तुकाराम भाऊराव साठे: निडर व बेडरही मोठे

    33

    [अण्णा भाऊ साठे निर्वाणदिन विशेष]

    तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जातात. ते एक मराठी समाजसुधारक, लोककवी, लोकशाहीर आणि लेखक होते. एका मांग-दलित समाजामध्ये जन्मलेले ते एक चमकदार व्यक्तिमत्व होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. ते मार्क्स व आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता. पण नंतर ते आंबेडकरवादी विचारसरणीचे झाले. साठे साहेबांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले.

    मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी त्यांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्यांच्यामुळे लोक प्रेरित झाले.अण्णा भाऊ साठे साहेबांचा जन्म दि.१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते. ते शाळेत शिकलेले नाहीत, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले. नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्ने केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसरी जयवंता होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती- मधुकर, शांता व शकुंतला. ते पहिल्यांदा कॉ.श्रीपाद अमृत डांगेंच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले. सन १९४४मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख यांच्यासोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते सन १९४०च्या दशकामध्ये कार्यरत राहिले. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे शासन त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी दि.१६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है!” इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी बॉम्बेराज्य निर्मितीची मागणी केली होती. ते आता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणींना अनुसरत दलित कार्याकडे वळले. दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी कथांचा वापर केला.इ.स.१९५८साली बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य सम्मेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, “पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलित व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे!” यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित व श्रमिकांचे महत्त्व स्पष्ट केले.

    साठे साहेबांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये ‘फकिरा’ समाविष्ट आहे, जिला इ.स.१९६१मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लघुकथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये व २७ अभारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त त्यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली. त्यांनी पोवाडा व लावणीसारख्या लोककथा शैलींच्या वापराने लोकप्रिय बनविले. त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला ‘फकिरा’ अर्पण केले. त्यात त्यांनी आपल्या समुदायाला भुखमरीतून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली व ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न ते पाहात आले. त्यांचे असे निडर व बेडर व्यक्तिमत्व लिखाणातून प्रकट होते- “जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥” हे त्यांचे गीत खुप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत. अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती.

    मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकटतात. त्यांची ही प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण होत आहे.पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य साठे साहेबांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. त्यांचे विपन्नावस्थेत गोरेगाव, मुंबई येथे दि.१८ जुलै १९६९ रोजी निर्वाण झाले. महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णांवर अकरा प्रबंध सिद्घ केले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णा भाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे.

    !! पुरोगामी संदेश परिवारातर्फे पावन निर्वाण दिनी त्यांना व त्यांच्या तीक्ष्ण लेखणीला मानाचा सॅल्युटऽऽ.. !!

    ✒️शब्दांकन:-कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी ( थोर पुरुषांचा इतिहास अभ्यासक) मु. पो. ता. जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.