विरोधकांनो, स्वत:ला नपुंसक घोषित करा !

  107

  ✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

  महाराष्ट्राच्या विधानसभेतला विरोधीपक्ष कधी नव्हे इतका निस्तेज, दुबळा आणि गर्भगळीत झाला आहे. एका बाजूने बेफाम, मोकाट आणि बेदरकार सत्ताधारी आहेत. ते कुणालाच विचारायला तयार नाहीत. सत्तेच्या जोरावर लोकशाहीसह सगळ्यांना कोलायला तयार आहेत. लोकशाही, संविधान, नैतिकता सगळेच फाट्यावर मारत साम, दाम, दंड आणि भेद निती वापरत ते त्यांचे राजकारण रेटत आहेत. दुस-या बाजूला विरोधकांचा आवाज दिवसेंदिवस क्षीण होत चालला आहे. त्यांच्यात काही अवसान उरले आहे, काही दम राहिला आहे असे वाटत नाही. सगळे एका अनामिक भयाच्या ओझ्याखाली जगताना, निपचीत पडताना दिसत आहेत. सगळेच भाजपाच्या आक्रमक राजकारणाला शरण गेले आहेत. काही अपवाद सोडले तर सर्वांनी नांग्या टाकल्या आहेत. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी या सर्वांचा माज जिरवला आहे. भले भले गुडघ्यावर आलेत, निस्तेज झालेत.

  सातत्याने सत्ता भोगून सरंजामी मानसिकता झालेले हे सगळे संस्थानिक भाजपाच्या पायावर झुकले आहेत. आज राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अतिवृष्टीचा मोठा फटका शेतक-यांना बसला. शेतक-यांच्या आत्महत्या रोज वाढत आहेत. शेतक-यांच्या गळ्यातले गळफास रोज आवळत आहेत. छत्रपती शिवरायांची, महात्मा फुले, सावित्रीमाई फुलेंची कशीही विटंबना केली जात आहे. राज्याच्या अस्मितेलाच आव्हान दिले जात आहे, तरीही विरोधक बांडगुळासारखे रांगताना दिसत आहेत. ते पेटत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत. विरोधात ताकदीने लढत नाहीत. जणू त्यांच्या कार्यकर्तृत्वातला पुरूषार्थ संपलाय. त्यांच्यातले संघर्षाचे अवसान संपले आहे. त्यांच्यातले सत्याचे तेज संपले आहे. सगळे सत्तेपुढं लाचार झालेली बांडगुळ वाटतायत. आता या सर्व विरोधकांनी विधानसभेसमोर यावे आणि आम्ही विरोधक म्हणून नपुंसक आहोत याची रितसर घोषणा करावी. अशी घोषणा केली तर जनता त्यांच्याकडून अपेक्षा तरी ठेवणार नाही.

  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सातत्याने राज्याच्या अस्मितेवर टांगा वर करण्याचा नादानपणा चालवला आहे. कधी ते सावित्रीमाय आणि महात्मा फुलेंच्यावर विकृत पिचकारी टाकतात तर कधी छत्रपतींच्यावर बोलतात. भाजपाचा कोण कुठला सुधांशू छत्रपती शिवरांयांची अवहेलना करतो पण राज्यातला कणाहिन विरोधीपक्ष पेटत नाही, रस्त्यावर उतरत नाही. कर्नाटक सरकार सीमाप्रश्न लोंबकळत पडलेला असताना जत तालुक्यातील चाळीस गावं गिळण्याची भाषा करते. तरी मराठी अस्मिता जागी होत नाही. काय चाललय काय ? १०५ हुतात्म्यांनी हौतात्म्य देवून संयुक्त महाराष्ट्र उभा केला त्याची जाहिर टर राज्यपालच उडवतात. मुंबईतून अमूक अमूक गेले तर काय उरणार आहे ? असं बोलतात. काही वाटत नाही. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान, आत्मसन्मान रोज पायदळी तुडवला जातो. तरीही निपचीत पडलेला व लाचार झालेला विरोधी पक्ष जींवत होताना दिसत नाही.

