राज्यात दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वाटपाची यशस्वी चळवळ सुरू – खा.सुप्रियाताई सुळे

21

🔹कायमस्वरूपी कर्णबधिर असलेल्या दिव्यांग बांधवांच्या कानात आवाज ऐकू येणे याचे समाधान फार मोठे – ना.धनंजय मुंडे

🔸परळीत ५८५ कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण

✒️बीड विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.14ऑगस्ट):-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार,केंद्र सरकार,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली असून,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचे मत खा.सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,बीड जिल्हा आरोग्य विभाग,धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ५८५ गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे २५ हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आले,या कार्यक्रमात खा.सुप्रियाताई सुळे ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.जन्मजात कर्णबधिर असलेल्या किंवा काही कारणांनी श्रवणशक्ती गमावलेल्या व्यक्तीच्या कानात जेव्हा आपल्या प्रयत्नातून आवाज ऐकू येतो,त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा श्रेष्ठ ठरते,असे मत यावेळी सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून खा.शरदचंद्रजी पवार,खा.सुप्रियाताई सुळे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यातील वंचित,दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.ऊसतोड कामगारांचे महामंडळ असेल किंवा देशातील तृतीयपंथीयांचे पहिले महामंडळ असेल असे अनेक नवनवीन उपक्रम व योजना समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केल्या असल्याचा आनंद आहे,असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
लातूर येथे सुरू केलेल्या ऑटिजम सेंटरच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ऑटिजम सेंटर उभारण्यात येणार असून यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे.त्याचबरोबर खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे वितरित करून त्यांचे जीवन सुकर करण्याचा उपक्रम संबंध राज्यात सक्रिय करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक पावले उचलण्यात येतील असेही यावेळी ना.मुंडे म्हणाले.

या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संचालक विजय कान्हेकर,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,दत्ता आबा पाटील,जि.प.गटनेते अजय मुंडे,रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ,रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,शिवाजी सिरसाट,पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे,या कार्यक्रमाचे कार्यवाहक डॉ.संतोष मुंडे,राजाभाऊ पौळ,माऊली गडदे,तुळशीराम पवार,प्रा.विनोद जगतकर,वैजनाथ बागवाले,अनंत इंगळे,अय्युब भाई,रमेश भोयटे,जयपाल लाहोटी,सय्यद सिराज यांसह आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संचालक डॉ.विजय कान्हेकर यांनी केले.तर कार्यक्रमाची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा या वितरण कार्यक्रमाचे कार्यवाहक डॉ.संतोष मुंडे यांनी उपस्थितांना दिली.
———————————————-
धनु भाऊंच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला – खा.सुप्रियाताई सुळे
दरम्यान या कार्यक्रमात पूर्व नोंदणी व तपासणी केलेल्या ५८५ कर्णबधीर दिव्यांगांना श्रवण यंत्र तज्ञ डॉक्टरांकडून बसवण्यात येत आहे.यावेळी धनंजय मुंडे यांनी मशीन बसवलेल्या एका ताईला, “ताई ऐकू येतंय का?” असे विचारताच त्या महिलेने मोठ्या आवाजात ‘हो भाऊ!’असे उत्तर दिले,यावेळी हा कार्यक्रम खा.सुप्रियाताई सुळे लाईव्ह पाहत होत्या.खा.सुप्रियाताई सुळे यांनी याचा आपल्या मनोगतात आवर्जून उल्लेख केला, “आमचे धनु भाऊ अत्यंत संवेदनशील नेतृत्व आहेत,त्या दिव्यांग व्यक्तीने हो,भाऊ आवाज येतोय म्हणून जेव्हा उत्तर दिले,तेव्हा धनु भाऊंच्या चेहऱ्यावरील आनंद केवळ केलेल्या कामाचे समाधान नाही तर खूप काही सांगून गेला!’ असे म्हणत खा.सुप्रियाताई सुळे यांनी ना.मुंडेंच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
———————————————-
बीड जिल्ह्यातील दिव्यांगांचे ना.धनंजय मुंडे आधारस्तंभ – राजेंद्र लाड बीड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी सततच कोणत्यांना कोणत्या माध्यमातून तन,मन व धनाने कार्य करुन सहाय्यक उपकरणे मिळवून देणारे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे हे खरोखरच जिल्ह्यातील दिव्यांगांचे आधारस्तंभ आहेत.त्यांनी नुसतेच सांगितले नाही तर प्रत्यक्षात वेळोवेळी दाखवून दिले आहे.असे दिव्यांगांप्रती सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारे ना.धनंजय मुंडे साहेबांचे शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा बीड च्या वतीने मनस्वी आभार.
राजेंद्र लाड
जिल्हाध्यक्ष – दिव्यांग कर्मचारी संघटना बीड