चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात खताची कोणतीही अडचण येणार नाही : ना.वडेट्टीवार

24

🔸जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15जुलै):जिल्ह्यामध्ये धान (भात) उत्पादक असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युरिया खताची मागणी वाढते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये युरिया खताचा साठा मुबलक असून पुढील 3 दिवसात पहिली अतिरीक्त खताची खेप पोहचेल.त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 19 हजार मेट्रिक टन युरिया पुरवठा झाला असून सद्यस्थितीत 4 हजार 660 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे.जिल्ह्यामध्ये काही विक्रेत्यांकडून युरिया खताची टंचाई असल्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडे माहिती दिली.

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी सदर बाब कृषी आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आणून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता युरिया खत पाठवण्याची सूचना केली. राज्याचे संचालक श्री.धावटे यांनी येत्या दोन-तीन दिवसात युरिया उपलब्ध करून देण्याची ना. विजय वडेट्टीवार यांना आश्वासित केले. चंद्रपूर व गडचिरोली करिता 3 हजार मेट्रिक टन, 3 ते 4 रेल्वेच्या रॅक खताचा पुरवठा होणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली.

अशी आहे खताची उपलब्धता:

10 हजार 690 मेट्रिक टन संयुक्त खते, 5 हजार 120 मेट्रिक टन डिएपी, 7 हजार 500 मेट्रिक टन एस.एस.पी, 1 हजार 290 मेट्रिक टन पोटॅश खताची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे