पांगुळगव्हाण शाळेचे आठ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण

20

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29जुलै):-यावर्षी एप्रिल महिन्याच्या सहा तारखेला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगुळगव्हाण तालुका आष्टी,जिल्हा बीड येथील आठ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.कोरोनासारख्या महामारीच्या या अत्यंत अवघड काळात विद्यार्थ्यांनी हे यश ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून संपादन केले.स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था,कडा यांनी उपक्रमशिल आणि आदर्श शाळा म्हणून पांगुळगव्हाण जिल्हा परिषद शाळेचा गौरव केलेला आहे.

गतवर्षीही शाळेने एनएमएमएस आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले होते.एकशे ऐंशी गुणांची ही परीक्षा दोन विषयात मिळून घेण्यात आली होती.पहिला पेपर हा बुद्धिमत्ता तर दुसरा विषय शालेय पाठ्यक्रम यात सामाजिक शास्रे,विज्ञान व गणित यांचा अंतर्भाव होता.विविध प्रकाशनांच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्या.विषय शिक्षकांनी प्रकरणानुसार चाचण्यांचे नियोजन करून सराव घेतल्याने हे यश मिळवता आले.

यशस्वी विद्यार्थ्यामध्ये शुभम विठ्ठल गिते,कृष्णा ज्ञानदेव गिते,दीपक अनिल पवार,साक्षी वामन गिते,सुशांत कांतीलाल गिते,ओम सुनिल गिते,भारती बाबुलाल गिते,गणेश लहू गिते या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.उसतोडणी मजूर म्हणून ओळख असणाऱ्या या गावात विद्यार्थ्यांचे हे यश नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थी आणि शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे आष्टीचे कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड,केंद्रप्रमुख प्रदीप बहिर,केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीम.आशा पत्की,जरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार आदींनी अभिनंदन केले आहे.