कुडाळमध्ये रंगली नक्षञाचं देणं काव्यमंचची बहारदार मैफल

29

✒️सिंधुदुर्ग(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सिंधुदुर्ग(दि.4जानेवारी):-नक्षञाचं देणं काव्यमंच, शाखा- सिंधुदुर्ग जिल्हा, विभाग कुडाळ तालुकावतीने “जिल्हास्तरीय नक्षञ काव्यमैफल “चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. नक्षञाचं देणं काव्यमंचच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त या काव्यमैफलचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरण संदेश देत वृक्षपूजन व वृक्षाला पाणी घालुन कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणेच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नक्षञाचं देणं काव्यमंच कुडाळ तालुका प्रमुख कविवर्य प्रा.नरेंद्रकुमार चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य मा. शिक्षणविस्तार अधिकारी व नक्षञाचं देणं काव्यमंच सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष कविवर्य उदय सर्पे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुरेश पवार, राजेंद्र गोसावी, मधुकर जाधव, मनोहर सरमरकर, उदय दळवी, दिलीप चव्हाण, दिपक मदाडकर, प्रगती पातोडे, विश्वा बालवडकर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम गोविंद सूपर मार्केट हाॅल ओरोस येथे संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रम अध्यक्ष कविवर्य उदय सर्पे म्हणाले की,”कवींना आदर सन्मान मिळावा.त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. यासाठी काव्यमंच गेली २२ वर्ष संपूर्ण महाराष्टभर करत आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक विभागानुसार काव्यमैफलीचे आयोजन करुन कवी कवयिञींना व्यासपीठ मिळवुन दिले आहे. आपल्या सिधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने पाचवे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनाचे आयोजन केले होते. काव्यमंचचे सर्व उपक्रम विनामुल्य असतात. सर्वांना समान संधी दिली जाते. समाजाने कवींना जपले पाहीजे. आजच्या काळातील आधुनिक संत हे कवीच आहेत. खेडोपाडी वाडी वस्तीमध्ये ,या ग्रामीण भागात प्रचंड साहित्यिक ऊर्जा आहे.ती या माध्यमातुन बाहेर येईल. यासाठी या काव्यमैफलचे आयोजन केलेले आहे.”

या कार्यक्रमासाठी नक्षञाचं देणं काव्यमंचचे संस्थापक राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विविध विषयांना स्पर्श करणा-या कवितांचे सादरीकरण झाले. मालवणी, कोकणी भाषेच्या ठसा देणा-या रचना सुध्दा सादर झाल्या. त्यामुळे मैफल चांगलीच रंगली.

कार्यक्रमाचे आयोजन कुडाळ तालुकाप्रमुख कविवर्य प्रा. नरेंद्रकुमार चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रगती पातोडे यांनी केले. आभार राजेंद्र गोसावी यांनी मानले.

सर्व सहभागी कवी कवयिञींना आकर्षक फोरकलर सहभाग सन्मानपञ व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यापुढे विभागानुसार संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा मैफलींचे आयोजन करण्याचा मनोदय संस्थेने व्यक्त केला. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.