राजीव भाई आणि भारताचा निद्रिस्त स्वाभिमान!

34

(राजीव दीक्षित जयंती व पुण्यतिथी विशेष)

राजीव दीक्षितजी हे भारतातील एक समाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी स्वदेशी चळवळ बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांबद्दल जनमानसात प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते भारतीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. राजीव भाई दीक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी वैभवशाली संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. ते स्वदेशी जागरणकर्ते होते. अवघ्या २० वर्षांच्या कालावधीत दीक्षित यांनी जवळपास १२ हजारांहून अधिक व्याख्याने दिली. भारतात ५ हजारांहून अधिक परदेशी कंपनींविरोधात त्यांनी स्वदेशीच्या आंदोलनाला सुरुवात केली. दि.९ जानेवारी २००९ रोजी त्यांनी भारत स्वाभिमान ट्रस्टचा कार्यभार स्वीकारला. भारताच्या ग्राहक माल क्षेत्रात परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशास विरोध करणारी स्वातंत्र्य वाचवा चळवळीत राजीव दीक्षित यांचे मोठे योगदान आहे. या चळवळीद्वारे पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाच्या दुष्परिणामांबाबत भारतीयांना जागृत करण्याचे कार्य या आंदोलनाद्वारे हाती घेण्यात आले. या कार्यात राजीव दीक्षित यांच्यासोबत डॉ. बनवारीलाल शर्मांसारखे प्रखर वक्ता यांनीसुद्धा देशभर दौरा करत चळवळीसाठी कार्य केले. यावेळी देशातील आर्थिक-सामाजिक विषयांवर जागृतीपर भाषणे देण्याचे कार्य दीक्षितजींनी पार पाडले. या दौर्‍यांमध्ये त्यांनी ध्वनिफितींचा प्रभावी वापर केला. स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील, याची परिपूर्ण काळजी घेतली होती. भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरित्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला.

जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले. त्याचप्रमाणे भारतीयांनी गैर मार्गाने मिळवून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या सर्व काळ्या पैशाची माहिती उघड व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. ही दोन कामे त्यांची विशेष उल्लेखनीय ठरली.राजीव दीक्षितजी यांचा जन्म दि.३० नोव्हेंबर १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील नाह या गावी झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एमटेकची पदवी आयआयटी कानपूरमधून प्राप्त केली आणि डॉक्टरेट फ्रान्समध्ये झाले. भगतसिंग, उधमसिंह आणि चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांच्या कार्याने ते प्रभावित झाले होते. महात्मा गांधीजींचे विचार त्यांच्या वाचनात येताच त्यांच्यावर त्याचा पगडा पडला. ते आजीवन अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशीसाठी व्यतीत केले. दि.८ जानेवारी १९९२ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे पार पडलेल्या बैठकीत ‘आझादी बचाओ आंदोलन’ उभारण्यात आले. या आंदोलनाचे प्रमुख नेते बनवारीलाल शर्मासमेत पूर्वी भोपाळ गॅस दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अमेरिकन कंपनी- युनियन कार्बाइडविरूद्ध ‘लोक स्वराज्य अभियान’ राबवत होते. स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य आणि त्याचे संरक्षण करण्यास विविध उपक्रम सुरू केले गेले. भारत एक कृषीप्रधान देश असल्याने या चळवळीने शेतीलाही आपले पहिले प्राधान्य मानले आहे.

त्यांतर्गत देशी पद्धतीने शेती करण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले जाते. या चळवळीमध्ये रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत, गांडुळे आणि शेणखत वगैरे वापरण्यावर विशेष भर देण्यात आला. चळवळीची दुसरी प्राथमिकता म्हणजे प्रत्येक गावात स्वदेशी वस्तूंचे उत्पादन घेतले. त्यातून शासकीय अनुदान न घेता उत्कृष्ट गुणवत्ता आणि परवडणारी खादी करण्यात या आंदोलनाला भरघोस यश आले. स्वदेशी उत्पादनांचे वितरण हे तिसरे प्राधान्य होते. चळवळीचे चौथे प्राधान्य म्हणजे स्वदेशी औषधांची जाहिरात केली गेली. भ्रष्टाचार, गरिबी, उपासमार, गुन्हेगारी तसेच शोषणमुक्त भारत निर्मितीसाठी योगगुरू रामदेवजी आणि राजीव दीक्षितजी यांनी एकत्रित काम केले.
सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जनप्रबोधन हे होते. तर त्यासाठी विपुल साहित्य आणि ऑडिओ-व्हिडिओ कॅसेट्स तयार केली गेली. विविध ठिकाणी व्याख्याने, प्रशिक्षण शिबिरे इत्यादी सुरू करण्यात आली. स्वदेशी वस्तू स्थानिक पातळीवर मिळाव्यात म्हणून देशी स्टोअर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हळूहळू ‘स्वातंत्र्य बचाव’ चळवळीचे काम लोकांच्या पसंतीस उतरु लागले. आज ११८ गावे पूर्णपणे स्वदेशी गावे म्हणून विकसित केली गेलीत. जिथे केवळ पेप्सी कोला, कोलगेट यासारख्या परदेशी कंपन्यांची उत्पादने विकली जात नाहीत तर मूळ, रासायनिक खते आणि संकरित बियाण्याशिवाय शेतीही केली जाते. चळवळीद्वारे चालवलेल्या स्वदेशी दुकानांना ‘स्वानंद भंडार’ असेही म्हणतात. दरवर्षी या आंदोलनातर्फे चार-पाच मोठे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. ‘आझादी बचाओ आंदोलन संवाद’ या नावाने साप्ताहिक प्रसिद्ध केले जाते.

योगॠषी रामदेवजी आणि राजीव दीक्षितजी यांनी ६३८३६५ एवढ्या गावांमध्ये आंदोलन पोहोचवण्यासाठी एका न्यासाची स्थापना केली. दि.५ जानेवारी २००९ रोजी दिल्लीमध्ये या न्यासाची नोंदणी करण्यात आली. भारताच्या निद्रावस्थेत गेलेल्या स्वाभिमानाला जागवण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर एक राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचे या न्यासाचे उद्दिष्ट आहे. भारत स्वाभिमान आंदोलनाद्वारे स्वदेशी वस्तूंच्या प्रचारासोबत परदेशी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे काम करण्यात येते. भारत स्वाभिमान न्यासमध्ये त्यांच्यासोबत डॉ.जयदीप आर्य, राकेश कुमार व बहीण सुमन यांनी स्वदेशीच्या संकल्पनेशी प्रेरित होऊन संघटनेचा ताबा घेतला. अशाप्रकारे चळवळीने जनप्रबोधनासाठी बरेच प्रयत्न केले. भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौर्‍यावर असताना दि.३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरित्या सांगण्यात आले होते. परंतु त्यांच्या मृत्यूचे खरे कारण काय? हे अजूनही गुप्तच आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर ही चळवळ उधळली गेली आणि कामगारांमध्ये फूट पडली. ही चळवळ राजीव दीक्षितजी आणि क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे.

!! त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन:-श्री.एन. के.कुमार जी. (से.नि.प्रा.शिक्षक)[हिंदी व मराठी साहित्यिक]मु. पो. ता. जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.