बुम….बुम…. बुमराहची कमाल!

33

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड आणि भारत यांच्यात इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना सुरू आहे. वास्तविक ही कसोटी मालिका मागील वर्षीच सुरू झाली असून या मालिकेत भारताने २ – १ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चार कसोटी पूर्ण झाल्यावर भारतीय संघातील काही खेळाडू कोरोनाग्रस्त झाल्याने उर्वरित पाचवी कसोटी पुढे ढकलण्यात आली आता तीच कसोटी चालू असुन या कसोटीत तिसऱ्या दिवस अखेर भारताने २५७ धावांची आघाडी घेतली असून मालिका विजय मिळवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या दिवशी भारताची ५ बाद ९८ अशी अवस्था झाली असताना यष्टीरक्षक ऋषभ पंतने धडाकेबाज शतक झळकावले त्याला रवींद्र जाडेजानेही शतकी खेळी करून सुरेख साथ दिली मात्र खरी कमाल केली ती भारताचा वेगवान गोलंदाज आणि या कसोटीत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या जसप्रीत बुमराहने. जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाज आहे. आपल्या परफेक्ट यॉर्करसाठी तो ओळखला जातो. यावेळी मात्र त्याने बॉलने नव्हे तर बॅटने कमाल करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियाची धुरा पहिल्यांदाच हाती आलेल्या जसप्रीत बुमराहने बॅटच्या साहाय्याने अनोखा विश्व विक्रम आपल्या नावे केला. स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या प्रमुख वेगवान गोलंदाजाच्या एका षटकात बुमराहने तब्बल ३५ धावा कुटल्या. यांपैकी बुमराहच्या बॅटमधून तब्बल २९ धावा निघाल्या तर, बाकी अवंतरच्या होत्या.

२००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने याच स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार खेचून विश्वविक्रम केला होता त्या खेळीची आठवण बुमराहच्या या खेळीने करून दिली. या खेळीने बुमराहने कसोटीतील एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. याआधी एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम ब्रायन लारा, जॉर्ज बेली आणि केशव महाराज यांच्या नावावर संयुक्तपणे होता. या सर्वांनी एका षटकात २८ धावा काढल्या होत्या आता तो विक्रम बुमराहने आपल्या नावे केला आहे. या कसोटीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. संघाचे नेतृत्व करण्याची संधी तशी त्याला नशिबाने मिळाली. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा ऐनवेळी कोरोनाग्रस्त झाला आणि आणि कर्णधारपदाची धुरा बुमराहकडे आली.

बुमराह भारताचा कर्णधार आहे हे समजल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण त्याने याआधी कोणत्याही संघाचे नेतृत्व केले नाही. त्यामुळेच तो भारताचे नेतृत्व सक्षमपणे करील का ? याबाबत अनेकांना शंका होती. पण त्याने या कसोटीत उत्तम नेतृत्व करून शंकेखोरांची बोलती बंद केली आहे. कपिल देव नंतर तब्बल ३५ वर्षांनी भारताला वेगवान गोलंदाज कर्णधार म्हणून लाभला आहे.अर्थात कपिल देव हे वेगवान गोलंदाज असले तरी त्यांची गणना अष्टपैलू खेळाडूत होत होती. बुमराह मात्र निव्वळ वेगवान गोलंदाज आहे त्याअर्थी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला वेगवान गोलंदाज जो कर्णधार बनला तो जसप्रीत बुमराह आहे. जसप्रीत बुमराह हा भारताचा ३६ वा कर्णधार आहे. त्याने या सामन्यात ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले ते पाहता भविष्यात तो भारताचा नियमित कर्णधार झाल्यास आश्चर्य वाटायला नको. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारत ही कसोटी जिंकून इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याचा पराक्रम करेल यात शंका नाही. भारतीय संघाला आणि बुमराहला शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५