आष्टी ग्रामपंचायतच्या गाळे बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीवरुन झाली चौकशी !

37

🔹राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांच्या प्रयत्नाला यश

✒️चामोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चामोर्शी(दि.27एप्रिल):- गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील ग्रामपंचायतने बांधकाम केलेल्या दुकान गाळे कामात भ्रष्टाचाराचे प्रकरण गेल्या अनेक वर्षापासून गाजत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आष्टी शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालाकडे जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

आष्टी ग्रामपंचायतने केलेल्या गाळे बांधकामातील भ्रष्टाचाराबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी पंचायत समिती ते जिल्हा परिषद पातळीवर सातत्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी त्यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक जिपग / साप्रवि/ पंचा / स्था ७ / ४४१ / २०२३ दिनांक ५ एप्रील २०२३ च्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन केली होती, चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आष्टी ग्रामपंचायत सन २०१८ ते २०२२ मध्ये सर्व शासकीय नियम डावलून भ्रष्टाचार केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार नुकतीच वरिष्ठ पातळीवरील समितीने चौकशी केली आहे.

या चौकशी समितीमध्ये आरमोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन हिवज यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद गडचिरोली बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. टी. फाले, आरमोरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आज टी. पारधी व जिल्हा परिषद गडचिरोलीचे कृषी विभागाचे लेखाधिकारी नसीर हक्कीम या समिती सदस्यांनी १२ एप्रील रोजी आष्टी ग्रामपंचायतमध्ये येवुन मौका चौकशी व दस्ताऐवज पडताळणी केली आहे. या समितीच्या चौकशीने संबंधीत प्रशासनात खळबळ माजली आहे. या प्रकरणात दोषींवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल, याकडे जनतेचे लक्ष लागले असून या प्रकरणाबाबत परिसरात खमंग चर्चा सुरु आहे.