बंडोपंत बोढेकर यांच्या आनंदभान अभंगसंग्रहाचे डाॕ.प्रकाश आमटे यांचे हस्ते प्रकाशन ..

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16जुलै):- रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या आनंदभान ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री डाॕ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पात संपन्न झाले. घरगुती स्वरूपात घेतल्या गेलेल्या या प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी डाॕ. सौ. मंदाकिनी आमटे , अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. शिवनाथ कुंभारे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे उपस्थित होते.

प्रस्तावनापर मनोगत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले तर आमटे दाम्पंत्याचा सत्कार मानवस्त्र देऊन शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आला. आनंदभान मधील अभंग रचना वाचनीय असून संतबोधावर आधारित असल्याचे मत डाॕ. आमटे यांनी मांडले आणि अभंगसंग्रह निर्मिती केल्याबद्दल बोढेकरांचे कौतुक केले . ऐहिक जीवनात आनंद निर्माण व्हावा यादृष्टीने संतानी लेखनी चालविली त्या परंपरेचा आदर आणि अनुसरण करत मानवी जीवनाचे चिंतन आणि ग्राम परिवर्तनाचा विचार प्रकर्षाने या संग्रहात आल्याचे डाॕ. कुंभारे म्हणाले .

या अभंगसंग्रहास नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डाॕ. बाळ पदवाड यांची प्रस्तावना लाभली असून मलपृष्ठावर डाॕ. किसन पाटील( जळगाव ) यांनी दिलेल्या आशीर्वादपर शुभकामना अंकित आहे. ह्या अभंगसंग्रहाचे मुखपृष्ठ चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी काढले असून अमरावतीच्या शब्दजा प्रकाशनाने निर्मिती केलेली आहे. याप्रसंगी डाॕ.आमटे यांनी गडचिरोली सायकल स्नेही मंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या सायकल चालवा अभियानाबाबत समाधान व्यक्त केले.