुणेकर यांनी देलगूर- बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे या मतदारसंघातून उमेदवारीही मागितली आहे. आता मेटे त्यांना या मतदारसंघातून शिवसंग्रामच्या वतीने उमेदवारी देतात का? आणि त्यांनी उमेदवारी नाही दिली तर सुरेखा पुणेकर अन्य कोणत्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या फडात उतरणार का? असे प्रश्न आता चर्चिले जाऊ लागले आहेत.

तर महाराष्ट्रात लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघातून पुणेकर निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याकडे तशी मागणी केली आहे. देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे.यावर आता तर थेट लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने या निवडणुकीत आणखीनच रंगत येणार असल्याची चर्चा सुरेखा पुणेकर यांच्या चहात्यांत आहे. पुणेकर आज नांदेडमध्ये बोलत होत्या.

खरंतर, याआधी सुरेखा पुणेकरांनी देखील राष्ट्रवादीकडे (ncp) आमदार होण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. मात्र, सुरेखा पुणेकरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले होतं. संपूर्ण महाराष्ट्रात तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचे फड रंगवणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.