चंद्रपूर आणि गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा सुरू होणार-ना.विजय वडेट्टीवार यांची घोषणा

    40

    ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी/चंद्रपूर,विशेष प्रतिनिधी)
    मो:-8698648634

    गोंडपिपरी(दि.20जुलै):- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत घोषणा केली. 4 ऑगस्टपासून या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा सुरु करण्यात येणार आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. सोबतच या जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाची आवश्यक साधनं नसल्याने ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. याचाच विचार करुन या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला आहे. कोविड संदर्भातील सर्व नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील, असंही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं. तसेच शाळांसाठी स्वतंत्र नियमावली बनवली जाईल, असंही सांगितलं.
    दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 260 वर पोहचली आहे. शुक्रवारी (18 जुलै) दिवसभरात नव्याने 17 कोरोना रुग्णांची नोंद झाली. सध्या 112 सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत उपचारानंतर 148 जण कोरोनामुक्त झाले. दुसरीकडे गडचिरोलीत देखील नव्याने 73 कोरोना रुग्णांची नोंद झाली. काल 4 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 113 झाली आहे. तसेच सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 216 आहेत. गडचिरोलीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 330 वर पोहचली आहे.