शासकिय आय.टी.आय.च्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू : विद्यार्थी वर्गात उत्साह

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.21जुलै):- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १० वी च्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्दारे करण्यात येणार आहेत. उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळाची वस्तुस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रात ४१७ शासकीय औ.प्र.संस्था कार्यरत असून त्यांची एकूण वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष आहे. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी ०४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र ०२ संस्था व ४३ शासकीय औ.प्र.संस्थांमध्ये स्वतंत्र तुकडया, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी आश्रमशाळा औ.प्र.संस्था अशा संस्थांचा समावेश आहे.

औ.प्र.संस्थांमध्ये एक व दोन वर्षे कालावधीचे ९१ व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या व्यवसायांचा अभ्यासक्रम हा उद्योगधंद्यातील तज्ञांनी बनविलेला असून अभ्यासक्रम बनविताना कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना भेटी देणे, उद्योगधंद्यातील तज्ञांचे व्याख्यान, कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करणे, प्रशिक्षण संपताच शिकाऊ उमेदवारी, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे या सारखे उपक्रम राज्यातील सर्वच संस्थांत केले जातात.युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली आहे.

शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील साधारणत: ११००० औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण एक लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांनी औ.प्र.संस्थेतून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता १२ वी ची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता १० वी अनुत्तीर्ण उमेदवारांनी औ.प्र.संस्थेतून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता १0 वी ची समकक्षता देण्यात येणार आहे.

राज्यातील विविध नामांकीत औद्योगिक आस्थापनांसोबत संचालनालयाने सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औ.प्र. संस्थांतील प्रशिक्षण सुविधांचा दर्जावाढ करणे, प्रशिक्षणार्थ्यांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे, On the Job Training, रोजगाराच्या संधी, निदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध करुन देणे, इतर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देणे यासारख्या बाबी प्रथम प्राधान्याने राबविण्यात येत आहेत.औ.प्र.संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. अशा प्रकारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत रोजगाराची संधी व उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

कोव्हीड-19 या विषाणूजन्य साथीचा रोग प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा एक भाग म्हणुन राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. उद्भवलेल्या परिस्थितीत प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती, भविष्यातील रोजगार/ स्वयंरोजगार/ उच्च शिक्षणाबाबत चिंता दूर करण्याचा प्रयत्नही करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे. सदर कालावधीत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या. संचालनालयामार्फत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन ऑनलाईन माध्यमांव्दारे सैधांतिक प्रशिक्षण (Theoretical Training) पूर्ण करण्यात येत आहे. तसेच मर्यादित संख्येत प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेत बोलावून प्रात्यक्षिक प्रशिक्षण (Practical Training) पूर्ण करण्यात येत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये नियोजित परीक्षा माहे फेब्रुवारी/ मार्च 2021 मध्ये घेण्यात आल्या असुन सदर परीक्षांचा निकाल घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजना, रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणाच्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत.
औ.प्र.संस्थांमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धत राबविण्यात येत आहे.
प्रचलीत अर्ज निश्चितीच्या कार्यपध्दतीनुसार उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी औ.प्र. संस्थांमध्ये जावे लागत असे.

तथापि, करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे उमेदवारांना प्रवास करणे गैरसोईचे असुन औ.प्र. संस्थांमध्ये देखिल गर्दी टाळणे आवश्यक आहे. औ.प्र. संस्थेत प्रवेश अर्ज भरतांना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता १० वी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता १० वी च्या परिक्षेतील गुण या बाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate). तसेच ज्या उमेदवारांनी इतर मंडळांमार्फत इयत्ता 10 वी परीक्षा दिली असेल त्यांना त्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात नमुद करावी लागेल. प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर सर्व ऑनलाईन पेमेंट माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही औ.प्र.संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.
कोविड-19 चा प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच माध्यमिक परीक्षा मंडळांनी इयत्ता १० वी च्या परीक्षा रद्द करुन अंतर्गत मुल्यमापन वा अन्य तत्त्वानुसार उमेदवारांना गुणपत्रिका निर्गमित घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ८० व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इ. १० वी उत्तीर्ण व ११ व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी इ. उत्तीर्ण/अनुत्तीर्ण अशी शैक्षणीक अर्हता आहे. तसेच इच्छुक उमेदवार हे बहुतांश ग्रामिण व दुर्गम भागात वास्तव्यास असल्याने प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधीत मंडळांनी निर्गमित केलेल्या इ. १० वी च्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावली नुसार निर्धारित गुणाधिक्य या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत शासकीय औ.प्र. संस्थांमधील पव्लिक प्रायवेट पार्टनशिप (पीपीपी) योजनेंतर्गंत प्रवेशासाठी उपलब्ध जागा (IMC Seats) व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश देण्यात येणाऱ्या जागांवर प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ८० ते १००% व्यवसाय प्रशिक्षण प्रतीपूर्ती योजना सन २०१९ पासुन नंतर प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रवर्गानुसार प्रवेश निश्वितीसाठी त्यांना विविध प्रकारचे कागदपत्रे संबंधीत औ.प्र. संस्थेत सादर करणे आवश्यक असते. प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रांची यादी देखिल प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व प्रवेश कार्यपध्दती या बाबत विस्तुत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका प्रवेश संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा ,असे गडचिरोली शास.औ.प्र.संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके यांनी कळविलेले आहे.