  कुणी काही बोलत नाही, संघर्षाला पुढे येत नाही. कारण सर्वांना इडीच्या भयाने ग्रासले आहे. सत्ता हाती असताना बेमालूपणे हरामखो-या केल्या. राज्याला लुटले, नैतिकता फाट्यावर मारत अनेक भानगडी केल्या. काहीही करून आर्थिक भरभराट करून घेतली. व्यवहार स्वच्छ ठेवले नाहीत. संस्था उभ्या केल्या, त्या मोडल्या, मोडून खाल्या. त्यात कशीही अफरातफर केली. त्यामुळेच आज विरोधीपक्षातल्या अनेकांना सत्तेसमोर नांगी टाकावी लागत आहे. आजवरच्या सत्ताधा-यांनी म्हणजे याच कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी असे सुडाचे राजकारण केले नाही. ही चांगली बाब आहे. सुडाचे राजकारण केले नसेल पण भानगडी केल्या ना त्याचे काय ? त्या केल्या नसत्या तर केंद्रातल्या सत्तेने आज त्यांची काय वाकडी केली असती ? त्यांच्यासमोर वाकायची आज वेळ आली नसती. सातत्याने तीन तीन पिढ्या, चार चार पिढ्या सत्ता भोगणारे, बाप मुख्यमंत्री, पोरगा मुख्यमंत्री, सुन मंत्री, भाऊ मंत्री, इतर नातेवाईक आमदार, खासदार राहिले.

  तिकीटांचे वाटप घरातच वारसाहक्काने केले. घरातल्या कुत्र्यालाच फक्त आमदारकीचे तिकीट देणे बाकी राहिले होते असे अनेक कॉंग्रेसी भाजपाचा रस्ता धरतात, त्यांच्यासमोर लाचार होतात, नांग्या टाकतात तेव्हा आश्चर्य वाटते. हे मिशावाले, मोठ-मोठाले मात्तबर नव वतनदार लढत नाहीत. लढायला पुढे येत नाहीत. मागल्या दाराने भाजपाशी समझोता करतात. त्यांच्या पायावर जातात. त्यांच्या मग्रुरीला, त्यांच्या दादागिरीला खुलेआम आव्हान द्यायची धमक या सरंजामांच्यात राहिली नाही. सतत सत्तेत बसून रस्त्यावर उतरायचे, संघर्ष करायचे त्यांना जमत नाही. काय बोलावं तर आपलं भिजलेलं लंगोट सत्ताधा-यांच्या हाती आहे. मग निमुटपणे नांग्या टाकून सेटलमेंट करत आहेत. ज्या पक्षाने सर्व काही दिले तो सोडून कमळीच्या बाहूपाशात विसावत आहेत. सध्या असले हिडीस राजकारण चालू आहे. सगळेच भ्रष्ट नाहीत. काही अपवादही आहेत पण त्यांचाही आवाज बुलंद होत नाही. काय होणार या महाराष्ट्राचं ? असला हलकट प्रकार व राजकारण आम्ही कधीच पाहिले नव्हते असे जुणे-जाणते लोक बोलत आहेत.

  राज्याच्या, मराठी माणसाच्या अस्मितेशी खेळले जाते, तिला पायदळी तुडवले जाते तरीही हे बहाद्दर पेटत नाहीत, लढायला उठत नाहीत. जनतेच्या प्रश्नांशी यांना सोयरसुतक राहिलेले नाही. जनतेला या लोकांनी केव्हाच फाट्यावर मारले आहे. खुप अडचण आली तर जनता खरेदी करायची. हरामखोरीने मिळवलेला बक्कळ पैसा जनतेत वाटायचा. सत्तेच्या आणि संपत्तीच्या जोरावर जनतेला वेश्येच्या लायकीवर आणून ठेवले आहे. त्यामुळे जनता वेश्याच आहे ती विकत मिळते. तिची काय पर्वा करायची आहे ? तत्व, विचार, निष्ठा गेल्या सत्तेच्या फाट्यावर. त्यांना कुत्रे खात नाही. विचारांचे, तत्वांचे राजकारण करून विचारतो कोण ? अशीच मानसिकता या सर्वांची झाली आहे. मोदी, शहा आणि फडणवीस सुडाचे राजकारण जरूर करत आहेत. केंद्रीय संस्थांचा वापर करून या लोकांना वेठीस धरत आहेत हे निषेधार्ह आहेच पण त्या निमित्ताने या लोकांच्या पापाचेही हिशोब व्हायला हवेत. यांच्या कर्तृत्वात बेईमानी नसती तर हे लाचार झाले नसते.

