सम्मेद शिखरजी तिर्थक्षेत्रासाठी सकल जैन बांधवांचा शुक्रवारी चंद्रपूरात मूक मोर्चा

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.5जानेवारी):-जैन धर्मियांचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या झारखंडमधील सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ घोषित झाल्याने देशभरातून विरोध सुरू झाला आहे. हे तिर्थक्षेत्र वाचविण्यासाठी चंद्रपूरातील जैन बांधव एकवटले आहे. शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी 2 वाजता जैन भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील सकल जैन समाजाचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी दिली. या मूक मोर्चात जिल्ह्यातील समस्त जैन बांधव सहभागी होणार असल्याने मोर्चा भव्य असणार आहे.

सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करून धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा. दरम्यान, केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्र्यालयाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तिथे आता हॉटेल व रिसॉर्ट सुरु करण्यास अनुमती दिली आहे. या निर्णयाने तीर्थक्षेत्रावर हॉटेल सुरु होतील, अशी भीती जैन धार्मियांना आहे. सम्मेद शिखरजी झारखंडमधील गिरडीय जिल्ह्यातील मधुबन भागात आहे.

याला पारसनाथ पर्वत असेही म्हणतात. जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्व आहे. जैन धर्माचा अनुयायांच्या मते सुमारे २० तीर्थकरांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणूनच श्री सम्मेद शिखरजी जैन समाजाला अत्यंत पूज्यनीय आहे. सम्मेद शिखरजी सुमारे 27 किलोमीटर परिसरात पसरलेले आहे.

या मोर्चात जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जैन समाजाचे योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, डाॅ. महावीर सोईतकर, सुभाष जैन, संदीप बाठिया, डाॅ. अशोक बोथरा, जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगड, राजेश डागा, रोहित पुगलिया, गौतम कोठारी,अमित बैद, राजू लोढा ,यांनी केले आहे.