दुर्गम गावांना रस्ते व पूल बांधणीसाठी दरवर्षी ५० कोटींची तरतुद : पालकमंत्री.विजय वडेट्टीवार

27

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

🔸भामरागड येथील गरोदर महिलेचा मृत्यू ही दुर्दैवी घटना

गडचिरोली(13जुलै ): दुर्गम भागात पावसाळया दरम्यान जाण्या-येण्यासाठी किमान वाहन जावू शकेल, त्यांना वेळेत वाहनाने दवाखान्यांपर्यंत जाता येईल यासाठी आवश्यक भौतिक सुविधा निर्मितीसाठी दरवर्षी ५० कोटींची मागणी मुख्यमंत्री यांचेकडे व्हीसीद्वारे पालकमंत्री तथा मंत्री इतर मागास बहूजन विकास, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन यांनी केली. मागील आठवडयात २३ किलोमीटर दवाखान्यासाठी गरोदर मातेला चालत प्रवास करावा लागला. तसेच दुसरी महिला दवाखान्यात जाताना दगावली या अतिशय दुर्दैवी घटना आहेत असे ते यावेळी म्हणाले. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत याविषयावर चर्चा करून दरवर्षी ५० कोटी रुपये दुर्गम भागात रस्ते व पूल याकरीता अतिरीक्त घेण्यासाठी मागणी सादर केली. याबाबत मुख्यमंत्री यांनी याबाबत सविस्तर सादीकरण करा आपण निधी देवू असे सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील विविध विभागांचा आढावा घेत असताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संख्या वाढतेय मात्र यामध्ये निम्म्याहून अधिक सीआरपीएफचे जवान आहेत. संख्या वाढत असली तरी त्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. आवश्यक ठिकाणी गरजेनूसार कन्टेनमेंट झोन तयार करत आहोत. असे असले तरी प्रत्येक नागरिकांनी संसर्गाबाबत खबरदारी घेणे आवश्यकच आहे. या व्यतिरीक्त जिल्हयातील तीन चाकी रिक्षाही १ अधिक २ प्रवासी या प्रमाणे सुरू राहतीलच. तसेच काळी पिवळी वाहतूक सुरुच आहे यातध्ये फक्त शाररिक अंतर राखून प्रवास करावा असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
बाहेरील जिल्हयात येजा करणारे शेतकरी यांनी आपले कोणतेही एक ओळखपत्र व जमिनीचा 7/12 दाखवून प्रवास करावा. याबाबत इतर वेगळया पासची गरज नाही असे ते म्हणाले. याबाबत त्यांनी पोलीस व प्रशासन यांना निर्देश दिले की सीमाभागातील शेतकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी त्रास होता कामा नये. यानंतर ते पुढे म्हणाले या कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ते गावस्तरावरील प्रत्येक प्रशासनातील व्यक्ती चांगले काम करत आहे. ही स्थिती सुधारल्यानंतर या कामाचा गौरव करण्यात येईल पंरतु आता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. पोलीस,आरोग्य विभाग व महसूल यांच्या कामगीरीमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात जिल्हयाला यश आले आहे. मुलचेरा, कुरखेडा व अहेरी येथील एक दोन रुग्ण सोडले तर जिल्हयात सर्वच जण बाहेरुन आलेले व संस्थात्मक विलगीकरणातील आहेत, इतर जिल्हयाच्या तुलनेत जिल्हयात ९ हजार पाचशे कोविड तपासण्या झाल्या आहेत. सर्वात जास्त तपासण्यांमूळे कोरोना साखळी वेळीच थांबविण्यास मदत मिळते. लोकांनी फक्त काळजी घ्या प्रशासन सर्वोतोपरी आपल्या सोबत आहे असे ते म्हणाले.

जिल्हयात रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने कार्य – जिल्हा क्रीडांगणाला 27 कोटी रूपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील दुर्गम युवकांना आपले कौशल्ये दाखविण्याची व ते वृद्धींगत करण्याची संधी या अत्याधुनिक क्रीडांगणामुळे शक्य होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधीही स्थानिकांना मिळणार आहे. रोजगार व विद्यार्थ्यांच्या हीतासाठी अद्यावत अभ्यासिका यावर्षी सुरु करण्याची तयारी झाली आहे. आदिवासी विभागातून त्यासाठी निधीही मान्य झाला आहे. जिल्ह्यात जिल्हा ग्रंथालयाच्या मागे उपलब्ध असलेल्या जागेत अद्यावत अभ्यासिका लवकरच सुरु होत आहे असे विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केले.

दोन वर्षात 10 हजार रोजगार निर्मितीचे लक्ष : जिल्हयात एक-एक विषय घेवून पुढे जात आहोत असे ते म्हणाले. जिल्हयातील रोजगार निर्मितीच्या दृष्टीने कसे प्रकल्प उभे करु शकतो याबाबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये बांबू प्रकल्प, वनोपजावर आधारीत कामे इत्यादी विषयांवर आधारीत व इतर क्षेत्रात पुढील दोन वर्षात 10 हजार रोजगार निर्मितीचे लक्ष आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी सर्व विभागांना सूचना दिल्या. यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबविणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना मोफत बीज व मोफत फिड देऊन मत्स्य शेतीला चालना देवून तसेच मोफत टँकही देण्याचा विचार आहे. यातून रोजगार उपलब्ध होवून शेतकऱ्यांना अर्थिक मदत मिळणार आहे. दर आठवडयाला प्रशासनाबरोबर संवाद साधून यापुढे दिशा देणे, विकासाला गती देणे हे कार्य करणार असल्याचे त्यांना सांगितले. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट असून नागरिकांनी यापुढेही आम्हाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले. मेडिकल कॉलेज ते दुर्गम भागांतील पूल अशी सर्व कामे मार्गी लावत आहोत. येत्या काळात जनतेच्या सहकार्यानेच विकास कामे पुर्णत्वास नेणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठाकडील उर्वरीत ७० कोटी सुविधा निर्मितीसाठी खर्च करण्यास परवानगी

गोंडवाना विद्यापीठाकडे शिल्लक ७० कोटी हे नवीन सुविधा निर्मितीसाठी खर्च करणार असलाचे पालकमंत्री यांनी सांगितले. सद्या 35 एकर जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या परिस्थितीत सदर शिल्लक निधी खर्च करण्याची मागणी मुख्यमंत्री यांचेकडे करण्यात आली. त्यांनी सांगितले इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सदर निधी अजून 10 ते 15 एकर जागा घेवून खर्च करावा. 50-60 एकर जागेत इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी सदर शिल्लक निधीची परवानगी देवू असे त्यांनी यावेळी सांगितले. व्हि. सी.द्वारे पालकमंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.