  यांनी कायदा, नियम धाब्यावर बसवत घोटाळे केले नसते, भानगडी केल्या नसत्या तर आज नांग्या टाकायची वेळ त्यांच्यावर आली नसती. हे तसे नसते तर शड्डू ठोकून ब्लॅकमेलिंगचे राजकारण करणा-यांच्या अंगावर गेले असते. अनेकांच्या चड्डीत घाण आहे त्यामुळेच त्यांना इडीच्या सापाचे भय.

  राज्याच्या विधानसभेचे पहिले विरोधीपक्ष नेते आर डी भंडारे यांच्यापासून राज्याला बुलंद विरोधीपक्षाची व नेत्यांची परंपरा आहे. विरोधातले नेते सत्तेतल्या मुख्यमंत्री, मंत्री यांच्यापेक्षा बलंदड वाटत राहिले आहेत. त्यांनी त्यांचा काळ गाजवला. सभागृह दणाणून सोडले. सत्ताधा-यांना दे माय धरणी ठाय करून सोडले. भाई उध्दवराव पाटील, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, ना ग गोरे, एस एम जोशी, माधवराव बागल यां लोकांनी सभागृह गाजवले. त्यानंतर शरद पवार, गोपिनाथ मुंडे, छगन भुजबळ, आर आर पाटील, नारायण राणे आदी नेत्यांनीही सभागृह हलवून सोडले. जेम्स लेन प्रकरणावेळी आर आर पाटलांनी युती सरकारला धारेवर धरले. विधानसभेत सरकारला सळो की पळो करून सोडले. आज छत्रपती शिवरायांचा अवमान केला जात असताना आर आर पाटलांनी २००२- २००३ च्या काळात सभागृहात केलेली भाषण आठवल्याशिवाय रहात नाहीत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा हा वारसा आणि इतिहास गौरवशाली आहे. देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी विरोधकाच्या खुर्चीत बसले त्या त्या वेळी त्यांनी सत्ताधा-यांना जेरीस आणले. त्यांचे राजकारण काय आहे ? कसे आहे ? यापेक्षा ते विरोधक म्हणून धारधारच राहिले आहेत. विरोधकांचा बुलंद आवाज हे विधानसभेचे खास वैशिष्ठ्य आहे. असे असताना आज विरोधी पक्षाचा आवाज पाक क्षीण झालाय. जणू विरोधी पक्षाच्या आवाजाला टि बी झालाय की काय ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. सध्याचे विरोधक या परंपरेला शोभत नाहीत.

  ते लोकांसाठी रस्त्यावर येत नाहीत, जन-आंदोलने करत नाहीत, लोक लढे उभे करत नाहीत, राज्याच्या अस्मितेसाठी पेटत नाहीत. सत्तेची सवय लागलेल्या या धेंडांना त्यापेक्षा स्वत:च्या दुकानदारीची काळजी जास्त आहे. ती टिकवण्यासाठीच ते भाजपाला शरण जात आहेत. सत्तेसमोर नांगी टाकत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सिंहाचे आयाळ गेले आहे, दात व नख्या निखळल्या आहेत असे वाटते. हे सिंह त्यांच्या देहबोलीतून लाचारी, मजबूरी व षंढपणा डोकावतो आहे. या षंढपणाचीच त्यांनी रितसर घोषणा करावी ही अपेक्षा.

  संविधानामुळेचं देशाची एकात्मता अन् सार्वभौमत्व अबाधित!